Join us

जमिनीखालील अवशेषाचे झालेले खत पिकांसाठी भारी; अधिक उत्पादनाची बात न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:38 IST

Organic Manure : पाचटापासून तयार होणाऱ्या खतापेक्षा उसाच्या जमिनीखालील अवशेषांचे खत काहीतरी भारी दर्जाचे असले पाहिजे. सेंद्रिय खतात काही हलके- भारी असू शकते, असे आजतागायत कोठेही अभ्यासले गेले नव्हते.

मागील लेखात कोणतीही पूर्व मशागत न करता उसाचे उत्पादन ५०% वाढले हे आपण पाहिले. इथे शेतीत काहीतरी नवीन गोष्ट सापडली आहे. याची जाणीव झाली. पुढे या मागील विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा शास्त्रीय पुस्तकांचा अभ्यास केला, फरक इतकाच झाला होता की, प्रथम पाचट कुजविले जात होते, तर आता उसाचे जमिनीखालील अवशेष कुजवून त्याचे खत जागेलाच झाले आहे.

याचा अर्थ सरळ असा होता की, पाचटापासून तयार होणाऱ्या खतापेक्षा उसाच्या जमिनीखालील अवशेषांचे खत काहीतरी भारी दर्जाचे असले पाहिजे. सेंद्रिय खतात काही हलके- भारी असू शकते, असे आजतागायत कोठेही अभ्यासले गेले नव्हते. अभ्यासातून असे लक्षात आले की, माणूस जसा हाडांचा सांगाडा व स्नायूबंध यामुळे उभा राहू शकतो, तसे वनस्पतीमध्ये तीन प्रकारचे धागे असतात.

यात सेल्यूलोज (हलका), हेमी सेल्यूलोज, (मध्यम), तर लिग्निन हा सर्वात शक्तिमान धागा. वनस्पतीच्या एखाद्या भागाला किती जास्त भार पेलवायचा असतो, त्यानुसार वरील तीन धाग्यांची गुंफण करून त्या भागाला गरजेइतकी शक्ती मिळवून देलेली असते.

उदा, पानाला किती भार पेलावा लागतो? फक्त स्वतःचा, पानाच्या टीपणाला पानाचा व स्वतःचा, पानाच्या टोपणाचे आतील कांडीला त्यापासून वर असणारी पाने व टोपणे, असे वरून खाली जसे-जसे उसात यावे, तसे प्रत्येक खालच्या कांडीला वरच्या कांडीपेक्षा जास्त-जास्त भार पेलावा लागतो.

यामुळे जमिनीखालील अवशेषाला वरील सर्व उसाचा भार आयुष्यभर पेलावा लागतो. यासाठी सर्वात जास्त शक्ती वनस्पतीचे जमिनीखालील अवशेषाला दिलेली असते. हा नियम सर्व वनस्पतींसाठी सारखाच आहे. अपवाद फक्त वेलवर्गीय वनस्पतींचा. वेलांचे जमिनीखालील अवशेषांना वरील भार पेलण्याची शक्ती दिलेली नसते. यामुळे ते इतर गोष्टींचा आधार घेऊन वाढतात.

झाड आपली आडवी फांदी आयुष्यभर पेलून धरते, यासाठी ती फांदी जिथे खोडाला जोडलेली असते, त्या जागेला तितका भार पेलण्यासाठी जास्त शक्ती दिलेली असते. यामुळे खोडात फांदी जोडण्याच्या जागेला गाठ तयार होते. तो भाग जास्त कठीण असतो.

वरील सर्व स्पष्टीकरण सविस्तर देण्यामागे उद्देश हा आहे की, याचा परिणाम तो भाग कुजून त्याचे सेंद्रिय खत झाल्यानंतर त्या खताच्या दर्जावर होतो. असा जास्त शक्तिवाला भाग कुजल्यानंतर तयार होणारे खत जास्त शक्तिवाले असते. जास्त शक्तिवाले खत वापरेले जाईल, ती जमीन जास्त शक्तिवाली होते व अशा शक्तिवान्या जमिनीत पिकाचे उत्पादनही चांगले मिळते.

यातून सेंद्रिय खत वापराविषयी एक नवीन नियम तयार झाला. कोणत्याही वनस्पतीचा काही भाग जमिनीवर, तर काही जमिनीखाली वाढतो. यातील सर्वात जास्त चांगले सेंद्रिय खत देणारा भाग कोणता तर, जमिनीखालचा. जमिनीच्या पृष्ठभागापासून जो-जो वर वर जावे तो-तो हलक्या हलक्या दर्जाचे खत होत जाते. सर्वात हलके खत पानांचे, ऊस तुटल्यानंतर आपल्याला पाचट म्हणजे वाळकी पाने व जमिनीखालील अवशेष फक्त मिळतात.

बाकी भागापैकी ऊस कारखाना घेऊन जातो. वाडे जनावरांना वैरण म्हणून वापरले जाते. आज जागेला फुकटात मिळणाऱ्या पाचटाचे खत केल्यास ते व वाढे घालून जनावरांपासून मिळणाऱ्या शेणापासून तुलनात्मक हलक्या दर्जाचे खत तयार होते. जमिनीखालील अवशेष चुलीत चांगली धग देतात, म्हणून त्याचे जळण होते.

एके काळी जळण ही समाजाची मोठी गरज होती. यामुळे अवशेषांकडे अगर खोडव्याकडे केवळ जळण या दृष्टिकोणातूनच पाहिले गेले. त्याचे खत होईल किंवा केले पाहिजे, असा कोणीही विचारच करत नव्हते. आजही केला जात नाही. यावर पुढील लेखात आणखी अभ्यास करू..

- प्रताप चिपळूणकरकृषीतज्ञ, कोल्हापूर.

हेही वाचा : सेंद्रिय खत जमिनीच्या बाहेर कुजवून जमिनीत टाकणे योग्य की आयोग्य; वाचा सविस्तर

टॅग्स :सेंद्रिय शेतीऊसशेतीशेतकरीसेंद्रिय खतपीक व्यवस्थापन