भातशेतीमध्ये आढळणारी विविध प्रकारची तणे तसेच त्यापासून होणारे पिकाचे मोठ्या प्रमाणातील नुकसान लक्षात घेता भात खाचरामध्ये तण नियंत्रण करताना केवळ एकच पद्धतीचा अवलंब न करता विविध पद्धतींचा एकात्मिकरित्या वापर केल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येतो.
तणांच्या वैशिष्ठपूर्ण गुणधर्मामुळे तणनियंत्रणाची कोणतीही एक विशिष्ठ पद्धत तणांचा प्रादुर्भाव कायमचा टाळण्यासाठी परिपूर्णपणे कार्यक्षम असतेच असे नाही म्हणूनच तणनियंत्रणासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच किफायशीर निवारात्मक उपाययोजनांचा एकत्रित अवलंब केल्यास तण व्यवस्थापन परिणामकारक ठरेल.
प्रतिबंधात्मक उपाय
तणांचे नियंत्रण करण्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजनांपूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे केव्हाही सोयीस्कर आणि किफायशीर ठरते. परंतु या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. तणांचे बी अंत्यत हलके आणि बारीक असल्याने त्यांचा प्रसार वाहते पाणी, वारा, तणबीजमिश्रीत बियाणे, कंपोस्ट वा शेणखताद्वारे होतो. त्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
- तणमुक्त बियाण्याचा वापर करावा पूर्णपणे कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खताचा वापर करावा.
- शेतात वापरली जाणारी औजारे, यंत्रसामुग्री, पाणी इत्यादी स्वच्छ आणि तणमुक्त असावीत.
- शेताचे बांध, नाले, पाट तणमुक्त ठेवावेत.
- पूर्वीच्या भात पिकाच्या काढणीनंतर शेताची वाफसा अवस्थेत नांगरट केल्यास शेतातील अंगओलाव्यावर वाढणाऱ्या तणांचा नायनाट होतो आणि पुढील हंगामात शेतातील तणबीज भांडाराचे प्रमाण कमी होते.
- शेतात कडधान्यासारखी पिके घेतल्यास शेतकऱ्यांना ही बाब फायदेशीर ठरु शकते. वरील उपाययोजना केल्यास तणांच्या बीजांचा प्रसार टाळून शेतात तणांचा शिरकाव कमी करता येणे शक्य आहे.
मशागत/भौतीक पद्धत
भात पिकामध्ये केली जाणारी मशागत ही भाताच्या लागवड पद्धतीवर अवलंबून असते. ज्या ठिकाणी रोपवाटिका करुन पुनर्लागवड केली जाते त्या पद्धतींमध्ये नांगरणी केल्यानंतर रोपे लागवडीपूर्वी चांगल्या प्रकारे चिखलणी केली जाते. तर सुकी पेरणी अथवा पेर भात करताना नांगरट केल्यानंतर जमीन सपाट करुन त्यावर पेरणी केली जाते. तसेच ड्रमसिडरने पेरणी करण्यासाठी चिखल करावा लागतो.
ज्याठिकाणी टोकण पतीने सुकी पेरणी अथवा ड्रम सिडरने पेरणी केली जाते किंवा फोकून पेरणी केली जाते, अशा ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. याउलट पुनर्लागवड क्षेत्राची चिखलणी ही चांगली केल्यास सर्व प्रकारची तणे चिखलात गाडली जातात. त्यामुळे तणांची तिव्रता कमी होते. या दोनही प्रकारात मात्र पाण्याची पातळी समपातळीत ठेवणेही तण नियंत्रणाच्यादृष्टिने महत्वाचे असते.
भात खाचरात जर पाण्याची पातळी चांगल्या प्रकारे स्थिर ठेवली तर तण नियंत्रण चांगले होते. याशिवाय भाताचे एक पीक घेतले जाणाऱ्या बहुतांशी भागात खरीप भाताची कापणी केल्यानंतर वाफसा अवस्थेत नांगरट केल्यास पुढील हंगामातील तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
हिरवळीच्या पिकांची लागवड
अति पावसाच्या प्रदेशात भात पिकासाठी हिरवळीचे खत म्हणून धैंचा उपयुक्त ठरते. धैंचापासून दुहेरी फायदा होतो. भात पिकास सेंद्रिय खत तर मिळतेच याशिवाय तणांचा प्रादुर्भाव देखील कमी करता येतो. विशेषतः ज्याठिकाणी भाताची पुनर्लागवड केली जाते.
त्याठिकाणी धुळवाफ्यावर शेतामध्ये धैंच्याचे बियाणे हेक्टरी २० ते २५ कि.ग्रॅ. या प्रमाणात पेरावे. धैंचाचे बी उगवल्यानंतर ३० ते ३५ दिवसांचे झाल्यावर चिखलणीवेळी ते शेतात गाडावे. असे केल्याने शेतात चिखलणीपर्यंत वाढणाऱ्या तणांची उगवण व वाढ रोखली जाते. याशिवाय भात पिकास उपयुक्त अन्न घटकांचा पुरवठा होतो
अधिक वाचा: शेती आधारित या खताचे उत्पादन करून घ्या हमखास उत्पन्न