डाळिंब झाडास वर्षातून केंव्हाही फुले येतात. त्यामुळे मृग बहार (जून-जुलै), हस्त बहार (सप्टेंबर-ऑक्टोबर), (आंबे बहार जानेवारी-फेब्रुवारी) यापैकी व्यापारीदृष्ट्या तसेच बाजारातील विविध फळांची उपलब्धता पाहून कोणताही बहार घेता येतो.
या फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे.
१) फळ पोखरणारी अळी
- डाळिंब फळपिकावरील ही सर्वात महत्वाची किड आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आणि सतत कमी अधिक प्रमाणात आढळून येते.
- विशेषतः मृग बहारात ही किड जास्त प्रमाणात असते.
- या किडीच्या अळ्या फळे पोखरून आतील भाग खातात व त्यांची विष्ठा फळाच्या पृष्ठभागावर आलेली दिसते.
- फळामध्ये इतर बुरशी व जीवाणूंचा शिरकाव होऊन फळे कुजतात. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही.
- या किडीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या वेळेस सुरू होतो. म्हणून या किडीचे व्यवस्थापनाच्या दृष्टीने फुलोऱ्याच्या अवस्थेपासून सुरूवात केली असता नियंत्रण चांगले होते.
- या अळीचा प्रादुर्भाव मृग बहारामध्ये जास्त दिसून येतो. उष्ण तापमान, पाऊस व आर्द्रता किडीस पोषक ठरते.
२) रस शोषणारा पतंग पतंग
- निशाचर असून दिसायला आकर्षक असतात. त्यांच्या मोठ्या आकारावरून आणि रंगावरून ते सहजपणे ओळखू येतात.
- सर्वसाधारणपणे रात्री ८ ते ११ च्या दरम्यान या पतंगाचे बागेत प्रमाण जास्त दिसून येते.
- पक्व फळ शोधून त्यावर बसून ते फळांना आपल्या सोंडेने सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून आतील रस शोषून त्यावर उपजीविका करतात.
- छिद्र पाडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होतो आणि त्या जागी फळ सडण्यास सुरूवात होते.
- अशी प्रादुर्भावाची फळे गळून पडतात.
- फळांची प्रत कमी झाल्याने अशी फळे विक्रीयोग्य राहत नाहीत. या पतंगाचा प्रादुर्भाव तुलनात्मकदृष्ट्या आंबे बहार आणि मृग बहारात जास्त आढळून येतो.
एकात्मिक व्यवस्थापन
१) बाग स्वच्छ ठेवावी व तणांचा बंदोबस्त वेळीच करावा.
२) झाडांच्या छाटणीचे नियोजन अशा पध्दतीने करावे की जेणेकरून झाडांवर फांद्याची गर्दी होणार नाही तसेच फवारणी करतेवेळी किटकनाशकाचे द्रावण झाडाच्या संपूर्ण भागात पोहोचण्यास मदत होईल.
३) वर्षातून शक्यतो एकच बहार घ्यावा. इतर अवेळी येणारी फुले फळे तोडून नष्ट करावीत.
४) मृग बहारात किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो म्हणून शक्यतो मृग बहार घेणे टाळावे.
५) बागेतील कीडग्रस्त/गळलेल्या फळांचा गोळा करून नाश करावा.
६) सायंकाळच्या वेळी बागेत धूर करावा.
७) प्रकाश सापळ्याचा वापर करावा जेणेकरून आकर्षित झालेले पतंग पकडून नष्ट करावेत.
८) फळांना पेपरबॅग किंवा कापडी पिशव्या बांधाव्यात.
९) रस शोषणारा पतंगासाठी विषारी आमिषाचा वापर करावा. त्याकरिता मॅलॅथिऑन ५० टक्के २० मि.ली. गूळ १०० ग्रॅम अधिक १०० ते १५० मि.ली. फळांचा रस + १ लिटर पाणी एकत्र मिश्रण करून १०० ते २०० मि.ली. बाऊलमध्ये टाकून हे बाऊल्स प्रति ८ ते १० झाडांच्या अंतरावर झाडांना बाहेरील बाजूस टांगून ठेवावेत. या विषारी आमिषात आकर्षित झालेले पतंग गोळा करून त्यांचा नाश करावा.