Join us

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगासाठी करा हे दहा सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 2:52 PM

Soybean Yellow Mosaic सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा हा रोग 'मुंगबीन यलो मोझॅक' या विषाणूंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा हा रोग 'मुंगबीन यलो मोझॅक' या विषाणूंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

रोगाची लक्षणे- सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात.- जसे पाने परिपक्व तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.- काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरूंद होतात व मुरगळतात.- लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते.- अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते.

रोगाचा प्रसारपिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगास कारणीभूत असलेला मुंगबीन यलो मोझॅक याचा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीव्दारे केला जातो. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

सोयाबीनवरील पांढरी माशी आणि पिवळ्या मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन१) रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाव्दारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.२) मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी समूळ काढून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे.३) पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.४) पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लिकॅनिसिलियम लिकॅनी या जैविक बूरशीयुक्त कीटकनाशकाची ८०० ग्रॅमप्रती एकर या प्रमाणात हवेत आर्द्रता व जमिनीत ओल असताना फवारणी करावी.५) रासायनिक कीटकनाशकामध्ये थायमिथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६% झेडसी ५० मिली किंवा असटिामिप्रीड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्लूजी १०० ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन ८.४९% + इमिडाक्लोप्रीड १९.८१% ओडी १४० मिली यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.६) कीटकनाशकाची फवारणी करताना त्यामध्ये कुठलेही तणनाशक, बुरशीनाशक, संप्रेरक, खत अथवा इतर रसायने मिसळून नये, मिसळून फवारणी केल्यास किटकनाशकाचा अपेक्षित परिणाम न होता उलट पिकावर दुष्परिणाम होऊन पीक खराब होऊ शकते.७) नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा.८) मूग, उडीद यासारखा पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.९) पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.१०) बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी.

टॅग्स :सोयाबीनपीकशेतीकीड व रोग नियंत्रणशेतकरीपरभणीखते