भेंडी हे वर्षभर मागणी असणारे व आर्थिक फायदा देणारे महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भेंडीची भाजी पौष्टिक असून यामध्ये तंतूमय पदार्थ, अ व क जीवनसत्वे, पोटॅशियम, कॅल्शियम सारखी खनिजे असतात.
भेंडीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते. भेंडी हे निर्यातक्षम पिक आहे. युरोप तसेच आखाती देशात याची निर्यात होते. जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन घेतल्यास याची निर्यात करणे शक्य आहे.
महाराष्ट्रात भेंडीची खरीप व उन्हाळी हंगामात लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईमुळे लागवड होत नाही व एकूणच भेंडीची आवक कमी व मागणी जास्त असल्याने चांगला बाजारभाव मिळतो. सुधारीत वाण, मल्चिंग, ठिबक सिंचन यासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी पाण्यात जास्त उत्पादन घेता येते.
खत व्यवस्थापन
- पिकाच्या जोमदार वाढीसाठी खतांचा समतोल पुरवठा करणे गरजेचे आहे. पिकामध्ये उर्वरित अंश तपासणीमध्ये हानिकारक घटकांची मात्रा कमी येण्याकरिता सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी माती परिक्षण करणे आवश्यक आहे.
- पूर्वमशागत करताना हेक्टरी २० टन शेणखत द्यावे. रासायनिक खतांद्वारे १००:५०:५० नत्र, स्फुरद व पालाश किलो प्रति हेक्टर द्यावे. उरलेले अर्धे नत्र, संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणी करताना द्यावे. उरलेले अर्धे नत्र तीन समान हप्त्यात ३०, ४५ व ६० दिवसांनी द्यावे.
- जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास पेरणी करताना फेरस सल्फेट व झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो प्रति हेक्टर जमिनीतून द्यावे किंवा पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांनी फेरस सल्फेट ०.५ टक्के व बोरिक अॅसिड ०.२ टक्के ची फवारणी करावी.
आंतरमशागत
तण नियंत्रणासाठी १५ ते २० दिवसाच्या अंतराने खुरपणी करावी तसेच फळे येण्याच्या कालावधीत भर लावावी.
पाणी व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे. जमिनीची व पिकाची वाढीची अवस्था पाहून दर पाच ते सहा दिवसांनी पाणी द्यावे. वाळलेले गवत, पॉलिथीन आच्छादन किंवा ठिबकद्वारे सिंचनपध्दतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. एक दिवसाआड ठिबकाद्वारे पाणी द्यावे.
किड व्यवस्थापन
- किड नियंत्रणाकरीता एकात्मिक किड व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. भेंडी पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी या रस शोषक किडींचा व फळ पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
- रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे २५ ते ३० नग प्रति हेक्टर या प्रमाणात ठिकठिकाणी लावावे. इमिडाक्लोप्रीडची बिजप्रक्रिया करावी.
- व्हर्टीसीलीयम लॅकेनी ५० ग्रॅम, कपभर दूध प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी किडलेली फळे नष्ट करावी. हेक्टरी १० ट्रायकोकार्डचा वापर करावा.
काढणी व उत्पादन
- भेंडीची तोडणी सकाळी केल्यास ताजेपणा व रंग जास्त काळ टिकून राहतो. लागवडीपासून ४० ते ४५ दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यानंतर ४ ते ६ दिवसांनी तोडणी होते.
- कोवळी, लुसलुशीत व वजनदार भेंडीची तोडणी करावी. दिवसाआड तोडण्या कराव्यात. तोडणीकरिता विद्यापीठाने विकसित केलेल्या भेंडी कात्रीचा वापर करावा.
- भेंडी उत्पादन घेताना शिफारसीत औषधांचा, शिफारसीत मात्रेत वापर करावा.
- किटकनाशक, बुरशीनाशक फवारणीनंतर औषधानुसार असणारा फळे तोडणीचा प्रतिक्षा कालावधी संपल्यानंतरच काढणी करावी. फळे तोडणीनंतर प्रतवारी करावी.
- खराब, डाग असलेली फळे बाहेर टाकावीत. टवटवीतपणा जास्त काळ राहण्याकरिता फळे २५० गेज जाडीच्या प्लास्टिक पिशवीत ठेवावीत.
- हेक्टरी १५ ते २० टन उत्पादन मिळते.