पीक उत्पादनात वाढ आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. पिकाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी एकूण १७ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.
प्रत्येक अन्नद्रव्य आवश्यक असून प्रत्येकाचे कार्य वेगळे असल्यामुळे दुसरे अन्नद्रव्य त्याची उणीव भरून काढू शकत नाही. प्रत्येक वाढीच्या अवस्थेत वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. ही गरज विद्राव्ये खताच्या साहाय्याने पूर्ण करता येते.
ठिबक सिंचनद्वारे विद्राव्य खते देण्याचे फायदे- दररोज किंवा एक दिवसाआड खते देता येतात.- गरजेनुसार खते दिल्यामुळे सर्व परिस्थितीत अचूक व सारख्या प्रमाणात वापर शक्य होतो. खतांची कार्यक्षमता वाढते.- ओलाव्याच्या भागातच पिकांची कार्यक्षम मुळे असल्याने अन्नद्रव्ये चांगल्यारीतीने पिकास उपलब्ध होतात.- पाण्याची व खतांची कार्यक्षमता वाढते. पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेनुसार आवश्यक तेवढी खताची मात्रा देता येते.- पिकाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन दर्जेदार व निर्यातक्षम उत्पन्न मिळते.- पीक लवकर तयार होते व उत्पादनात २० ते ४० टक्क्यांनी वाढ होते.- हलक्या व कमी प्रतीच्या जमिनीत पीक घेता येते.- खते देण्यासाठी लागणारा मजुरीवरील खर्च वाचतो.
ठिबक सिंचनासाठी लागणारी खते- ही खते संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी असावीत.- खते आम्लधर्मी असावीत.- हाताळणी व वाहतूक सुलभ होण्यासाठी शक्यतो ही खते घन स्वरूपात उपलब्ध असावीत.- या खतांमध्ये क्लोराईड व सोडियम सारखे घटक नसावेत.- त्यामध्ये सूक्ष्म व दुय्यम मूलद्रव्ये उपलब्ध असावीत.
ठिबक सिंचनद्वारे विद्राव्य खते देताना घ्यावयाची काळजी- ठिबक सिंचन पद्धती मधून द्यायचे पाण्याचे वेळापत्रक बनवावे.- जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण व पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रातील खतांची तीव्रता तपासावी.- ठिबक सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासावी.- जमिनीचे तापमान व पिकाच्या वाढीची अवस्था पहावी.- पिकाला खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे.- जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये, यांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार विद्राव्य खताची मात्रा ठरवावी.- विद्राव्य खताचा वापर करताना शिफारशी प्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक आहे.- निचऱ्याद्वारे होणाऱ्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी.- गरजेपेक्षा जास्त खत देणे टाळावे.- खतापासून निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे तोट्या बंद पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.- नळ्या व पाइप्स नरम पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.- खते १०० टक्के पाण्यात विरघळणारी असावीत. तसेच पाण्याच्या क्षाराबरोबर खतांची रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशाप्रकारे पाण्याचा वापर करावा.- खते देण्याआधी आणि दिल्यानंतर कमीत कमी अर्धा तास संचाद्वारे पाणी द्यावे, त्यामुळे पाणीपुरवठा होतो व संचही खराब होत नाही.