बीजप्रक्रिया किड व रोग प्रतिबंधक करिता तसेच अन्नद्रव्य उपलब्धते करता रामबाण उपाय आहे. उन्हाळी हंगामात भुईमूग पिकात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. भुईमूग पिकात बीजप्रक्रिया कशी करावी सविस्तर पाहूया.
बीजप्रक्रिया म्हणजे काय?
शेतकरी बंधूंनो पेरणीपूर्वी एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून विशेषता अन्नद्रव्य उपलब्धतेत वाढ करणे, पिकामध्ये कीड व रोग प्रतिबंध करणे यासारखा महत्त्वाचा उद्देश ठेवून केलेली जैविक खताची, जैविक बुरशीनाशकाची किंवा रासायनिक बुरशीनाशकाची किंवा किटकनाशकाची बियाण्याला शिफारशीप्रमाणे पेरणीपूर्वी केलेली प्रक्रिया म्हणजे बीजप्रक्रिया होय.
कशी कराल बीजप्रक्रिया?
- बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.
- पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम चोळावे.
- त्यानंतर रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम चोळावे. त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.
भुईमूग पिकात बीजप्रक्रिया केल्याचे फायदे
१) उन्हाळी भुईमूग सारख्या पिकात संबंधित पिकात शिफारशीत रायझोबियम या जैविक खताची बीजप्रक्रिया केल्यास हवेतील नत्र स्थिर होतो व नत्राची उपलब्धता होते व रासायनिक खतातून द्यावयाच्या नत्राच्या मात्रेत कपात करता येते.
२) पीएसबी या जिवाणू संवर्धकाच्या बीजप्रक्रियेमुळे उन्हाळी भुईमूग यासारख्या पिकात जमिनीतील रासायनिक खताच्या रूपात दिलेला स्फुरद विरघळून पिकाला मिळवून देण्याचे काम केलं जाते.
३) बऱ्याच पिकांच्या रोगात जमिनीतून प्रादुर्भाव करणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी केव्हाही बीजप्रक्रिया हाच रामबाण उपाय असतो.
४) याव्यतिरिक्त काही पिकात उगवण चांगली करणे पेरणी सुलभ करणे किंवा बियाण्याची सुप्तावस्था कमी करणे या व इतर कारणासाठी बीजप्रक्रिया केली जाते.
अधिक वाचा: टोमॅटो व मिरची पिकांत कीड व रोग सहनशील ह्या नवीन जाती विकसित; वाचा सविस्तर