ज्वारी हे जगातील प्रमुख अन्न तृणधान्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण उत्पन्नापैकी ५०% उत्पन्न होते. ज्वारीच्या उत्पादनात हरित क्रांतीद्वारे उच्चांक गाठूनसुध्दा या प्रांतातील शेतकऱ्यांच्या पदरात विशेष असा लाभ पडला नाही. वातावरणातील आर्द्रतेमुळे ज्वारी साठवणुकीच्या काळात काळी पडते आणि अशा ज्वारीस बाजारात भाव मिळत नाही.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या काळपट ज्वारीचे कवच काढून पांढरे शुभ्र बनवता येते आणि त्यापासून वेगवेगळे औद्योगिक मुल्यवर्धित पदार्थ उदा. स्टार्च, रुपांतरीत स्टार्च, सॉरबिटॉल इ. पदार्थ बनवता येतात. खालील नमूद केलेले पदार्थ तयार करण्यास अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथील संशोधनात यश मिळाले आहे.
ज्वारीचे पोहे
ज्वारीच्या दाण्यांना भिजवून त्यापासून विशिष्ट यंत्राद्वारे पोहे तयार करता येतात आणि अशा पोह्यांचा उपयोग चिवडा तयार करण्यासाठी करता येतो.
ज्वारी दाण्याचे मोतीकरण
ज्वारीला ओलवून घेऊन तिला तांदळाला चमकवण्यासाठी वापरात येणाऱ्या शंकुकार बंत्रातून काढण्यात येते. त्यामुळे सदर ज्वारीच्या पृष्ठभागावरील कोंडा निघून जातो. या प्रक्रियेमुळे दाणे शुभ्र मोत्यासारखे दिसतात. यालाच ज्वारीचे मोतीकरण म्हणतात.
ज्वारीच्या लाह्या
ज्वारीला ओलावून (१८ ते २० टक्के जलांश) आणि उच्च तापमानाद्वारे लाह्या बनवता येतात. या लाहह्यांपासून उत्तम प्रतीचा चिवडा आणि मिठाई बनवता येतो.
शेवया
मोतीकरण केलेल्या ज्वारीच्या पिठापासून शेवया तयार करता येतात. यासाठी ज्वारीचे पीठ, मीठ आणि पाणी यांचे योग्य मिश्रण करुन मशीनच्या सहाय्याने शेवया तयार करता येतात.
ज्वारीपासून माल्ट
माल्ट तयार करणे ही विशिष्ट यंत्राद्वारे धान्य मोडवून त्याला पिष्टमय पदार्थांमध्ये रूपांतरीत करण्याची प्रक्रिया आहे. माल्टचा उपयोग पाव, रोटी, बिस्कीटे, नानकटाई यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी होतो. या व्यतिरिक्त बाल आहारामध्येही त्याचा वापर करता येतो. या पदार्था व्यतिरिक्त खारी सेव, मुरकुल, पापड्या इत्यादी पदार्थांमध्ये सुध्दा उपयोग करता येतो.
ज्वारीपासून बियर
• प्रचलित पध्दतीत बार्लीमाल्टचा वापर करून बियर हे पेय बनविले जाते. परंतु त्यामुळे उत्पादन खर्च वाढते. पर्यायाने बियरची किंमत सुध्दा वाढते. हायब्रिड ज्वारीचा काही प्रमाणात वापर करून उत्तम प्रतीची बियर बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे.
• बार्लीमाल्ट सोबत ६०:४०, ५०:५०, ४०:६० या प्रमाणात ज्वारीमाल्ट वापरून बियर बनवून तिच्या भौतिक व रासायनिक प्रक्रियेचा अभ्यास चालू आहे. यामुळे ज्वारीला योग्य बाजारपेठ मिळून योग्य भाव मिळेल व बियरचा उत्पादन खर्चसुध्दा कमी होईल.
ज्वारीचा स्टार्च
ज्वारीच्या दाण्यापासून ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत पिष्टमय पदार्थ (स्टार्च) काढता येतो. याचा उपयोग अन्नप्रक्रिया, कागद, कापड, औषध आदी अनेक कारखान्यांत मोठ्या प्रमाणावर होतो.
हेही वाचा : तुमची सिंचन मोटार सुद्धा वारंवार जळते का? मग 'हे' उपाय करा आणि मोटारचे आयुष्य वाढवा