Join us

जेवणाच्या पंगतीतून पळसपानांची पत्रावळी झाली हद्दपार: पण का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2023 2:53 PM

विवाह सोहळा, सप्ताह, पूजा व इतर कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र ग्रामीण भागातही सर्रास पाहावयास मिळत आहे.

विवाह सोहळा, सप्ताह, पूजा व इतर कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र ग्रामीण भागातही सर्रास पाहावयास मिळत आहे, तर आधुनिकीकरणाच्या युगात प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

विवाह सोहळ्यात व इतर सार्वजनिक कार्यक्रमांत आता पळसाच्या पानाच्या पत्रावळींची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे. त्यामुळे स्थानिकांचा पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापाऱ्यांना विकणे हा छोटेखानी रोजगार मागणी कमी होत असल्याने बंद झाला आहे.

आयुर्वेदात मोठे महत्त्व- पळसाच्या पानांच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाड्याच्या झाडाच्या काडीचा वापर होत असतो. लिंबाड्याच्या झाडाला आयुर्वेदात मोठे महत्त्व आहे.- पळसाच्या पानांना कीड लागत नसून या पत्रावळी स्वस्तात सहज उपलब्ध होत होत्या. एखाद्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना ताटात जेवण न देता पत्रावळीत सामुदायिक जेवण दिले जात होते.- सध्या आधुनिकीकरणाच्या युगात ग्रामस्थ पळसाच्या पानांऐवजी प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या पत्रावळीचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. परिणामी स्वस्त व आयुर्वेदीय महत्त्व असणारी पळसाच्या पानांची पत्रावळी हद्दपार झालेली पाहावयास मिळत आहे.

जेवणाचा स्वाद वेगळाच- पळसाच्या पानांनी बनविलेल्या पत्रावळीत जेवणाचा स्वाद अलगच असायचा, असे जुने जाणते वयोवृद्ध नागरिक आजही अभिमानाने सांगत आहेत.कारण पळसाच्या पत्रावळीला आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने जेवण लवकर पचत असते.- अशी विविध गुणधर्म असलेली पळसाच्या पानांची पत्रावळी सध्याच्या स्थितीत हद्दपार झालेली असून, तिची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली असल्याचे दिसत आहे.

आदिवासींचा रोजगारही बुडालापुरातन काळापासून मंगलप्रसंगी जेवण समारंभासाठी पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळींचा वापर केला जात असे. आयुर्वेदीय गुणधर्म असलेल्या पत्रावळी सध्या लोप पावत असून, पानटपरीवालेही सध्या पार्सल, मावा आदी वस्तू पानात बांधून न देता कागद, प्लास्टिकमध्ये बांधून देत असल्याने पळस पानांची मागणी घटली आहे. जंगलातील आदिवासींच्या रोजगाराचे साधन बंद झाले आहे.

टॅग्स :लग्नअन्नआरोग्यघरगुती उपाय