महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो.
महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १८३९ किलो प्रति हेक्टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३४८४ किलो/प्रति हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे.
गव्हाची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय
- कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या पेरणीसाठी नेत्रावती, फुले अनुपम या सुधारीत वाणांचा वापर करावा.
- कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या पेरणीसाठी प्रती हेक्टर ७५ ते १०० किलो बियाणांचा वापर करावा.
- बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा योग्य वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल.
- वेळेवर पेरणीसाठी फुले समाधान, त्र्यंबक, तपोवन, एमएसीएस ६२२२, एमएसीएस ६४७८, डि.बी.डब्ल्यू. १६८ या सुधारीत वाणांचा वापर करावा.
- पेरणीपुर्वी प्रती किलो गहू बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रत्येकी २५० ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड पाण्यात मिसळून चोळावे. असे बीजप्रक्रिया केलेले बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी.
- बागायती वेळेवर पेरणी करतांना दोन ओळीत २० से.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीसाठी दर हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे.
- बागायती वेळेवर पेरलेल्या गहू पिकास पेरताना प्रती हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर २१ दिवसांनी हेक्टरी ६० किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा.
- लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये गव्हाचे अधिक उत्पादन, आर्थिक फायदा व जमिनीतील लोहाची पातळी राखण्यासाठी शिफारशित अन्नद्रव्यासोबत (१२०:६०:४० नत्रः स्फुरदः पालाश किलो प्रति हेक्टर अधिक १० टन शेणखत प्रती हेक्टरी, मुरविलेले हिराकस २० किलो प्रती हेक्टरी) १०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवुन जमिनीतून द्यावे.
- विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या तांबेरा रोग प्रतिकारक्षम वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी. गव्हाची पेरणी वेळेवर करावी व नत्र खताचा पहिला हप्ता शिफारशीत मात्रेनुसारच द्यावा.
अधिक वाचा: तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे कसे कराल व्यवस्थापन वाचा सविस्तर