गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरीत भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात.
या क्रियेला २४ तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो.
गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळ खत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.
गांडुळाचे प्रकार
१) एपिजिक
ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापैकी ८० टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर २० टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.
२) अॅनेसिक
ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.
३) एण्डोजिक
ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिक्कट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात.
या तीन प्रकारांची वैशिष्ट्ये व गुणधर्म पाहता एपिजिक व अॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजना इतके अन्न रोज खातात.
गांडूळ खतासाठी गांडुळाच्या योग्य जाती
गांडूळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रक्रिया ४० ते ४५ दिवसात होते.