लसूणाची लागवड महाराष्ट्रात मुख्यतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. देशभरातील एकूण लसणाच्या लागवडीपैकी ९० टक्के लागवड नोव्हेंबर महिन्यात होते.
या काळात थंड हवामानामुळे पिकाच्या वाढीस पोषक वातावरण तयार असते. विशेषतः रात्रीचे तापमान कमी आणि हवेतील आर्द्रता कमी असल्यामुळे लसणाच्या वाढीला उत्तेजन मिळते.
अशी करा लागवड
लसणाची लागवड करण्यासाठी योग्य जमीन अत्यंत महत्त्वाची आहे. मध्यम ते भारी, चांगल्या पाण्याच्या निचऱ्याची असलेल्या मातीमध्ये लागवड करणे फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी, जमिनीतील ढेकळे फोडून वखरणी करावी. त्यानंतर कुजलेले शेणखत हेक्टरी १५ ते २० टन शेतात टाकावे. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि पीक अधिक उत्पादनक्षम होऊ शकते.
लसणाच्या लागवडीसाठी, सपाट वाफ्यामध्ये १५ बाय १० सेंटीमीटर अंतरावर मोठ्या आकाराच्या पाकळ्या लावाव्यात. यासाठी हेक्टरी सहा क्विंटल पाकळ्यांची आवश्यकता असते.
या वाणांचा पर्याय उत्तम
सुधारित वाणांच्या लागवडीसाठी गोदावरी, श्वेता, फुले बसवंत, यमुना सफेद यासारख्या जाती उत्तम ठरतात.
खत व्यवस्थापन
माती परीक्षणानुसार, खताची योग्य मात्रा देणे आवश्यक आहे. लसूण लागवड करतांना हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश ही खताची योग्य मात्रा देणे. तसेच, बियाण्याला जीवाणू संर्वधनाची प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ट्रायकोडमी, पीएसबी, झोटोबॅक्टर या जीवाणूंनी बियाणे उपचार केल्याने लसणाचे पीक अधिक प्रमाणात आणि आरोग्यदायक वाढते.
लसूण लागवडीसाठी याप्रकारे योग्य तंत्रज्ञान आणि काळजी घेतल्यास उत्पादन अधिक आणि खर्च कमी करता येईल.
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर
हेही वाचा : Lasun Lagwad : लसूण लागवड करताय? ह्या आहेत लसणाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या सात जाती