Join us

ठिबक, तुषार सिंचनासाठी अनुदान घ्या; कुठे कराल अर्ज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2023 9:00 AM

राष्ट्रीय कृषी विकास योजनेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन तंत्राचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन तंत्राचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे. अनुसूचित जमातींसाठी सुमारे पावणेसात लाखांचे अनुदान शिल्लक असून अनुसूचित जातींचे अर्ज आल्यास त्यानुसार अनुदानाची मागणी करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या २०२३-२४ या वर्षासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या ५५ टक्के व भूधारकांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते. अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजनेत ३५ टक्के व ४५ टक्के पूरक अनुदान देय असल्याने पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येते.

सद्य:स्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांच्या अर्जाचे प्रमाण कमी असल्याने क्षेत्रीय स्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. अर्ज करताना सातबारा, ८ अ उतारा, आधार कार्ड, बैंक पासबुक आवश्यक असून, आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी. नोंद नसल्यास विहीर, शेततळे यांबाबत स्वयंघोषणापत्र द्यावे. आलेल्या अर्जातून संगणकीय सोडत काढण्यात येईल व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. संच बसविल्यानंतर कृषी पर्यवेक्षकामार्फत मोका तपासणी होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हास्तरावरून अनुदान वर्ग होईल.

अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा. या मोहिमेदरम्यान कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कृषी सहायक प्रत्येक गावात मेळावे आयोजित करून योजनेची माहिती देणार आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

टॅग्स :ठिबक सिंचनशेतकरीसरकारी योजनासरकारशेती