Join us

Gogalgai Niyantran : शेतकऱ्यांनो असे करा शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन; वनामकृविच्या कीटकशास्त्रज्ञांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 12:13 PM

शेतकऱ्यांनी या गोगलगायींकडे वेळीच लक्ष देऊन सामुहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल. (Gogalgai Niyantran)

Gogalgai Niyantran : परभणी : जिल्ह्यात बऱ्याच भागात परतीचा पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना आढळून येत आहेत. त्यामुळे फळबाग, कापूस यासारख्या पिकामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

शेतकऱ्यांनी या गोगलगायींकडे वेळीच लक्ष देऊन सामुहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर, डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. पी. एस. नेहरकर यांनी केले. 

सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ, चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे.

जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता आत मध्येच मरून जातील. गोगलगायी जमा करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच करणे गरजेचे आहे.

शेतामध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे, भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग, गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर, डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. पी. एस. नेहरकर यांनी केले.

टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनपीकशेतकरीशेती