रासायनिक खतांचा अतिवापर व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रीय खताची गरज भागवयाची असेल तर हिरवळीची खते हा उत्तम पर्याय आहे.
मातीतील सेंद्रीय कर्ब वाढीसाठी हिरवळीची पिके उपयुक्त असून ते आपण शेतात मिश्र, आंतरपीक किंवा मुख्य पिक म्हणुनही घेता येते. जमिनीचा पोत टिकविण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताला अतिशय महत्वाचे स्थान आहे.
हिरवळीच्या खतांचे प्रकार
१) जागच्या जागी गाडावयाचे हिरवळीचे खत : ज्या शेतात हिरवळीचे खत वापरायचे आहे त्याच ठिकाणी सलग व एखादया पिकांमध्ये आंतरपिक म्हणुन हिरवळींच्या पिकांची पेरणी केली जाते व पुर्ण वाढ झाल्यावर पिक फुलोर्यावर येण्याआधी नांगराच्या सहाय्याने ते जमिनीत गाडावे उदा. ताग, धैंचा, चवळी, मुग, गवार, मटकी, वटाणा व उडिद इत्यादी.
२) इतर ठिकाणाहुन हिरवळीचे खत आणून शेतात टाकणे : पडिक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडिक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळींच्या झाडांची लागवड करून त्याचा पाला किंवा फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलनीच्या वेळी मातीत मिसळणे होय. उदा. शेवरी, गिरीपुष्प, सुबाभुळ, करंज, टाकळा, हादगा इत्यादी.
हिरवळीच्या खतांसाठी उपयोगी पिके
१) ताग : मानसुनच्या पावसावर येणारे हे पिक असून ते फारच झपाटयाने वाढते. एक ते दोन मिटर उंच वाढण्यासाठी ६ ते ८ आठवडयांचा कालावधी पुरेसा होतो. मातीत ओलावा भरपूर असल्यास ताग हे पिक लवकर कुजते. ताग हे लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमिन निवडावी. लागवडीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे हे पिक आपण उन्हाळी व पावसाळी हंगामात घेवू शकतो. सरासरी उत्पादन १९ टन प्रतीहेक्टरी मिळते.
२) चवळी : चवळी, कुळीथ, जंगली इंडिगो आणि तुर या पिकांचा थोडयाफार प्रमाणात हिरवळीच्या खतासाठी वापर होतो. हि पिके व्दिदल व दाळवर्गीय असल्याने त्याच्या मुळावर गाठी असतात त्यामुळे जमिनीत नत्र स्थिरीकरण चांगले होते. चवळी लागवडीसाठी हलकी ते मध्यम काळी जमिन निवडावी. पेरणीसाठी हेक्टरी ३५ किलो बियाणे वापरावे. चवळी हे उन्हाळी व पावसाळी हंगामात घेतले जाते. सरासरी उत्पादन १३ टन प्रतीहेक्टरी मिळते.
३) धैंचा : हे पिक अनुकुल परिस्थिती नसतांनाही उत्तम वाढते ज्या जमिनी जास्त क्षारयुक्त किंवा ओलावा धरून ठेवतात अशा जमिनीतदेखील हे पिक जोमाने वाढते व याचे उत्तम प्रकारे हिरवळीचे खत तयार होते हे व्दिदल वर्गीय पिक असल्याने वातावरणातील नत्र जमिनीत साठवून ठेवण्यास मदत होते. धैंचामुळे जमिनीची धुप कमी होते. हे पिक खरिप व उन्हाळी हंगामात घेतले जाते. लागवडीसाठी ४५ किलो बियाणे प्रतिहेक्टरी वापरावे उत्पादन सरासरी १७ टन प्रतिहेक्टरी मिळते.
४) गिरीपुष्प : हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तसेच निरनिराळया पाऊसमानाच्या प्रदेशात चांगल्याप्रकारे येऊसमानाच्या प्रदेशात चांगल्याप्रकारे येऊ शकते. ताग व धैंचाच्या तुलनेत या झाडाच्या पानांमध्ये नत्राचे प्रमाण जास्त म्हणजे २.९ टक्के असते. हे हिरवळीचे खत एक आठवडयातच कुजुन ते पिकाला उपलब्ध होते या झाडाचा हिरवा पाला ६ ते ८ टन प्रतिहेक्टरी द्यावा.
हिरवळीच्या पिकाचे लागवडी योग्य वेळ
मृगाच्या पहिला पाऊस पडल्यानंतर हिरवळीच्या पिकाची पेरणी करने योग्य मानले जाते मात्र हि वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते. पुरेशा आद्रतेमध्ये बियांची उगवन चांगली होते.
हिरवळीचे पिक जमिनीत गाडण्याची योग्य वेळ
सर्वसाधारणपणे पिक फुलात आल्यावर ती गाडावीत त्यासाठी पेरणीनंतर साधारणपणे ६ ते ८ आठवडे लागतात.
हिरवळीची पिके गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणी यातील कालावधी
मातीत गाडलेल्या पिकांना कुजवण्यासाठी किती वेळ लागतो यावर मुख्य पिकांची पेरणी करण्याचे नियोजन करावे. हलक्या मातीमध्ये योग्य आद्रता असताना हिरवळीचे खत गाडल्यानंतर २ ते ७ दिवसांनी मुख्य पिकाची पेरणी करता येते. पाण्याचा निचरा कमी असलेल्या मातीमध्ये हि खत पिके गाडल्यानंतर ७ ते १२ दिवसांनंतर पेरणी करावी.
हिरवळीच्या पिकांची निवड
१) पिक शेंगवर्गीय (व्दिदल) असावे.
२) पिक हलक्या किंवा मध्यम जमिनीत वाढण्यायोग्य असावे.
३) पिकास पाण्याची आवश्यकता कमी असावी.
४) वनस्पतींमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असावे जेनेकरून त्याचे विघटन लवकर होईल.
५) हिरवळीचे पिक एक ते दिड महिण्यात फुलोर्यात येणारे असावे म्हणजे पिक गाडुन कुजल्यानंतर पुढील पिक घेता येईल.
हिरवळीच्या खतांमुळे होणारे फायदे
१) जमिनीची धुप होत नाही.
२) पिक उत्पादनात चांगली वाढ होते.
३) जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
४) जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.
५) मातीच्या रचनेत सुयोग्य बदल होऊन जलधारण क्षमता वाढते.
६) जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात बदल होतो.
लेखक
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक (कृषि विद्या.)
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर. पिन कोड ४२३७०३ मो.नं. ७८८८२९७८५९
हेही वाचा - खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष