शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाली हे बारमाही उत्पन्न देणारे पीक आहे. वालीची लागवड विशेषतः कोकणात आढळते. मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला मानवते. खरीप हंगामात जिराईत, रब्बी/उन्हाळी हंगामात बागायती पीक घेता येते.
जमिनीची तयारी
भाताच्या कापणीनंतर त्या जमिनीत वालीची लागवड करता येते. जमिनीची चांगली नांगरट करून हेक्टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून तीन बाय तीन मीटर आकाराचे सपाट वाफे करावेत.
खत व्यवस्थापन
६० सेंटीमीटर अंतरावर लहान खड्डे करून रासायनिक खताचा पहिला हप्ता ३० किलो नत्र, ६० किलो स्फूरद आणि ३० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. खते मातीत चांगली मिसळावीत. उरलेले ६० किलो नत्र, ६० ते ८५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा विभागून झाडाच्या सभोवती बांगडी पद्धतीने द्यावे.
बियाणे व लागवड
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 'कोकण वाली' ही सुधारीत जात विकसित केली आहे. रब्बी हंगामात पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी शेंगांची तोडणी करता येते. शेंगांची लांबी ३५ ते ४० सेंटीमीटर असते. या जातीपासून हेक्टरी ६० ते ७० क्विंटल उत्पादन मिळते. एक हेक्टर लागवडीसाठी ८ ते १० किलो बियाणे लागते. पेरणी ६० बाय ६० सेंटीमीटर अंतरावर २ ते ३ बिया टाकून करावी.
पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. सुरुवातीच्या पाण्याच्या पाळ्या हलक्या द्याव्यात. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ ते १० दिवसांच्या अंतराने पाणीद्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ ते ८ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
आंतरमशागत
बियांची उगवण झाल्यानंतर १५ ते २० दिवसांनी रोपांची विरळणी करावी. प्रत्येक ठिकाणी एक जोमदार रोप ठेवावे. खुरपणी करून वेळोवेळी तणांचा बंदोबस्त करावा.
पिक संरक्षण
लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी १.५ मिली डायमेथोएट एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक फुलोऱ्यात आल्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन २ मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा, ज्यामुळे मावा व फुलकिडीच्या प्रादुर्भावाला आळा बसेल.
काढणी
वालीच्या कोवळ्ळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची तोडणी करावी. तोडणी २ ते ३ दिवसांनी करावी. किलो तसेच जुडीवर शेंगांची विक्री होते.
आरोग्यदायी फायदे
- वालाच्या शेंगांचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
- जीवनसत्त्व अ, ब-६, क, तसेच कॅल्शिअम, लोह, फॉलिक अॅसिड, बीटा कॅरोटीन, पोटॅशिअम, सिलिकॉन, कॉपर यासारखे पोषक घटक वालाच्या शेंगांमध्ये आढळतात.
- अॅनिमियाच्या समस्येवर वालाच्या शेंगांचे सेवन फायदेशीर ठरते.
- लोह मुबलक असल्याने शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत होते.
- नियमित सेवनामुळे रक्ताची कमतरता दूर होते.
अधिक वाचा: Light Trap : कीड नियंत्रणासाठी फवारणी ऐवजी करा ह्या सापळ्यांचा वापर