रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली, तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादनक्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून सेंद्रिय खतांची निर्मिती करून शेतामध्ये त्याचा वापर केला जातो. सेंद्रिय खतांमध्ये गांडूळ खताचा वापरही सर्वाधिक केला जात आहे.
टाकाऊपासून गांडूळ खतनिर्मिती केली जाते. बागायतीमध्ये तसेच परसदारातून गांडूळखत युनिट तयार करता येते. अनेक बचतगट गांडूळ खतनिर्मिती करून विक्री व्यवसाय करीत आहेत.
टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळाचा उपयोग केला असता गांडूळ सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्वण व पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात. या खतात गांडुळांची लहान पिल्ले व अंडकोष असतात.
गांडूळ खत तयार करण्यासाठी पिकांचे अवशेष, धस्कटे, पेंढा, ताटे, तूस, कोंडा, झाडांचा पालापाचोळा, गवत, जनावरांचे शेण, मूत्र, कोंबड्यांची विष्टा, हाडांचा चुरा, कातडी, घरातील केरकचरा, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न, हिरवळीच्या खतांची पिके, वनझाडांचा पालापाचोळा, घरातील सांडपाण्याचा मैला याचा वापर करण्यात येतो.
गांडूळाची मोठ्या प्रमाणात पैदास करण्यासाठी रक मित्र लांब, एक मीटर रुंद, ३० सेंटिमीटर उंचीचे लाकडी खोके अथवा सिमेंटच्या टाक्या अथवा प्लास्टिकच्या टबचा वापर करावा. खोक्याच्या तळाशी ३ सेंटिमीटर जाडीचा सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा (लाकडाचा भुसा, तूस, काथ्या अथवा पाचट) थर रचावा, त्यावर ३ सेंटिमीटर जाडीचा कुजलेल्या शेणखताचा अथवा शेणखत बागेतील मातीच्या मिश्रणाचा थर द्यावा.
प्रत्येक थरावर पाणी शिंपडून द्यावे. या थरावर १००० पूर्ण वाढ झालेली गांडुळे सोडावीत. त्यावर गांडुळाच्या खाद्याचा १५ सेंटिमीटर जाडीचा थर पसरावा. या खाद्यामध्ये १० भाग कुजलेले शेण, एक भाग भात अथवा गव्हाचा कोंडा, एक भाग हरभरा सालीचा कोंडा व एक भाग भाजीपाल्याचे अवशेष अथवा कुजलेला पालापाचोळा यांचे मिश्रण असावे.
या थरावर पाणी शिपडून ओले बारदाण अंथरावे. सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी खोके सावलीत ठेवावेत. उंदीर, घूस, मुंग्या, बेडूक यापासून गांडुळांचे संरक्षण करावे.
ढीग पद्धतीने गांडूळ खत उत्पादन- साधारणतः २.५ ते ३.० मीटर लांबीचे व ९० सेंटिमीटर रुंदीचे सेंद्रिय पदार्थाचे ढीग तयार करावेत. प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी.- ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यांसारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थाचा ३ ते ५ सेंटिमीटर जाडीचा थर रचावा.- त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या थरावर ३ ते ५ सेंटिमीटर जाडीचा थर रचावा.- त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे, या थरावर ३ ते ५ सेंटिमीटर जाडीचा शेणाचा अथवा बागेतील कुजलेला मातीचा थर रचावा.- गांडूळ खत २ ते २.५ महिन्यांत तयार होते. तयार खत सैल, भुसभुशीत, कणीदार, काळसर तपकिरी रंगाचे असते.
अधिक वाचा: Decomposer Solution; सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्रिया जलद करणारे हे द्रावण तयार करा घरच्याघरी