एखाद्या मालमत्तेमध्ये नाव असल्यास आणि त्या मालमत्तेमधून; मग ती मालमत्ता शेती असेल किंवा घर, जमीन काहीही असू शकेल, त्यामधून आपला मालकीहक्क कमी करण्यासाठी हक्कसोड पत्रावर सही केली जाते.
हे हक्कसोडपत्र कायदेशीररित्या बनवून घेतले जाते. हक्कसोडपत्राची नोंदणी न केल्यास त्याची सरकारदप्तरी नोंद घेतली जात नाही.
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ कलम १२३ नुसार कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण हे नोंदणी झालेल्या लेखाच्या माध्यमातून करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
हक्कसोडपत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा याचा संपूर्ण तपशील व हक्कसोडपत्र घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा याचा संपूर्ण तपशील, एकत्र कुटुंबाच्या वंशावळीचा कागद, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सानिहाय विवरण, दोन साक्षीदार व त्यांची नावे, वय, पत्ता याचा संपूर्ण तपशील आवश्यक असतो.
हक्कसोडपत्र तयार करायचे असल्यास तलाठी कार्यालयात जावे लागते. तेथेच या पत्राची नोंदणी होते आणि कागदपत्रांची देखील तपासणी केली जाते.
अधिक वाचा: Hakka Sod Patra : पीक कर्जासाठी हक्कसोडपत्राची साडेसाती; कसे करतात हक्कसोड पत्र?
संबंधित व्यक्तीने सादर केलेली सर्व कागदपत्रे आणि तपशील तलाठी कार्यालयात तपासले जातात. हक्कसोडपत्र नोंदणीकृत असले तरच गाव नमुना ६ मध्ये त्याची तलाठीद्वारे नोंद केली जाते आणि सर्व हिसतंबंधितांना नोटिस बजावली जाते.
याविषयी 'लोकमत'शी बोलताना महसूल विभागाचे तज्ज्ञ अजिंक्य कदम म्हणाले, 'वाटाघाटींमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी मालमत्तेच्या खटल्यांमध्ये हक्कसोड प्रमाणपत्र तयार केले जाते.
एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असतील तर ते त्यांचा हिस्सा सोडत असल्यास त्यांच्या नावे हक्कसोड प्रमाणपत्र देतात. त्यानंतर वंशपरंपरागत मालमत्तेत त्यांचा काहीही हक्क नाही, असा त्याचा अर्थ होतो.
एकदा नोंदणीकृत पद्धतीने हक्कसोडपत्र दिल्यानंतर मालमत्तेतून हक्क सोडलेल्या व्यक्तीचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कोणताही हक्क उरत नाही.
- प्रगती जाधव-पाटीलउपसंपादक, लोकमत, सातारा