सध्याच्या वातावरणामध्ये हळदीवर कंदमाशी या किडीचा आणि पानावरील ठिपके, करपा व कंदकुज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.
उपाययोजना
- कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस २५%- ४०० मिली (२० मिली प्रति १० लिटर पाण्यात) किंवा डायमिथोएट ३०%- ३०० मि.ली. (१५ मिली प्रति १० लिटर पाण्यात) यापैकी एका कीटकनाशकाची प्रति एकर या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.
- उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.
- जमिनीतून क्लोरपायरीफॉस ५०%- १००० मिली (५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात) घेऊन प्रति एकरी या प्रमाणात आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.
- पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापनासाठी करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.
- रासायनिक व्यवस्थापन
१) प्रादुर्भाव कमी असल्यासकार्बेडेंझीम ५०% - ४०० ग्रॅम (२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब ७५% - ५०० ग्रॅम (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५०% - ५०० ग्रॅम (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.२) प्रादुर्भाव जास्त असल्यासएजोक्सिस्ट्रोबीन १८.२% + डायफेनोकोनॅझोल ११.४% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - २०० मिली (१० मिली प्रति १० लिटर पाण्यात) किंवा प्रोपीकोनॅझोल २५% - २०० मिली (१० मिली प्रति १० लिटर पाण्यात) किंवा क्लोरथॅलोनील ७५% - ५०० ग्रॅम (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.
- हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.
- जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.
- कंदकूज झाली असल्यास जमिनीतून कार्बेडेंझीम ५०% - २०० ग्रॅम (१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब ७५% - ६०० ग्रॅम (३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५०% - १००० ग्रॅम (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी.
आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.
फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी- कुठलीही फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी- वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.- लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये.- फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.- किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.
संदर्भहळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली
अधिक माहितीसाठी संपर्क कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी02452-229000