हळद हे देशातील एक प्रमुख नगदी मसाला पीक आहे. हळदीचा उपयोग दैनंदिन आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. या गुणवैशिष्ट्यांमुळे हळदीला विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्र राज्याच्या एकूण हवामानाचा विचार केला असता हळद हे पीक उत्तमरीत्या घेता येते. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून हळद प्रक्रियेपर्यंत पिकाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
सध्या हळद लागवड होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हा काळ (४६ ते १५० दिवस) हळद पिकाची शाखीय वाढ होण्याचा असतो. यावेळी वातावरणात २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते, या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात.
हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते पावसाळ्यात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते.
नुकतीच पावसाने उघडीप दिली असून, हळद लागवडीमध्ये आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. आंतरमशागतीच्या कामांमध्ये भरणी, खते, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
आंतरमशागत (भरणी करणे)
हळदीच्या लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी हळदीचे पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. कारण या कालावधीमध्ये हळद पिकास फुटवे येण्यास व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्यांमधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्यांना लावणे म्हणजेच भरणी करणे होय, माती लावताना कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी.
खत व्यवस्थापन
हळद पिकांस रासायनिक खतांमध्ये हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीवेळी द्यावे. नत्राची मात्रा १ समान हप्त्यांत विभागून द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी, तर दुसरा हप्ता भरणीवेळी (लागवडीपासून २.५ ते ३ महिन्यांनी) द्यावा.
पाणी व्यवस्थापन
● पावसाचे पाणी जमिनीमध्ये साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकामध्ये पाणी साचून राहिल्यास मुळांना मुळांना ऑक्सिजन मिळण्यास अडथळा येतो. परिणामी, पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होतात. त्यासाठी शेतात साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.
● ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत दरवर्षी हमखास पाऊस होतो. त्यासाठी वाकोद्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे. पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलाया अभ्यासून सिंचनाचे नियोजन करावे.
● लागवड रुंद वरंबा पद्धतीने असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संचाचा कालावधी ठरवावा. सतत पाणी देणे टाळावे. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.
भरणीचे फायदे
● भरणी केल्यामुळे पावसामुळे उघडे पडलेले हळदीचे गड्डे पूर्णपणे झाकले जातात.
● गड्डे झाकल्यामुळे कंदमाशीसारख्या किडींना गड्ड्यांवर अंडी घालता येत नाहीत. त्यामुळे या किडीची पुढील पिढी नष्ट होण्यास मदत होते. तसेच कंदकुज रोगाला देखील आळा बसतो.
● उघड्या गड्ड्याच्या बाजूने नव्याने येणारी हळकुंडे संपूर्ण झाकली जातात. त्यांची चांगली वाढ होते.
● भरणी करतेवेळी शिफारस केलेली खतमात्रा दिल्यामुळे संपूर्ण खते मातीखाली झाकली जातात. त्यामुळे खतांचा ऱ्हास, अपव्यय होत नाही.
● दिलेली खतमात्रा पिकाच्या मुळांजवळ पडल्यामुळे पिकास चांगला फायदा होतो. खतांची कार्यक्षमता वाढते.
डॉ. मनोज माळी
प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज