भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. त्यासाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये सातत्याने विचार होणे गरजेचे आहे
लागवडीसाठी बेणे निवड कशी कराल?- हळदीचे पीक खरीप हंगामात शक्य असून, चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. हळदीची लागवड करण्यासाठी बेणे निवडण्यात दक्षता घेणे जरुरीचे आहे.- हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते.- प्रत्येक जेठा गड्ड्यावर आठ ते दहा कोंब असतात. लागवडीसाठी वापरण्यात येणारे बेणे जून किंवा डोळे फुटलेले ४० ग्रॅम वजनाचे, मुळ्याविरहित असावे.- नासके, कुजके गड्डे बियाण्यासाठी वापरू नयेत.
बेणे प्रक्रिया - लागवडीपूर्व किडींचा आणि बुरशीजन्य रोगजंतूचा नाश करण्याच्या दृष्टीने बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.- त्यासाठी क्वीनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली १० ग्रॅम कान्डेझीम १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. - या द्रावणात बियाणे कमीत कमी १५ ते २० मिनिटे बुडवून घेऊन सावलीत सुकवून लागवडीसाठी वापरावे.
लागवड कशी केली जाते?- हेक्टरी साधारणपणे २५ क्विंटल बियाणे लागते. हळदीची लागवड दोन प्रकारे केली जाते.- रानबांधणी केल्यानंतर प्रथम मोकळ्या जमिनीत पाणी देऊन वाफसा आल्यानंतर लहान कुदळीने अगर खुरपीने माती उकलून गड्डे लागण करावी.- यामुळे बियाणे योग्य अंतरावर व खोलीवर लावले जाते. दुसऱ्या पद्धतीने लागवड करताना रानबांधणी केल्यानंतर त्यामध्ये पाणी सोडले जाते.- पाण्याबरोबर सरीच्या दोन्ही बाजूला गड्डे लावतात. या पद्धतीला गड्डे मातीत खोल जाण्याची आणि दोन गड्यांतील अंतर सारखे न राहण्याची शक्यता असते.- त्यामध्ये बियाणे जास्त लागणे, गॅप पडणे, उगवण होऊन गड्डे कुजणे इत्यादी संभाव्य धोके येतात.
खत व्यवस्थापन कसे कराल?- हळद पिकाला सेंद्रीय खतांचा भरपूर वापर करावा.- जमिनीच्या प्रकारानुसार हेक्टरी २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी देऊन मातीत चांगले मिसळावे.- याशिवाय १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ६० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.- यापैकी संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी द्यावे आणि नत्र खताची मात्रा दोन किंवा तीन हप्त्यांत विभागून लागवडीपासून दीड, तीन व साडेचार महिन्यांनी द्यावी.- हळदीच्या ओळी लगत चर घेऊन त्यात खत टाकून मातीने झाकून घ्यावे व नंतर पाणी द्यावे.
पाणी व्यवस्थापन- वेळोवेळी ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी.- हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात खत टाकून मातीने झाकून घ्यावे व नंतर पाणी द्यावे.- पीक नऊ महिन्यांचे झाले म्हणजे काढणीस येते.- संपूर्ण रोप दांड्यासह जमिनीवर लोळले की, पाणी देणे बंद करावे.
काढणी व उत्पादन- हळदीचे पीक ८ ते ९ महिन्यांत तयार होते. गड्डे पक्के झाल्यावर हळदीची पाने पिवळी पडून सुकू लागतात आणि जमिनीवर लोळतात.- काढणी अगोदर जमिनीच्या मगदुरानुसार १५ दिवस ते एक महिना पिकाला पाणी देणे बंद करावे, वाळलेला पाला जमिनीलगत विळ्याने कापून द्यावा.- हळदीची काढणी योग्य ओलावा असल्याचे पाहून कंद कुदळीने खणून काढावेत, गड्यांना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
अधिक वाचा: Crop Production Competition: पीक जोमात वाढवा अन् भरघोस बक्षिसं जिंका.. आजच व्हा स्पर्धेत सहभागी