हरभरा हे महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे रब्बी पीक आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्यात असलेली नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता.
मुळावरील ग्रंथीतील रायझोबीयम जीवाणुमार्फत हवेतील १३५ किलो नत्र/हेक्टर शोषुन त्याचे स्थिरीकरण केले जाते. त्यामुळे पुढील पिकास नत्र खताची उपलब्धता होते व जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.
महाराष्ट्रात हे पीक मुख्यतः कोरडवाहू क्षेत्रात घेण्यात येते. पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देवून सुधारित वाणांचा वापर केल्यास कोरडवाहू क्षेत्रासुद्धा चांगले उत्पादन मिळते.
पेरणीची वेळ
१) जिरायत हरभऱ्याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच २० सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर पर्यंत करावी.
२) हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरूवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभऱ्याची उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
३) जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१० सेमी) पेरणी करावी.
४) बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी.
५) बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ सेमी) हरभरा पेरणी केली तरी चालते.
६) पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशीरा आणि कमी होते.
७) पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात.
८) १० नोव्हेंबर नंतर पेरणी १५ दिवसांनी व ३० दिवसांनी उशीरा केल्यास उत्पादनात अनुक्रमे २७ ते ४० % नुकसान होते.
बीजप्रकिया आणि जीवाणूसंवर्धन
१) बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बिजप्रक्रीया करावी.
२) यांनतर १० किलो बियाण्यास रायझोबियम जीवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाचे एका पाकीटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
३) बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.
४) यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेवून पिकास उपलब्ध केला जातो.