Harbhara Rog Niyantran : हरभरा पिकातील रोगांची माहिती आपण भाग-१ मध्ये घेतली. मागील भागात आपण पाहिले की, हरभरा पिकावर मानकुजव्या, मर, कोरडी मुळकुज या रोगाची सविस्तर माहिती घेतली.
आज आपण पाहणार आहोत, ओली मुळकुज, तांबेरा, खुजा रोग, पर्णगुच्छ, भुरी आदी रोगांची कसे व्यवस्थापन करायचे या विषयीची सविस्तर माहिती घेऊ यात.
हरभरा पिकातील प्रमुख रोग
१. ओली मुळकुज : हा बुरशीजन्य रोग असून रायझोक्टोनिया सोल्यानी या बुरशीमुळे होतो. पिकावर रोगाची लागण रोप अवस्थेतच होते. जमिनीमध्ये ओलावा अधिक असल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. रोगाची लागण झाली असल्यास ओलसर मूळ सडून रोपे पिवळी पडतात आणि मरतात.नियंत्रण / उपाय• उन्हाळ्यात जमिनीत खोल नांगरट करावी, जेणेकरून सूर्यकिरणांमुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील.• शेतामध्ये वनस्पतीचे कुजके अवशेष, काशा, धसकटे व काडी कचरा असू नयेत.• शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.• शेतजमिनीत सतत एकच पिक घेणे टाळल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्यास आळा बसतो.• शेतजमिनीत पिकांची फेरपालट आणि आंतरपिकाचा समावेश करावा. • रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करणे.• पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करणे अथवा शेतातील अधिकचे पाणी बाहेर काढण्यासाठी चर काढावेत.• बीजप्रक्रिया करताना २.५ ग्रॅम कार्बेंडिझम (आंतरप्रवाही) आणि २.५ ग्रॅम थायरम (स्पर्शजन्य) बुरशीनाशक प्रतिकिलो बियाण्यास लावावे.
२. तांबेरा • तांबेरा हा रोग युरोमायसीस सिसेरी अरीएन्टीनी या बुरशीमुळे होतो.• महाराष्ट्रामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून गेल्या दोन वर्षापुर्वी मराठवाड्यामध्ये सुद्धा या रोगाचा प्रसार दिसून आला होता.• पिक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतांना रोगाची लागण झाल्याचे आढळते.• पानांवर लहान गोलाकार तपकिरी रंगाची पावडर पडल्याचे दिसून येते.• पानांच्या खालील बाजूस पुंजके व ठिपके दिसून येतात तथापि काही वेळेला ठिपके खोडावर सुद्धा दिसतात. • रोगाची तीव्रता अधिक असल्यास संपूर्ण झाडावर तपकिरी रंगाची पावडर पसरल्यासारखी दिसते. नियंत्रण / उपाय• एकाच शेतजमिनीत सतत एकच पिक घेतल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून ते टाळण्यासाठी किमान तीन वर्षांनी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे.• शेतीमध्ये आंतरपिकाचा समावेश करावा.• हा रोग मावा किडींद्वारे प्रसारित होतो.• विषाणूवाहक कीटकांच्या नियंत्रणा करीता आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.• रोगग्रस्त झाडे उपटून समूळ नष्ट करावीत.३. खुजा रोग• हा रोग विषाणुजन्य आहे यास इंग्रजी भाषेमध्ये स्टण्ट डीसीज असे म्हणतात.लक्षणे:• ह्या रोगाची लागण झाल्यास पाने नारंगी, तांबूस होतात व रोपे खुजी होतात.• अन्ननलीकेचे बाह्य आवरण तांबूस गुलाबी रंगाचे होते. • पिकाचे पाने लालसर व पिवळी पडतात.• ह्या रोगामुळे हरभरा पिक खुजे होते तसेच फुले व घाटे कमी लागतात आणि उत्पादनामध्ये घट होते. नियंत्रण / उपाय• एकाच शेतजमिनीत सतत एकच पिक घेतल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून ते टाळण्यासाठी किमान तीन वर्षांनी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे.• शेती मध्ये आंतर पिकाचा समावेश करावा.• हा रोग मावा किडींद्वारे प्रसारित होतो.• विषाणूवाहक कीटकांच्या नियंत्रणा करिता आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.• रोगग्रस्त झाडे उपटून समूळ नष्ट करावीत.
४. पर्णगुच्छ• हा रोग मायकोप्लाझ्मा या सूक्ष्म जीवाणूमुळे होतो.लक्षणे:• रोगाची लागण झाल्यास हरभरा पिकातील फुलोऱ्याचा भाग पर्णगुछ्यामध्ये रुपांतरीत होतो.• पिकातील पर्णगुच्छ रोगग्रस्त हरभरा विखुरलेल्या अवस्थेत दिसतो.• या रोगामध्ये हरभरा पिकास फुले व घाटे लागत नाहीत आणि हरभऱ्याच्या पानांचा गुच्छ दिसतो. पाने छोटी व खोड चपटे झालेले असते, तसेच पेऱ्यातील अंतर कमी होते.• हा रोग तुडतुडे या किडींमुळे रोगग्रस्त हरभरा पिकावरून निरोगी हरभरा पिकावर पसरतो. नियंत्रण / उपाय• लक्षणे दिसताच टेट्रासायक्लीनची २५० पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.• रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.• तुडतुड्यांचा बंदोबस्त केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसतो.
५. भुरी • हा रोग लेव्हील्युल्ला टवरिका या बुरशीमुळे होतो. • हा रोग प्रामुख्याने फुलोऱ्यात अथवा घाटे लागणीच्या वेळी दिसून येतो.लक्षणे:• भुरी रोगामुळे सुरुवातीस पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरी बुरशी दिसते व कालांतराने संपूर्ण पान बुरशीमुळे पांढरे दिसते.• आर्द्रता ८० % पेक्षा अधिक असल्यास रोग जास्त प्रमाणात बळावतो व वातावरण रोगाच्या वाढीस पोषक ठरते. • पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव खोड व कोवळी पाने आणि घाटे यावर सुद्धा दिसून येतो. • हवेतील अधिकची आर्द्रता या रोगाच्या वाढीस अनुकूल ठरते.• हरभरा पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव हा सभोवतालच्या तणांवर येणाऱ्या भूरीमुळे वाढतो.
नियंत्रण / उपाय• शेत व शेतालगतचा भाग तसेच बांध तण विरहित ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.• पिकावर रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात मिसळणारे गंधक ८० % डब्ल्यू पी २५ ग्रॅम १० लिटर पाण्यामध्ये किंवा कार्बेंडिझम ५० % डब्ल्यू पी १० ग्रॅम १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.• आवश्यकतेनुसार पुढील फवारणी आठ ते दहा दिवसांच्या अंतराने करावी.• रोग प्रतिकारक व प्रतिबंधक वाणाची निवड करावी. ६. करपा • हा रोग अस्कोचायटा राबेई या बुरशीमुळे होतो.• हा रोग प्रामुख्याने फुलोऱ्यात अथवा घाटे लागणीच्या वेळी दिसून येतो. पानांवर तपकिरी रंगांचे ठिपके दिसून येतात. • रोगाची तीव्रता जास्त असल्यास सर्वच फांद्यावर व पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसू लागतात.• ढगाळ वातावरणात या रोगाचा प्रसार अधिक होतो.• रोगाची तीव्रता वाढल्यास तपकिरी रंगाचे ठिपके झाडाच्या पानांवर, फांद्यावर, घाट्यावर आणि बियावर आढळतात. नियंत्रण / उपाय• शेत व शेतालगतचा भाग तसेच बांध तण विरहीत ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.• रोग प्रतिकारक व प्रतिबंधक वाणाची निवड करावी.• पिकाची फेरपालट करावी.• रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.• गहू किंवा मोहरी पिकासोबत पेरणी करावी.• थायरम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
हरभरा पिकांच्या रोगांची माहिती आपण घेतली त्याच बरोबर उपाय योजनांची माहिती आपण घेतली त्याच बरोबरच भाग -१ आणि भाग-२ इथे संपला.
- डॉ. प्रशांत सोनटक्के आणि डॉ. किरण जाधव
(लेखक कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथे कार्यरत आहेत.)