Harbhara Rog Niyantran : हरभरा पिकावर येणारे काही प्रमुख रोग रोगांची लक्षणे काय आहेत आणि त्यावर काय उपाय योजना आहेत. ते पाहुया सविस्तर
१. मानकुजव्या
हरभरा पिकातील मानकुज हा रोग स्क्लेरोशीअम रोल्फ्साय ह्या बुरशीमुळे होतो. प्रामुख्याने सुरवातीच्या अवस्थेत हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
लक्षणे:• रोपे पिवळी पडतात आणि कोलमडतात.• बुरशीचे तंतू व बीजे ही पांढऱ्या रंगाची असून मुळावर व जमिनीलगतच्या खोडावर स्पष्टपणे आढळून येतात.• जमिनीलगत खोडावर तांबूस काळसर रंगाची गोलाकार कडा दिसते.• रोप अवस्थेत जमिनीतील ओलावा वाढल्यास रोपे जमिनीलगत खोडापासून कोलमडतात.
नियंत्रण / उपाय• उन्हाळ्यात जमिनीत खोल नांगरट करावी, जेणेकरून सूर्यकिरणांमुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील.• शेतामध्ये वनस्पतीचे कुजके अवशेष, काशा, धसकटे व काडी कचरा असू नयेत.• शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.• एकाच जमिनीत सतत एकच पिक घेतल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून ते टाळण्यासाठी किमान तीन वर्षांनी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे.• शेतात आंतरपिकाचा समावेश करावा.• बीजप्रक्रीया करताना २.५ ग्रॅम कार्बनड्याझीम (आंतरप्रवाही) आणि २.५ ग्रॅम थायरम (स्पर्शजन्य) बुरशीनाशक प्रतिकिलो बियाण्यास लावावे. • जमिनी लगतच्या खोडावर पांढरट बुरशीची कडा दिसल्यानंतर मॅन्कोझेब २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२. मर• हा हरभरा पिकातील अतिशय महत्वाचा रोग असून याची लागण फ्युजारियम ऑक्सीस्फोरम सिसेरी ह्या बुरशीमुळे होते. • या रोगामुळे भारतात सरसरी १५-२० टक्के नुकसान होते. • रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास ७०-१०० टक्क्यांपर्यंत नुकसान संभावते. रोगाचा प्रसार मातीतून तसेच बियाण्याद्वारे होतो.लक्षणे:• उष्ण व कोरड्या वातावरणातील लागवड क्षेत्रात तसेच पाणी धरून ठेवणार्या व चोपण जमिनीत या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होते.• रोगाची लागण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत होऊन मर होते. रोगग्रस्त झाडाच्या मुळाच्या आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा दिसून येतो.• फांद्या जमिनीच्या दिशेने लोंबकळल्या सारख्या दिसतात.
नियंत्रण / उपाय• रोगाचा प्रसार बियाणे व मातीमधून होत असल्यामुळे या रोगाच्या नियंत्रणाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजना महत्वाच्या ठरतात.• उन्हाळ्यात जमिनीत खोल नांगरट करावी, जेणेकरून सूर्यकिरणांमुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील.• शेतामध्ये वनस्पतीचे कुजके अवशेष, काशा, धसकटे व काडी कचरा असू नयेत.• शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.• रोगट झाडे दिसताक्षणी उपटून नष्ट करावीत. • बीज प्रक्रिया करताना कार्बेंडिझम २.५ ग्रॅम. किंवा ट्रायकोडर्मा/बायोमिक्स १२ ग्रॅम. प्रति किलो बियाण्यास लावावे. • रोग प्रतिकारक वाणांची निवड करावी. • पिकाची फेरपालट करावी. • ट्रायकोडर्मा/ बायोमिक्स १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करिता वापरावे.• रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास २०० ग्रॅम ट्रायकोडर्मा/बायोमिक्स १० लिटर पाण्यात या प्रमाणात द्रावण करून आळवणी करावी.
३. कोरडी मुळकुज • हा रोग रायझोक्टोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे होतो.• जमिनीमध्ये पाण्याची कमतरता असल्यास / झाल्यास ह्या रोगचा प्रादुर्भाव वाढतो.• घाटे भरण्याच्या अवस्थेपासून ते पिक काढणी पर्यंत कोरडी मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.लक्षणे:• रोगाची लागण झाल्यास पिकातील मुळे कोरडी / शुष्क होऊन कुजतात, तसेच उपमुळे झडतात परिणामी मुख्य मूळ कुजून झाडे वाळतात.• रोगग्रस्त झाडाची पाहणी केली असता अथवा उपटल्यास जमिनीलगतचा भाग सहज हातात येतो व मुळे जमिनीतच राहतात.
नियंत्रण / उपाय• उन्हाळ्यात जमिनीत खोल नांगरट करावी, जेणेकरून सूर्यकिरणांमुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील.• शेतामध्ये वनस्पतीचे कुजके अवशेष, काशा, धसकटे व काडी कचरा असू नयेत.• शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.• एकाच जमिनीत सतत एकच पीक घेतल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून ते टाळण्यासाठी किमान तीन वर्षांनी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे.• पिकातील घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे तसेच जमिनीत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घावी.• बीजप्रक्रीया करताना २.५ ग्रॅम कार्बेंडिझम (आंतरप्रवाही) आणि २.५ ग्रॅम थायरम (स्पर्शजन्य) बुरशीनाशक प्रतिकिलो बियाण्यास लावावे. • ट्रायकोडर्मा/बायोमिक्स १० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. • रोग प्रतिबंधक वाणांचा वापर करावा .
हरभरा पिकांच्या इतर रोग, लक्षणे आणि उपाय योजना यांची माहिती आपण भाग-२ मध्ये पाहणार आहोत.
- डॉ. प्रशांत सोनटक्के आणि डॉ. किरण जाधव
(लेखक कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथे कार्यरत आहेत)