पिक उत्पादनात मशागातीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक आहे. पीकनिहाय वेगवेगळ्या प्रकारची तणे आढळतात. सद्यस्थितीत तणनाशके फवारली तरीही तण नियंत्रण होत नाही असे दिसत आहे अशावेळी तणनाशकांची फेरपालट करणे जरुरीचे ठरते.
जशी आपण पिकाची फेरपालट करतो त्यामुळे मातीचा पोत उत्तम राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तणनाशकांचा फेरपालटीत वापर केला तर तणांस अटकाव होऊ शकतो.
तण नियंत्रणातील महत्त्वाचे घटक१) जमिनीचा प्रकार२) पाण्याची उपलब्धता३) पिकांमधील अंतर आणि वाढीचा वेग४) खत देण्याच्या पद्धती५) मनुष्यबळाची उपलब्धता६) पूर्वीचे आणि नंतरचे घेण्यात येणारे पिक७) तणनाशकांबद्दलचे ज्ञान आणि कुशलता
तण नियंत्रणाचे प्रकार१) पीक लागवड पद्धती: पिकांचा फेरपालट, जोमाने वाढणाऱ्या पिकांची निवड, खत आणि पाणी देण्याच्या पद्धती.२) यांत्रिकी: खुरपणी, कोळपणी, नांगरणी इत्यादी३) तण नाशकांचा वापर: पेरणीपूर्वी, पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी आणि पीक उगवल्यानंतर वापरण्यात येणारी तणनाशके४) जैविक तण नियंत्रण: यात जैविक घटकांचा वापर करून तण नियंत्रण करू शकतो.
विविध पिकातील तण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कालावधी१) सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी - १५ ते ४५ दिवस२) तूर आणि कापूस - १५ ते ९० दिवस३) मूग आणि उडीद - पंधरा ते तीस दिवस४) ऊस - तीस ते नव्वद दिवस५) हळद आणि आले - तीस ते १२० दिवस
तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी१) प्रत्येक वेळी पंप स्वच्छ धुणे आवश्यक.२) निवडक तणनाशकांचा वापर करताना मात्रा आणि वेळ महत्त्वाची.३) वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन फवारणी करणे आवश्यक.४) पंपाची कार्यक्षमता तपासून तणनाशकांची मात्रा ठरवणे आवश्यक.५) तणनाशकांच्या फवारणीसाठी डब्ल्यू एफ एन नोझलचा वापर करावा.
वरील सर्व बाबींचा विचार करून तणनाशकांचा वापर केल्यास तणांवर नियंत्रण आणू शकतो. शक्यतो तणनाशक जेवढी मात्रा दिली आहे तेवढीच वापरावे, एकच तणनाशक पुन्हा पुन्हा एकाच पिकात वापरले तर त्या तणनाशकाने तण नियंत्रण काहीश्या प्रमाणात कमी होताना दिसते आहे यात आपण तणनाशकांची फेरपालट केली तर नियंत्रणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.