उन्हाळ्यामध्ये जमीन मशागत भारतात तीनही हंगामात मोठ्या प्रमाणात वर्षभर विविध पिके घेतली जातात परंतू खरीप हंगामात पुरेशा पावसाच्या पाण्याची उपलब्धतता असल्याने खरीपमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली जाते.
पावसाळ्यात जमिनी ओल्या होऊन प्रसरण पावतात आणि उन्हाळयात कोरड्या होऊन आकुंचन पावतात तसेच वर्षभर पिके घेऊन जमिनी घट्ट होतात म्हणुन उन्हाळी मशागत महत्वाची ठरते.
१) जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात कमी होते- जमिनीमध्ये चांगले पिक येण्याकरीता जमिनीचे भौतिक, रायसानिक आणि जैविक गुणधर्म टिकवून ठेवणे फार गरजेचे आहे. खरीप आणि रबी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून तापू दिली जाते. ही एक महत्वाची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात.- पूर्वी बैल नांगराने अशी जमिनीची मशागत व्हायची परंतू आता ती ट्रॅक्टरद्वारे केली जाते. ट्रॅक्टर मदतीने एक ते दीड फुट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले की १५ से.मी. खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते.- सध्या तिन्ही हंगामात पिके घेतली जात असल्याने जमिनीत सतत ओलावा असतो त्यामुळे जमिनीत बुरशीचे प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. परिणामी यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून बरेचदा पीक सुद्धा हाती येत नाही किंवा उत्पादन कमी होते.- अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोषावस्थेत जातात त्या नष्ट होतात.
२) जमिनीची विद्युत वाहकता (इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी) वाढते- मशागतीमुळे आधीच्या हंगामातील पिकांमुळे घट्ट झालेले मातीचे कण मोकळे होऊन पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत होते.- त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही.- नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते. शिवाय जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढते.
३) जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांची वाढ होते - मातीत ओलावा राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांची हालचाल व वाढ होण्यास मदत होते व परिणामी जमिनीची उत्पादकता वाढते.
४) इतर महत्वजमिन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते, सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. तसेच जमिनीतील पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची घनता वाढते. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो.