पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव पिक पेरणी पासून ते काढणी पर्यंत दिसून येतो. पिक व्यवस्थापनात पिक संरक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. महागडी कीटकनाशके फवारली जातात. परंतु किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखून व्यवस्थापन केल्यास कीड व्यवस्थापनात चांगले परिणाम दिसून येतात.
कीटकनाशके फवारणी टाळण्यास आपण काही उपाययोजना करू शकतो त्यात पेरणी व काढणीची वेळ, वाणांची निवड, शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर, आंतरपीक पध्दती, पिकांची फेरपालट, पाण्याची मात्रा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आपण सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळ्यांचा वापर कसा करायचा ते पाहूया.
१) सापळा पिकमुख्य पिकांचे हानीकारक किडींपासुन संरक्षण करण्याच्या उददेशाने किडींना बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावले जाते. सापळा पिकाची लागवड शेताच्या चारी बाजुंनी करतात. मुख्य पिकाच्या क्षेत्रानुसार सापळा पिकाची घनता ठरवावी.- सापळा पिक हे मुख्य पिकाच्या जीवनकाळात सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.- मुख्य पिकाशी अन्नद्रव्य, पाणी, जागा याला कमी स्पर्धा करणारे असावे.- टप्याने सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज, आळया कोष आणि प्रौढ अवस्था गोळा करुन नष्ट कराव्यात. उदा. कापुस पिकात पिवळ्या रंगाचे झेंडु सापळा पिक हे हिरव्या बोंड अळी करीता (तसेच झेंडुमुळे सुत्रकृमी नियंत्रण होते)
२) पक्षी थांबेहानिकारक किडींपासुन पिकांचे संरक्षण करण्यामध्ये पक्षांची महत्वाची भुमिका आहे. ९०% पक्षी मांसाहारी आहेत. सुमारे ३३% नियंत्रण पक्षांमार्फत होऊ शकते. शेतामध्ये मध्यापेक्षा बांधावर आणि झाडाच्या जवळ किडींचे प्रमाण कमी असते. पक्षांपासुन होणारा फायदा पाहता काही प्रसंगी पक्षांपासुन होणारे नुकसान गौण ठरते.- कपाशी लागवड करताना बियासोबत मका व सुर्यफुलांचे दाने मिसळुन लावावेत.- हरभरा किंवा कपाशी पिकांत सकाळी पक्षांना दिसेल अशा उंचीवर भात ठेवावा त्यामुळे पक्षी आकर्षित होतात.- टीव्ही अँटेनाप्रमाणे शेतात काही ठिकाणी लाकडी पक्षी थांबे उभा केल्यास पक्षांना बसण्यास जागा उपलब्ध होते.- पक्षांकरीता पाण्याची व घरटयांची सोय करावी जेणेकरुन पक्षी कायमचे शेतात थांबतात.
३) चिकट सापळकोणत्याही पिकामध्ये रससोशक किडी जसे मावा, तुडतुडे, फुलकिडे, ढालकिडे, नागअळी, पांढरी माशी इत्यादी पिकांच्या वाढीच्या अवस्थेत हल्ला करतात. त्यामुळे पिकांच्या वाढीचा वेग मंदावतो व यांनी केलेल्या घावातून बुरशीजन्य रोगांची लागन होते तसेच या किडींमुळे विषाणुजन्य रोगांचाही प्रसार होतो. त्यामुळे त्यावर पिवळे चिकट सापळे प्रभावी ठरतात.- शक्यतो कोरुगेटेड शीट पासुन बनवलेले सापळे वापरावेत.- विशिष्ठ पिवळ्या किंवा निळ्या रंगामुळे किड्यांना नवीन पालवी असल्याचा भास होतो व सापळ्याकडे आकर्षित होतात, एकदा सापळ्यावर बसली की चिकट द्रवामुळे किड अडकते व मरते.- चिकट सापळ्यांची उंची पिकाच्या थोडी वर ठेवावी.- किडींचा प्रकार व संख्येचे निरीक्षण करण्यासाठी एकरी ६ सापळे लावावीत.- सापळ्यांचा माध्यमातुन किड नियंत्रण करायचे असल्यास एकरी १२ ते १८ सापळे वापरावेत. तर किड नियंत्रणाबाहेर जात असेल तर सापळ्यांची संख्या वाढवत जावी.- जेव्हा सापळ्यांचा पृष्ठभाग किडींनी भरुन जाईल तेव्हा नवीन सापळे वापरात घ्यावेत.
अधिक वाचा: Nimboli Ark : पाच टक्क्याचा निंबोळी अर्क घरच्या घरी कसा बनवाल वाचा सविस्तर