Join us

बैलगाडा शर्यतीमुळे खिल्लार गोवंशाला कसं मिळालं पुनर्जीवन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 8:12 AM

खिल्लार हे या परिसरातील शेतकऱ्यांचे उदर्निर्वाहाचे साधन आहे

- दत्ता लवांडे

खिल्लार म्हणजे महाराष्ट्राची शान असं आपण म्हणतो. खिल्लार हा गोवंश दिसायलाही तेवढाच देखणा असतो. या बैलांना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला जुंपण्याचा मान मिळतो. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीमध्ये खिल्लारचा सर्वांत जास्त वापर केला जातो. सध्या शेतीमध्ये आधुनिकीकरण झाल्यामुळे बैलाने शेतीतील कामे करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 

केंद्र सरकारने ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती त्यावेळी या खिल्लार गोवंशाचे अस्तित्व संपेल असं वाटत होतं पण आता शर्यती पुन्हा सुरू केल्याने खिल्लार पाळणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या गोवंशाला पुनर्जीवन मिळाल्यासारखं झालं आहे असं मत सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शेतकरी आणि बैलगाडा शर्यतप्रेमी राहुल जाधव (बापू) यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा खिल्लारला मागणी वाढली असून अनेक शेतकरी यावर उदर्निर्वाह चालवतात. 

या परिसरातील शेतकऱ्यांच्या उदर्निर्वाहाचे साधनमहाराष्ट्रातील माण, खटाव, आटपाडी, सांगली, पंढरपूर, सोलापूर आणि कर्नाटकात खिल्लारची पैदास जास्त होते. या परिसरात जास्त परिसर दुष्काळी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उदर्निर्वाहाचे साधन म्हणजे खिल्लार होय. दुष्काळी भाग असल्यामुळे सोयाबीन, ज्वारी ही या परिसरातील मुख्य पीके आहेत. तर जोडधंदा म्हणून खिल्लारचे संगोपन केले जाते. एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असला किंवा पैशांची गरज भासल्यास एक जनावर विकून ते काम केले जाते.  

राहुल जाधव यांना शर्यतीतून मिळालेली बक्षिसे

खिल्लारची मागणी वाढलीशर्यती सुरू झाल्यामुळे पुन्हा आता खिल्लारला शेतकऱ्यांची आणि बैलगाडा प्रेमींची मागणी वाढली आहे. शर्यतीमध्ये फायनल किंवा सेमीफायनलपर्यंत जाणाऱ्या बैलाला चांगली किंमत मिळते. मोठी शर्यत जिंकणाऱ्या बैलाला एक कोटीपर्यंत बोली लागते. तर पहिला राऊंड काढणाऱ्या सहा ते सात लाखांपर्यंत बोली लागते. एका बैलाला चांगलं शिकवलं आणि त्याने शर्यतीत पहिल्या दहामध्ये नंबर काढला तर त्याची किंमत १० लाखांच्या पुढे जाते असं राहुल जाधव यांनी सांगितलं. 

अन् खिल्लारला मिळाले पुनर्जीवन शेतीची कामे करण्यासाठी यंत्रे आल्यामुळे खिल्लार सध्या फक्त शर्यतीसाठी वापरले जातात. काही लोक हौस म्हणून हे बैल पाळत असतात पण शर्यतीवर बंदी आल्यानंतर खिल्लारला मागणी खूप कमी झाली होती. ज्या बैलाला एक कोटीपर्यंत बोली लागली होती त्या बैलांच्या किंमती एक लाख आणि दोन लाखांपर्यंत आल्या होत्या. १० ते १५ लाखांना मागिलेले बैल शर्यतबंदीच्या काळात ५० आणि ६० हजारला विकावे लागले. पण बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर पुन्हा या गोवंशाला मागणी वाढली आहे. 

बैलगाडा शर्यतीबद्दलची आवड घराच्या भिंतीवरील या चित्रावरून दिसून येते

मी लहानपणापासून खिल्लार पाळतोय. हा दुष्काळी भाग असून शेतीसाठी पाणी नसल्यामुळे खिल्लार हेच माझ्या उदर्निर्वाहाचे साधन आहे. माझ्या घरात काही कार्यक्रम असला किंवा पैशांची गरज भासल्यास एक बैल विकायचा आणि तो खर्च भागवतो. शर्यतबंदीच्या काळात शेतकरी हतबल झाले होते पण शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर खिल्लारचे पुनर्जीवन झाले आहे असं म्हणायला हरकत नाही. - राहूल जाधव (बापू) पुसेगाव, बैलगाडा शर्यतप्रेमी शेतकरी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसातारा परिसर