Lokmat Agro >स्मार्ट शेती > ..अन् महाराष्ट्रातील नारायणगाव-जुन्नर परिसर बनला 'टोमॅटो हब'; कशी झाली सुरुवात?

..अन् महाराष्ट्रातील नारायणगाव-जुन्नर परिसर बनला 'टोमॅटो हब'; कशी झाली सुरुवात?

How did tomato cultivation start in Narayangaon-Junnar area? | ..अन् महाराष्ट्रातील नारायणगाव-जुन्नर परिसर बनला 'टोमॅटो हब'; कशी झाली सुरुवात?

..अन् महाराष्ट्रातील नारायणगाव-जुन्नर परिसर बनला 'टोमॅटो हब'; कशी झाली सुरुवात?

टोमॅटो हे पिक आज उन्हाळी हंगामातील महत्वाचे पिक ठरले आणि पुढे जाऊन हा टोमॅटोचा हंगाम म्हणून पुढे आला. सन १९८२ नंतर टोमॅटो पिकाचे क्षेत्र विस्तारास वेग मिळाला आणि आज नारायणगाव जुन्नर परिसर टोमॅटोचे आगर म्हणून ओळख निर्माण झाली

टोमॅटो हे पिक आज उन्हाळी हंगामातील महत्वाचे पिक ठरले आणि पुढे जाऊन हा टोमॅटोचा हंगाम म्हणून पुढे आला. सन १९८२ नंतर टोमॅटो पिकाचे क्षेत्र विस्तारास वेग मिळाला आणि आज नारायणगाव जुन्नर परिसर टोमॅटोचे आगर म्हणून ओळख निर्माण झाली

शेअर :

Join us
Join usNext

कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी १९७८ साली सर्व प्रथम टोमॅटो पिक नारायणगाव येथे आणले व त्याचा प्रसार केला. हा लेख त्यांचा अनुभवाचा परिपाक आहे. सदरील लेख हा त्यांच्या अनुभवाचे बोल विषद करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

काळ असेल सन १९७८-७९ चा. त्यावेळी आम्ही द्राक्ष बागायतदार एप्रिल मध्ये छाटण्या झाल्यानंतर असलेल्या मजुरांना काय काम द्यावे असा प्रश्न असायचा. त्याच दरम्यान दिल्ली येथील एका कृषी प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी त्या कृषी प्रदर्शनामध्ये आम्हाला इंडो अमेरिकन कंपनीचे दालन भेटले. त्या ठिकाणी टोमॅटो पिकाची माहिती मिळाली. या पिकाची सर्व माहिती घेतल्यानंतर आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना नारायणगावला येण्याची विनंती केली. त्यांनी आमची विनंती मान्य केली व त्वरित या ठिकाणी येऊन आमच्या जमिनींची पाहणी केली. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी येथील जमिनी टोमॅटो पिकविण्यासाठी अनुकूल आहेत असे सांगितले. त्यावेळी त्यांनी आम्हाला टोमतोचे F1 हायब्रीड बियाणे ट्रायलसाठी दिले. पुढील दोन वर्षे आम्ही एप्रिल मे च्या कालावधीत आमच्या-आमच्या शेतामध्ये टोमॅटो लागवड करून पाहिली आणि त्या यशस्वी देखील झाल्या. दरम्यान द्राक्ष मजुरांना एप्रिल ते सप्टेबर कालावधीत काम मिळाले आणि पुढे जाऊन टोमॅटो हे पिक जुन्नर तालुक्यातील उन्हाळी हंगामातील हुकमी पिक ठरले. परंतु त्यावेळी बियाणे आण्यासाठी बंगलोरला शेतकऱ्यांना जावे लागत असे, परंतु आम्ही काही व्यावसायिकांना विनंती करून विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायला सांगितले. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की बागेवरील शेत मजुरांना छाटणी नंतर काम मिळावे म्हणून लावलेले टोमॅटो हे पिक आज उन्हाळी हंगामातील महत्वाचे पिक ठरले आणि पुढे जाऊन हा टोमॅटोचा हंगाम म्हणून पुढे आला. सन १९८२ नंतर टोमॅटो पिकाचे क्षेत्र विस्तारास वेग मिळाला आणि आज नारायणगाव जुन्नर परिसर टोमॅटोचे आगर म्हणून ओळख निर्माण झाली.

मागील २५ ते ३० वर्षांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात विशेषत: जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहमदनगर जिल्ह्याचा पश्चिम पट्ट्यातील विशेषत: संगमनेर, अकोला, राहता या तालुक्यामध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमणात असते. परंतु मागील १०-१२ वर्षापासून बदलते हवामान, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्ती या सर्व कारणामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तसेच खते, औषधे, बी बियाणे, मल्चिंग, सुतली, तार, बांबू, मजूर या सर्व बाबींवर होणार्या खर्चात प्रचंड वाढ अलीकडच्या काळात झाली. त्या तुलनेत शेतकऱ्यांना म्हणावे तेवढे उत्पादन मिळत नाही आणि बाजारभाव पण.

टोमॅटो क्षेत्र वाढ आणि शाश्वत उत्पादन वाढ विषयी कृषि विद्यापीठ, कृषी विभाग तथा विधानसभेपर्यंत अनेक चर्चा झाल्या, उपाययोजना सुचवल्या गेल्या; परंतु ठोस उपाययोजनांची अंबलबजावणी झाली नाही. मागील ४-५ वर्षापासून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे टोमॅटो उत्पादकांमध्ये उदासनिता आली. मागील २४ मे २०२३ रोजी अतिउष्ण तापमानामुळे या भागातील टोमॅटो काढणीला आले, त्या आठवडयात नारायणगाव मार्केट मध्ये अति आवक झाल्यामुळे बाजारभाव कोसळले परिणामी शेतकऱ्यांनी टोमॅटो मार्केट मध्येच फेकून द्यावे लागले. तसेच दिवसेंदिवस वाढत चालेला उत्पादन खर्च, कमी होत असलेले क्षेत्र, बदलते हवामान, वाढलेली रोगराई आणि कोसळलेले बाजारभाव या सर्व कारणानांमुळे अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटोच्या बागा सोडून दिल्या. त्यामध्ये जनावरे सोडली, परिणामी बाजारपेठेमध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आणि आज टोमॅटोचे बाजारभाव गगनाला भिडले. रोज टीव्ही वर बातम्या येत आहेत, वृत्तपत्रांमध्ये मथळे छापून येत आहे टोमॅटोचे दर वाढले, महागाई वाढली, सर्व सामन्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले. आणि ते इतके वाढले की ‘नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाला’ ग्राहकांना सवलतीच्या दरात टोमॅटो विक्री करावी लागत आहे. याचाच अर्थ असा की शासनाला टोमॅटोचा वारंवार होणारा लाल चिखल दिसत नाही परंतु ग्राहकाला कधीतरी होणारी भाववाढ हा चर्चेचा विषय बनतो? जर शासन ग्राहकाला कमी दरात टोमॅटो उपलब्ध व्हावा यासाठी सवलतीच्या दरात टोमॅटो विक्री करू शकते तर मग ज्यावेळी शेतकऱ्याचा टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून द्यायची वेळ येते त्यावेळी नाफेड का पुढे येत नाही? या घडणाऱ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या हितावह नसून टोमॅटो पिकाला शासनाच्या आधाराची गरज आहे. येथून पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी शासन स्तरावर खालील उपाययोजना राबविणे अत्यंत गरजेचे आहे.

योग्य जातींची शिफारस
महारष्ट्रातील विविध भागांमध्ये संपूर्ण वर्षभर टोमॅटो हे पिक पिकवीले जाते. विशेषतः रबी हंगामात चांगले पिक येते. परंतु उन्हाळी हंगामात बाजार भावाची शाश्वती असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळाले आहे. परंतु उन्हाळी हंगामातील आर्थिकदृष्ट्या महत्वाचे असणारे पिकाच्याबाबत आजही बाजारपेठेच्या गरजेनुसार उत्तम जातींची शिफारस संशोधन संस्था तथा विद्यापीठांमार्फत झालेली नाही याची खंत आहे. उन्हाळी हंगाम फेब्रुवारी पासून सुरु होतो. पुढे या लागवडी एप्रिल-मे पर्यत होत असतात. दरम्यान या कालावधीत टोमॅटोची संपूर्ण वाढ उष्ण तापमानात होते आणि काढणी पावसाळी वातावरणात होते. अशा परिस्थितीत कीड रोग व विषाणूजन्य रोगाला कमी बळी पडणाऱ्या, लांबच्या बाजारपेठेत फळे पाठवण्यासाठी जास्त टिकवणक्षमता असणार्‍या आणि कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या जातींचे संशोधन होणे फार गरजेचे आहे. तसेच प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठीच्या नवीन जातींची शिफारस होणे गरजेचे आहे. आज टोमॅटो उत्पादकांना संपूर्णतः खाजगी कंपनीच्या जातींवरच अवलंबून राहावे आहे. बऱ्याचदा असे आढळून आले नवीन जाती विषाणूजन्य रोगांना लवकर बळी पडतात त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना तोटा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने संशोधन संस्था तथा विद्यापीठांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन वानांचे संशोधन करणे गरजेचे आहे.

रोपवाटिका व्यवस्थापन
कीड व रोगांचा सर्वप्रथम प्रसार रोपवाटिकेतून शेतकऱ्यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणत होताना आढळून आले आहे. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टोमॅटो रोपं निर्मितीवर शासनाचे प्रभावी नियंत्रण असायला हवे. रोप निर्मिती करिता संशोधन संस्थांनी ठरून दिलेल्या मानकानुसार रोपवाटिका उभारणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या रोपवाटिका धारकांनी ठरवून दिलेले निकषांनुसार रोपवाटिका उभारली नसेल त्यांना टोमॅटो तसेच सर्वच पिकांची रोपे विक्रीचा परवाना नाकारला पाहिजे. कृषी अधिकारी तथा तत्सम अधिकाऱ्यांनी रोपवाटिकेची तपासणी करूनच त्याला परवाना दिला पाहिजे. तसेच जिल्हयात हंगामनिहाय टोमॅटो लागवडीचे क्षेत्र आणि अपेक्षित उत्पादन याची माहिती उपलब्ध असायला हवा. ज्याप्रमाणे नत्रयुक्त खतांचा साठा किती आहे हे पॉस मशिनच्या वापराने शासनाला लगेच समजते; त्याच धर्तीवर जिल्ह्यात, तालुक्यात, परिसरात टोमॅटोचे किती बियाणे विकले गेले आणि किती एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड झाली याची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होईल, यासाठी शासन स्तरावर AI तंत्रज्ञानाचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल. त्यानुसार टोमॅटो विक्रीची धोरणे ठरविण्यासाठी शासनाला चालना मिळेल.

नारायणगाव कृषि विज्ञान केंद्राने टोमॅटो पिकाच्या संरक्षणासाठी घेतले अनेक प्रयोग हाती
नारायणगाव कृषि विज्ञान केंद्राने टोमॅटो पिकाचे संरक्षण होण्यासाठी अनेक प्रयोग हाती घेतले. विशेत: गादीवाफ्यावर योग्य अंतरावर टोमॅटोची लागवड करणे, मल्चिंगचा पेपरचा वापर करणे, ठिबक सिंचन, विद्राव्य खतांचा वापर, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर, माती परिक्षणानुसार खत व्यवस्थापन, जैविक पद्धतीने किड-रोग नियंत्रण, कामगंध सापळे, चिकट सापळे इ. सुधारित तंत्रज्ञानाचा अंगीकार केला त्यांचे टोमॅटो पिकांचे उत्पादन चांगले येईल. मातीचा सेंद्रिय कर्ब १ टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्यावर भर दिला असता रोपाच्या अंगी किड-रोग प्रतिकारक शक्ती तयार होते. यामध्ये प्रोटेक्शन फिल्म (नॉनओव्हन पॉलिप्रोपीलीन पेपर) वापर केला असता विषाणूजन्य रोगांपासून टोमॅटो पिकाला वाचवता येऊ शकते.

मूल्य साखळी संवर्धन
- महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख बाजारपेठांमध्ये भाजीपाल्यांचे बाजारभाव स्थिर राहण्याच्या आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्कृष्ठ व दर्जेदार शेतमाल पाठविण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. प्रामुख्याने या भागात शीत साखळ्या उभारणे आणि शीतगृहांची निर्मिती करणे गरजेचे आहे. अनेकदा आवक वाढल्यानंतर जर बाजारभाव गगडतात. अशा परीस्थितीत शेतकरी मार्केट स्थिर होई पर्यंत काही कालावधीकरिता टोमॅटो अथवा भाजीपाला शीतगृहामध्ये ठेऊ शकतात.
- सन २०१८-१९ साली केंद्र शासनाने Operation Greens हा प्रकल्प सुरु केला. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बटाटा, कांदा या पिकांच्या मुल्य साखळी उभी करून शेतकऱ्यांची मूल्यप्राप्ती वाढवणे आणि शेतकऱ्यांना बाजाराशी जोडणे, फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती, योग्य कृषी-लॉजिस्टिक्सचा विकास, योग्य साठवण क्षमता जोडणारी उपभोग केंद्रे निर्माण करून काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, उत्पादन क्लस्टर्ससह दृढ संबंध निर्माण करून अन्न प्रक्रिया क्षमता वाढवणे आणि मूल्य शृंखलेत मूल्यवर्धन करण्यासाठीचा प्रकल्प प्रभावीपणे अंबलबजावणी करणे गरजेचे आहे.
- निर्यात चालू राहिल्यास, देशांतर्गत बाजारपेठेत बाजारभाव टिकून राहण्यास मदत होते. निर्यातीसाठी रसायन विरहीत उत्पादन (Residue Free) यावर विशेष भर देणे गरजेचे. त्यादृष्टीने शेतकर्‍यांमध्ये जागृती करणे, प्रशिक्षण देणे, जैविक कृषिनिविष्ठांचा वापर वाढविणे महत्वाचे आहे. यासाठी कृषि संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र व शेतकरी यांची साखळी तयार होणे गरजेचे आहे. रसायन अंश तपासणीच्या प्रयोगशाळा जास्त संख्येने असण्याची गरज आहे. टोमॅटोचा शाश्वत निर्यातदार अशी भारताची ओळख होऊ शकते.

टोमॅटो पिकासाठी शासकीय अनुदान योजना
- ‘नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ’ ज्या पद्धतीने शहरी ग्राहकांचे संरक्षण करण्यसाठी प्रयत्न करते तसे टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांचे संरक्षण सरकारने केले पाहिजे. नैसर्गिक आपत्ती, कीड रोगांचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी या कारणामुळे जार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपत्ती निवारण, पिक संरक्षण अंतर्गत हवामान आधारित पिक विमा योजना आमलात आणणे गरजेचे आहे.
तसेच टोमॅटोच्या शाश्वत उत्पादनासाठी ठोस उपाय योजना महत्वाच्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आच्छादन पेपरचा वापर, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन, नियंत्रित शेती पद्धतीचा अवलंब- शेडनेट व पॉलीहाउस तंत्रज्ञानाचा वापर, शीत साखळ्या निर्माण करणे, शीत गृहे उभारणे यासाठी शासनाने शेतकरी व शेतकरी उत्पादन कंपन्यांना प्रोत्साहित करून थेट अनुदान योजना राबविणे गरजेचे आहे. तसेच टोमॅटो भांडवली पिक असल्यामुळे बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे.

अर्थ सहाय्य तरतूद
आज मध्यवर्ती बँका टोमॅटो पिकासाठी हेक्टरी रु १.०० लाख पिककर्ज देतात. परंतु दिलेले जाणारे कर्ज हे खूप तुटपुंजे आहे. टोमॅटोच्या शाश्वत उत्पादनासाठी नारायणगाव कृषि विज्ञान केंद्राने शिफारस केलेल्या उत्तम कृषी पद्धतींचा अवलंबानुसार उत्पादन खर्च हेक्टरी खर्च रु.३.७५ इतका खर्च येतो. टोमॅटो उत्पादकाला नवसंजीवनी द्यायची असेल तर बँकांनी ‘स्केल ऑफ फायनांस’  वाढविणे गरजेचे आहे. टोमॅटो पिकाच्या शाश्वत उत्पादनासाठी वरीलप्रमाणे ठोस उपाय योजना अमलात आणणे गरेजेचे आहे. तरच शेतकरी तरेल आणि ग्राहकांना योग्य दरात टोमॅटो उपलब्ध होतील.

कृषिरत्न अनिलतात्या मेहेर
चेअरमन, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे)
श्री. मेहेर हे कृषीमूल्य आयोगाचे सदस्य देखील राहिले आहेत
९९७०१९६२६

Web Title: How did tomato cultivation start in Narayangaon-Junnar area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.