पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकाच्या वाढीवर तर परिणाम होतोच त्याचबरोबर पिकामध्ये पान, फुल फळ यांचा रंग बदलणे किंवा फुल व फळांची गळ होणे एकंदरीत पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. तर कोणत्या अन्नद्रव्याची लक्षणे कशी ओळखता येतील ते पाहूया.
- बोरॉन: शेंड्याकडील पाने रंगहीन होतात. पानांवर सुरकुत्या व पिवळे पट्टे पडतात. नवीन फुटवे तुटून गळून पडतात.
- गंधकः शेंड्याकडील पाने फिक्कट हिरवी, शिरा निस्तेज होतात. पानांवर ठिपके नसतात.
- मंगलः शेंड्याकडील पाने फिक्कट हिरवी, मोठ्या आणि बारीक शिरा गर्द हिरव्या आणि जाळीदार होतात.
- जस्तः शेंड्याकडील पाने निस्तेज, अरुंद आणि आखूड तसेच शिरा गर्द हिरव्या. पानांच्या शिरांवर आणि कडांवर गर्द ठिपके.
- मॅग्नेशियमः पानांच्या कडा वरच्या दिशेने वाकतात. ठिपके नसतात. जुन्या पानांतील हिरवा रंग कडांकडून कमी होत जातो, देठ व पाने लालसर होतात व गळून पडतात.
- स्फुरदः झाड खुरटे बनते, जुनी पाने गर्द हिरवे/जांभळट होतात. अति कमतरता असल्यास पाने तपकिरी/काळी पडतात. पानाच्या खालच्या बाजूला तांबूस तपकिरी रंग दिसतो.
- कॅल्शियमः झाडाचा गर्द हिरवा रंग. कोवळी पाने निस्तेज. शेंड्याकडून वाळणे सुरु होते. शेवटी नवीन पाने मरतात.
- लोहः पाने निस्तेज पिवळी, पानांवर ठिपके नसतात. मुख्य शिरा हिरव्या दिसतात.
- तांबेः शिरांमध्ये फिक्कट गुलाबी रंग. फांदीच्या टोकाला पानांचे झुपके तयार होतात, पाने मुरगळतात व करपून गळतात.
- मोलाब्दः पाने फिक्कट हिरवी/पिवळसर/केशरी, शिरा वगळून पानांवर ठिपके, पानांच्या खालच्या बाजूला चिकट स्त्राव.
- पालाशः जुन्या पानांच्या शेंड्यांवर ठिपके आणि कडा तपकिरी होतात. ठिपके करपतात. पानांचे शेंडे वाकतात.
- नत्रः वाढ खुंटते. जुनी पाने जास्त निस्तेज व पिवळी होतात. संपूर्ण पान फिक्कट हिरवे/पिवळसर दिसते, जास्त कमतरता आढळल्यास पाने करपतात.