Lokmat Agro >स्मार्ट शेती > आरोग्यपेरणी : शेतकरी बांधवांनो तुम्ही ‘टाईप ए’ व्यक्तिमत्वात तर मोडत नाही ना? जाणून घ्या

आरोग्यपेरणी : शेतकरी बांधवांनो तुम्ही ‘टाईप ए’ व्यक्तिमत्वात तर मोडत नाही ना? जाणून घ्या

how farmers could affected by 'Type A' personality? revels Dr Ashok Wasalwar | आरोग्यपेरणी : शेतकरी बांधवांनो तुम्ही ‘टाईप ए’ व्यक्तिमत्वात तर मोडत नाही ना? जाणून घ्या

आरोग्यपेरणी : शेतकरी बांधवांनो तुम्ही ‘टाईप ए’ व्यक्तिमत्वात तर मोडत नाही ना? जाणून घ्या

(आरोग्य-पेरणी-२): शेतकरी बांधवांनी तणावमुक्त राहून साध्या सोप्या पद्धतीने आनंदी कसं राहायचं? कितीही संकटे आली तरीही ठाम राहून सकारात्मक विचार कसा करायचा? आरोग्याच्या नित्य प्रश्नावर मात कशी करायची? अशा समग्र समस्यांवर आरोग्याची पेरणी करणारं करणारं हे विशेष सदर.

(आरोग्य-पेरणी-२): शेतकरी बांधवांनी तणावमुक्त राहून साध्या सोप्या पद्धतीने आनंदी कसं राहायचं? कितीही संकटे आली तरीही ठाम राहून सकारात्मक विचार कसा करायचा? आरोग्याच्या नित्य प्रश्नावर मात कशी करायची? अशा समग्र समस्यांवर आरोग्याची पेरणी करणारं करणारं हे विशेष सदर.

शेअर :

Join us
Join usNext

मनुष्य जन्माला आल्याबरोबर रडायला लागतो. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतरचं वातावरण त्याच्यासाठी नवीन असतं, म्हणून कदाचित हे रडणं असावं. एवढं सोडलं, तर नेहमीचं आयुष्य जगताना त्याला रडावंसं अजिबात वाटत नाही, उलट हसावंसच वाटतं. पण त्यानंतर त्याच्यावर जे काही संस्कार होतात, मग ते कुटुंबातील असो किंवा समाजातील, त्यानुसार त्याचं वागणं आणि जगणं ठरत असतं. त्यानुसार तो आनंदी किंवा दु:खी जगत असतो. 

या संस्कार आणि शिकवणीमध्ये आई वडिलांकडून मिळालेले संस्कार, शाळेतून मिळालेले संस्कार आणि अनुभव, मित्र आणि समाजातून मिळालेले संस्कार आणि अनुभव यावरून मग त्या मनुष्याचा स्वभाव ठरत असतो. अनुभव असं सांगतो की जे चांगलं शिक्षण घेतात, त्यांची निर्णय घेण्याची क्षमताही चांगली असते, पण ज्यांचं कमी शिक्षण होतं, त्यांना निर्णय घेण्यात अडचणी येतात असेही अनुभव आहेत. 

रागात कुठलाही निर्णय घेऊ नका
हा प्रसंग प्रत्यक्षात घडलेला आहे. एका व्यक्तीनं नवीन कार घेतली. कार घरी आणल्यानंतर घरी स्वाभाविकच आनंद आणि उत्साह होता. पण तो काही फार काळ टिकला नाही. कारण त्या व्यक्तीच्या सुमारे बारा वर्षांच्या मुलानं खेळताना दगडानं ती खराब केली. पहिल्याच दिवशी कार खराब झालेली पाहून त्या व्यक्तीला राग अनावर झाला. त्यानं मुलाला मार-मार मारलं. वडिलांचं मारणं आणि बोलणं मुलाला सहन नाही झालं. त्यानं घरी गेल्यावर त्या उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर त्या व्यक्तीला त्याची पत्नी म्हणाली, 
‘हे तुम्ही काय करून बसलात, कार तर आतून चांगली होती, बाहेरून खराब झालेली होती. ती पुन्हा रंगवता आली असती किंवा विकतही घेता आली असती. पण आता मुलगा परत येणार आहे का? मुलापेक्षा तुम्हाला कार जास्त महत्त्वाची वाटली काय?’

आपल्या क्षणिक रागामुळं मुलगा सोडून गेला ही गोष्ट त्या व्यक्तीच्या इतकी जिव्हारी लागली कि त्यानेही उडी मारून आत्महत्या केली. क्षणिक शीघ्रकोपानं त्या व्यक्तीचा आणि त्याच्या कुटुंबाचा असा घात झाला. पालक अनेकदा अशा रागामुळं मुलांना मारतात, त्यांना अपमानास्पद बोलतात. त्यातून मुलांच्या मनावर एक तर खोलवर परिणाम तरी होतो किंवा ते आत्महत्येसारखी टोकाची पावले तरी उचलतात. 
अनेकदा दुसऱ्याकडे जे नाही, ते आपल्याला मिळालं पाहिजे ही भावना मनात प्रबळ झाली, तर आपलं आयुष्यही नकळत स्पर्धात्मक होतं. मग अशी गोष्ट आपल्याला नाही मिळाली, तर आपला स्वभाव चिडचिडा होतो. प्रसंगी दुसऱ्या व्यक्तीबद्दल टोकाची असूयाही निर्माण होते. अनेकांमध्ये अशी भावना निर्माण होऊ शकते, त्यातल्या त्यात पौगंडावस्थेत व तरुणाईत तर ती जास्त प्रबळ असल्याचे पाहायला मिळते. ही पिढी त्यांना मिळालेल्या वस्तू किंवा गोष्टींची तुलना करते आणि त्यातून असूया निर्माण होते. ही नकारात्मकच भावना असते. त्याचा परिणाम केवळ त्यांच्यापुरताच मर्यादित राहत नाही, तर त्यांच्या कुटुंबावरही होतो. 

‘टाईप ए’ व्यक्तिमत्व म्हणजे काय?
इंग्लंड मध्ये फ्रिडमन आणि रोझेनमॅन हे दोन हृदयरोगतज्ज्ञ होते. त्यांनी अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांचा शोध लावला ज्यांना हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. त्या संशोधनाच्या आधारे त्यांनी या रुग्णांना ‘टाइप ए’ असे नाव दिले आणि दुसऱ्या रुग्णांना टाइप बी असे नाव दिले. अशा रीतीने त्यांनी दोन व्यक्तिमत्त्व प्रकार शोधून काढले. या संशोधनाची पार्श्वभूमी मोठी गमतीदार होती. त्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या क्लिनिकमधले सोफ्याचे कव्हर लवकर खराब होतात. कुणीतरी सोफ्याची बाजू कुरतडून ठेवते. त्यांनी दुरुस्ती करणाऱ्याला बोलावले तेव्हा तो सहज म्हणाला की हे कोणी सामान्य रुग्ण करत नसावे. हे करणाऱ्या व्यक्ती नक्कीच विकृत असल्या पाहिजे. त्यावर त्यांनी विचार केला आणि मग त्यांना पुढील संशोधनाला चालना मिळाली. सोफ्याचे कव्हर खराब करणारे रुग्ण अर्थातच  ‘टाइप ए’ व्यक्तिमत्वाचे रुग्ण होते. 

‘टाईप ए’ व्यक्तिमत्व कसे तयार होते?
मनुष्याच्या मेंदूत अगणित न्यूरॉन्स असतात. त्यात असंख्य गोष्टी साठवल्या जातात. याशिवाय मेंदूचे कप्पेही असतात. उदा. ‘डिप मेमरी’त काय साठवायला पाहिजे? ‘सुपरफेशियल मेमरी’त काय साठवायला पाहिजे? या दोन्हींच्या मधल्या ‘मीडियम मेमरीत’ कोणत्या गोष्टी किंवा आठवणी असल्या पाहिजेत? याची वर्गवारी सातत्याने मेंदूत होत असते. आपण आज जे जेवलो, त्यातील पदार्थांची नावे दुसऱ्या दिवशी सांगू शकतो, पण आठ ते दहा दिवसांनी किंवा महिनाभराने आपल्याला सांगता येतीलच असे नाही. परंतु आपल्यावर एखादा आघात झाला, किंवा आयुष्यातील फार आनंदाचा क्षण असला, तर तो प्रसंग आपल्या ‘डिप मेमरी’त कायमस्वरूपी साठवला जातो. अशा ‘डिप मेमरी’त आनंदापेक्षा दु:खाचे प्रसंग जास्त साठवलेले असतील, दुसऱ्यांकडून  मिळालेला त्रास, दगा, दु:ख अशाच गोष्टींचा जास्त भरणा असेल, तर असे लोक वाईट गोष्टींकडे किंवा नकारात्मक गोष्टींकडे आकर्षित होण्याचा धोका जास्त असतो. थोडक्यात त्यांच्यात ‘टाईप-ए पर्सनॅलिटी’ विकसित होण्याची शक्यता जास्त असते. 

मेंदूलाही योग्य शिस्त लावायलाच हवी
एखाद्या रुग्णालयात किंवा कार्यालयात गेल्यावर सर्वप्रथम तिथे असलेल्या रिसेप्शनिस्टला भेटावं लागतं. तो आपली माहिती लिहून घेतो आणि मग ती संबंधित डॉक्टर किंवा अधिकाऱ्यांकडे पोहोचवितो. त्याच प्रमाणं आपल्या मेंदूतही अनेक रिसेप्टर्स असतात. त्यांचं काम काय? तर त्यांना जे चांगलं वाटेल ते ग्रहण करणं. मग हा मेंदू जर तरुण मुलांचा असेल, तर मग तो वयाचा किंवा त्यातील धोक्याचा फारसा विचार करत नाही. त्याला जे आकर्षक वाटतं, त्याकडे त्यांचा ओढा असतो. आजकाल प्रौढ आणि वयस्कर लोकही आत्महत्या करू लागले आहेत. कुठलाही मनुष्य आत्महत्या करतो, तेव्हा त्याला जगातलं काहीच नकोसं वाटतं.

या जगात आपल्याला कुणी विचारत नाही, आपल्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही, मग जगून काय करायचं? अशी भावना त्या व्यक्तीच्या मनात वाढीला लागली की ती आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येते. हा निर्णय काही एका दिवसात घेतला जात नाही. त्यामागे अनेक दिवसांचा किंवा महिन्यांच्या नकारात्मक मानसिकतेचा विचार असतो. थोडक्यात काय तर, लहान मुले असो किंवा मोठी माणसं, आपण आपल्या मेंदूला काय पुरवतो किंवा कोणतं खाद्य देतो, त्यानुसार आपला मेंदू घडतो आणि आपणही. त्यासाठी ‘कंडिशनींग ऑफ ब्रेन’ असं म्हटलं जातं. 

चांगल्या विचारांचं, सकारात्मक भावनांचं ब्रेन कंडिशनींग झालं, तर भविष्यात अशी माणसंही चांगलं काही करताना दिसतात. मुख्य म्हणजे ‘टाईप ए’ व्यक्तीमत्व होण्याचा धोका अशा व्यक्तींमध्ये कमी असतो. मेंदूचे कंडिशनींग करणे किंवा मेंदूला सवय लावणे प्रयत्नांनी शक्य होत असते. लहान मुलांनी अंथरूणात शी-शू करू नये म्हणून त्यांची आई त्याला उभं करून ‘सू-सू’ असा आवाज करते. त्याची सवय झाल्यावर काही दिवसांनी त्याला बरोबर कळतं की असा आवाज आला की लघवी करण्याची वेळ झालेली आहे. आईच्या त्या आवाजामुळं त्या मूलाच्या मेंदूचं एकप्रकारे ‘ब्रेन कंडिशनींगच’ झालेलं असतं. 

एका शास्त्रज्ञानं याच संदर्भात प्रयोग केला. त्याच्याकडं एक कुत्रा पाळलेला होता. त्या कुत्र्याला तो दूरवर उभा करायचा आणि हातातली घंटी वाजवून मटनाचा तुकडा दाखवायचा. सुरवातीला तो तुकडा पाहून कुत्रा धावत यायचा आणि मटनाचा तुकडा खायचा. धावताना त्याच्या तोंडातून लाळ गळत असे. असं काही दिवस केल्यावर शास्त्रज्ञानं मटनाचा तुकडा देणं बंद केलं, तो नुसता घंटी वाजवायचा. पण त्या घंटीच्या आवाजामुळं कुत्र्याच्या मेंदूचं असं ‘ब्रेन कंडिशनींग’ झालं की केवळ आवाज ऐकला तरी त्याच्या तोंडात लाळ येई आणि तो धावत मालकाकडे येत असे. आपल्याही बाबतीत अशी ब्रेन कंडिशनींगची उदाहरणे घडताना नेहमी दिसतात. अनेकदा आपण एखादं गाणं ऐकतो, तेव्हा त्याच्या सुरूवातीलाच आपल्याला समजतं की ते कुठल्या रागातलं आहे. जेवताना किंवा खाताना पदार्थांच्या पहिल्या घासामुळं आपल्याला त्याची चव समजते आणि आपण तो पदार्थ खाऊ लागतो. खरं तर पहिला घास खाल्ल्यानंतर आपण चवीकडे लक्ष देत नसतो. पहिल्या घासात अन्नाची चव लागणे हेही एकप्रकारचं ब्रेन कंडिशनींग असतं. 

एखाद्या व्यक्तीला तीन चार दिवस उपाशी ठेवलं, तर भूकेनं व्याकूळ होऊन तो प्रसंगी अन्नाची चोरी करण्यासही मागेपुढे पाहत नाही. या चोरीसाठी विरोध झाला, तर ती व्यक्ती विरोध करणाऱ्याबरोबर क्रूरतेनेही वागण्याची शक्यता असते. याचं कारण म्हणजे भुकेमुळं त्या व्यक्तीच्या मेंदूचं झालेलं एक प्रकारचं ‘ब्रेन कंडिशनींग’ होय. अनेकदा कुणी मित्र किंव सहकारी आपल्यासमोर तंबाखू-गुटखा यासारखं व्यसन करताना दिसतात. तेव्हा आपलीही नकळत ते खाण्याची इच्छा होते. 

संप्रेरकांचं शास्त्र समजून घेऊ या
आपल्या शरीरात एन्डोक्राईन प्रणाली असते. शरीरातील अंत:स्त्रावी ग्रंथींचा तिच्यात समावेश असतो. त्या प्रणालीची प्रमुख असते पीट्युटरी ग्रंथी. महाभारतात अर्जुनाच्या रथाला आठ घोडे होते. मात्र त्याचे सारथी होते भगवान श्रीकृष्ण. रथाचं संचलन तेच करत असत. याच धर्तीवर आपल्याही शरीराला रथ मानले, तर त्याचे सारथ्य किंवा संचलन करते पिट्युटरी ग्रंथी. लहान मुले काचेच्या गोट्या खेळतात त्या छोट्याशा गोटीप्रमाणे या पीट्युटरी ग्रंथीचा  आकार असतो. मानवी मेंदूच्या मध्यभागी अस्थिंच्या कवचात एकप्रकारच्या ‘सॉकेट’मध्ये ही ग्रंथी किंवा ग्लॅँड असते. या ग्रंथीच्या अधिपत्याखाली थॉयरॉईड, पॅराथॉयराईड, पॅन्क्रीयाज, अ‍ॅड्रेनल ग्लॅँड, टेस्टीज, ओव्हरी यांचा समावेश होतो. व्यक्तीच्या रागात किंवा लोभात या ग्रंथी कार्यरत होतात, त्याचा केंद्रबिंदू पीट्युटरी ग्रंथीमध्ये असतो. आपण जे काही चांगले किंवा वाईट अनुभव घेतो, त्याच्यातून जी संप्रेरके तयार होतात यांचा संबंध या ग्रंथीशी असतो. 

स्वयंपाकघरात जर एखादा चांगला पदार्थ तयार होत असेल, तर त्याच्या सुगंधानं किंवा दिसण्यानं आपल्या तोंडात लाळ सुटायला लागते. त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. एखादी दु:खद गोष्ट घडली, तर आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, ते आपल्याला दिसतं. जेवण केल्यानंतर त्याच्या पचनासाठी आपल्या आतड्यांमध्ये काही एन्झाईम्स तयार होतात. याउलट काही संप्रेरकं आपल्या रक्तातच जमा होतात. उदा. अ‍ॅड्रीनालीन आणि नॉन अ‍ॅड्रीनालीन. संकटाच्या वेळेस हे संप्रेरक तयार होतं. त्यासाठी पीट्यूटरी ग्रंथीकडून संदेश मिळतो व हे संप्रेरकं तयार होतात. हे सर्व क्षणार्धात होतं. हे झालं की आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळं शरीरातील काही भागातला रक्तपुरवठा अचानक कमी होतो. त्यामुळं हृदयाचे ठोकेही वाढतात. 

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात. त्यामुळं आपला चेहरा क्रोधी होतो आणि डोळे लाल होतात. छातीत धडधड वाढते, हात थरथर करू लागतात. बोलण्यात असंबद्धता येते. सुरूवातीला हे सौम्य  स्वरूपात असतं. पण जसजसं हे प्रकार वारंवार घडू लागतात, त्याची मेंदूला सवय होते. परिणामी थोडं जरी खुट्ट झालं तरी आपल्याला राग येणं, क्रोध वाटणं, भीती वाटणं अशा गोष्टी होतात. याची पुढची परिणती होते ती हृदयविकाराचा, पक्षाघाताचा झटका येण्यात. आजकाल चाळीशी किंवा पन्नाशीतील व्यक्तींमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका वाढलेला आहे. माझ्या पाहण्यात हृदयविकाराचे जे रूग्ण येतात त्यांच्यात ‘टाईप ए’ व्यक्तीमत्वाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे माझे निरीक्षण आहे. 

तुम्ही तर नाही ना या प्रकारात मोडत?
‘टाईप ए’ व्यक्तिमत्व म्हणजे सतत काही ना काही हवं असणं, असमाधानी राहणं, कशाच्या तरी मागे धावणं, त्यासाठी ताणतणाव डोक्यावर घेणं, त्यातून येणाऱ्या स्पर्धात्मक भावनेतून नकारात्मक वृत्तीचे शिकार होणं, अशा प्रकारच्या व्यक्ती होय.  त्यांना सतत काही ना काही ध्येय बाळगून त्यामागे धावण्याची चुकीची सवय लागलेली असते. अशा व्यक्ती जीममध्ये व्यायाम करायला गेल्या तरी त्यांच्या मनात व्यायामाऐवजी कामाचे, व्यवसायाचे किंवा अन्य काही विचार असतात. ते व्यायामही मनापासून किंवा समरस होऊन करत नाहीत. व्यायामामुळे बदललेला हार्टरेट आणि तणावामुळं बदललेला हार्टरेट या तफावत असते. अनेकदा स्ट्रेस ट्रेस करताना रुग्णाच्या हार्टरेटमधील हा बदल दिसून येतो. सामान्यपणे हा बदल संबंधित व्यक्तीला सहजासहजी जाणवत नाही किंवा ओळखू येत नाही, पण चाचणीदरम्यान मॉनीटरवर तज्ज्ञांना मात्र तो दिसून येतो. 

नकारात्मकतेचा आरोग्यावर असा होतो परिणाम
अशा ताणतणाव किंवा नकारात्मकतेमुळं हृदयावर परिणाम होण्याबरोबरच थॉयरॉईड ग्रंथी सक्रीय होतात. त्यातून पॅन्क्रीयाज आणि हार्टसह विविध अवयवांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. चेहऱ्यावरचं तेज निघून जातं. हे वारंवार झालं की त्यातून हृदयरोगासह विविध आजारांचा धोका पण बळावतो. शरीराच्या चयापचयाची प्रक्रियाही मंदावते. अशा लोकांना मधुमेहाचा धोका पण अधिक असतो कारण शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. आजकाल तरुणांमध्ये मधुमेह, हृदयरोग होण्याचे प्रमाण वाढत आहे, याचे कारण म्हणजे त्यांची ‘टाईप-ए’ प्रवृत्ती असते असं पाहण्यातील निरीक्षण आहे. काही लोक या प्रवृत्तीमुळे आनंद मिळविण्यासाठी जास्त खातात. तर काही कमी खातात. त्यातून काहींचा लठ्ठपणा वाढतो, तर काही रोडावतात. मुळात मनुष्याचा हा स्वभावच आहे की जर त्याला सरळ मार्गाने आनंद मिळाला नाही, तर तो वेगळ्या मार्गाने, चुकीच्या मार्गाने आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तींना क्रूरतेमध्ये किंवा विकृतीतही आनंद मिळतो.

समाधानी राहण्यातच खरा आनंद
असं म्हणतात की प्रेम आणि शिंक दाबून ठेवता येत नाही. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की रागही दाबून ठेवता येत नाही. समजा वारंवार राग दाबून ठेवला, तर त्याचा एखाद्या दिवशी स्फोट होतो. त्याची परिणिती पुन्हा शरीराला व्याधी लागण्यातच होते. म्हणून राग येऊ न देणं किंवा आला, तर त्याचं त्वरित निराकरण करणं हे आवश्यक असतंच पण तुम्ही आनंद कशात घेतात, यावरही ते अवलंबून असतं. या संदर्भात एक गोष्ट आठवली. एकदा एक धनवान व्यक्ती एका साधूकडे गेला. तो म्हणाला की माझ्याकडे सर्वकाही आहे, मला कशातच आनंद वाटत नाही. मी काय करावं? साधूनं त्याच्याकडं पाहिलं आणि सांगितलं की आता त्याचा काही उपयोग नाही, कारण तू आता सहा महिन्यातच मरणार आहे. ते ऐकून तो घरी आला आणि विचार करू लागला की आता मी सहा महिन्यात मरणार आहे, तर आपण आनंद मिळवू या. अनेक ठिकाणी त्यानं यात्रा करायला सुरूवात केली. गरजूंना आपल्याकडील संपत्ती दान करायला सुरूवात केली. मित्र आणि आप्तेष्टांशी त्यानं मनमुराद गप्पा मारल्या. थोडक्यात यापूर्वीच्या आयुष्यात त्यानं जे केलं नव्हतं, ते त्यानं या कालवधीत केलं. त्याला त्यातून आनंद आणि समाधान मिळालं. त्याच्या असं लक्षात आलं की जीवनात आनंदाशिवाय दुसरं काहीच नाहीये आणि खरा आनंद हा त्यागातच आहे. मग तो साधूकडे गेला आणि त्याला हे अनुभव सांगितले. त्यावर हसून साधूमहाराज म्हणाले की तू काही मरणार वगैरे नाही, खरा आनंद आणि समाधान कशात आहे, ते तुला कळावे म्हणून मी तुला मृत्यूबद्दल सांगितले. साधूच्या उत्तराने तो गृहस्थही समाधानी झाला. त्यानंतरचं सर्व आयुष्य तो आनंद आणि समाधानानं जगला. 

मनुष्याचा विचार केला तर रोजच्या जगण्यासाठी खरंच किती संपत्ती आणि वस्तू आवश्यक असतात? अनेकदा लोक अनावश्यक गोष्टींच्या मागे लागतात, त्यांचा हव्यास धरतात, त्यांचा संग्रह करतात आणि प्रसंगी त्यांच्यासाठी स्वत:ची मन:शांती हरवून बसतात. मग ती वस्तू मोबाईल फोन असेल किंवा अन्य काही. त्यातून जर शेवटी नकारात्मकता येत असेल तर ती टाळायलाच हवी. अंतिमत: व्यक्तींमध्ये अशी नकारात्मकता विकसित होणं हे ‘टाईप-ए’ प्रकारच्या व्यक्तीमत्वाचं उदाहरण आहे. राग, लोभ, मत्सर, क्रोध, तणाव, स्पर्धा, अशा भावना अलिकडे वाढीस लागताना दिसत आहे. आपल्याकडे अनेक संत महात्मे होऊन गेले त्यांनी या सर्व विकारांचा त्याग करण्यासाठी प्रयत्नपूर्वक ‘ब्रेन कंडिशनिंग’ केले. त्यांना जाणवलं की  खरं आनंद हा त्यागात आहे, त्यानुसार त्यांनी तो आनंद आणि समाधान आयुष्यभर टिकवून ठेवला. आपण काही संत-महात्मे किंवा योगी नसलो, तर खरा आनंद, शाश्वत आनंद कशात आहे? हे वेळीच समजून घेतलं, आणि त्याप्रमाणे कृती केली तर तर आपली गणना ‘टाईप ए’ व्यक्तीमत्वात होण्यापासून वाचेल आणि आपण खऱ्या अर्थाने समाधानी आणि आनंदी होऊ !

- डॉ. अशोक वासलवार, चंद्रपूर
ashok17wasalwar@rediffmail.com
(लेखक असोसिएशन ऑफ फिजिशीयन्स ऑफ इंडिया, विदर्भचे पूर्वाध्यक्ष आहेत.)

Web Title: how farmers could affected by 'Type A' personality? revels Dr Ashok Wasalwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.