अळिंबी म्हणजे अगॅरीकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय. या बुरशीची पुर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास अळिंबी किंवा भूछत्र असे म्हणतात, तसेच इंग्रजीत मशरूम या नावाने ओळखले जाते. या अळिंबीस शिंपला किंवा पावसाळी छत्री अशा नावाने सुध्दा ओळखले जाते. या अळिंबीस शास्त्रीय भाषेत ऑयस्टर म्हणतात. हा प्रकार अळिंबीच्या प्लुरोटस कुळातील आहे. पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांमुळे अळिंबीस हेल्थ फूड असे संबोधले जाते. शेतकरीशेतीपूरक व्यवसायात धिंगरी अळिंबीची लागवड करून चांगले अर्थार्जन मिळवू शकतील.
धिंगरी अळिंबीच्या विविध जाती व वैशिष्टये
धिंगरी अळिंबीच्या रंग, रुप, आकारमान व तापमानाची अनुकुलता यानुसार प्रयोगशाळेत व निवड चाचणीद्वारे विकसीत केलेल्या भारतात व महाराष्ट्रात प्रचलीत असणाऱ्या विविध जाती खाली दिल्या आहेत.
प्लुरोटस साजोर काजू
प्लुरोटस ऑस्ट्रियाटस
प्लुरोटस इओस
प्लुरोटस फ्लोरीडा
प्लुरोटस फ्लॅबीलॅटस
धिंगरी अळिंबी लागवडीची सुधारीत पध्दत
अत्यंत कमी भांडवल गुंतवणुक करुन धिंगरी अळिंबीची लागवड सहज करता येते. महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अळिंबीस अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे.
लागवडीसाठी जागेची निवड
या अळिंबीच्या लागवडीसाठी ऊन, वारा, पाऊस या पासून संरक्षण होईल अशा निवाऱ्याची गरज असते. पक्के अथवा कच्चे बांधकाम असलेली खोली अथवा शेड, आच्छादित असलेली झोपडी असावी. या जागेमध्ये तीव्र सुर्यप्रकाश नसावा व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी लागते.
अधिक वाचा: नाचणी धान्यावर प्रक्रिया करून व त्याची किंमत कशी वाढवावी?
पाणी
अळिंबी उत्पादनाकरीता पाणी शुद्ध आणि स्वच्छ असावे. तसेच ते जास्त क्षारयुक्त नसावे कारण क्षारयुक्त पाण्यात अळिंबीच्या बुरशीची वाढ होत नाही.
लागवडीसाठी माध्यम
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी पिष्टमय पदार्थ अधिक असणाऱ्या घटकांची आवश्यकता असते. कच्च्या मालातील सेल्युलोजची मात्रा जास्त असल्यास अळिंबीचे उत्पन्नही अधिक मिळते. यासाठी शेतातील पिकांचे अवशेष, भातपेंढा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, कपाशी, सोयाबीन, तुर, काड्या ऊसाचे पाचट, नारळ व केळी यांची पाने, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो. माध्यम/काड हे नेहमी ताज्या काढणीचे असावे, तसेच ते भिजलेले नसावे. माध्यमाची साठवणूक बंदिस्त खोलीत करावी.
प्लास्टिक पिशव्या
अळिंबी उत्पादनाकरीता बेड भरण्यासाठी १००-१५० गेजच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करावा. साधारणतः १६x२० इंच, १८x२२ इंच किंवा २२x२७ इंच मापाच्या पिशव्यांचा वापर बेड भरण्यासाठी करावा.
बियाणे
अळींबीच्या बियाणास 'स्पॉन' असे संबोधले जाते. गव्हाच्या दाण्यांवर बुरशीची पूर्ण पांढरी वाढ झालेले बियाणे वापरावे. त्यात कोणतीही हिरवी किंवा काळ्या रंगाची बुरशी वाढलेली नसावी, तसेच बियाणे पिशवी दाबल्यास त्यातून चिकट द्रव (जीवाणू वाढ) स्रवू नये, कारण अशा बियाणात अळींबीच्या बुरशीची चांगली वाढ होत नाही. त्यामुळे शुद्ध बियाणे अधिकृत प्रयोगशाळेतून खरेदी करून लागवडीसाठी वापरावे.
लागवडीसाठी वातावरण
अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ ते ३०० सें., हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के असणे आवश्यक असते. यासाठी लागवडीच्या ठिकाणाचे तापमान व आर्द्रता यांचे नियंत्रण ठेवणेसाठी जमिनीवर, हवेत तसेच चोहोबाजूंनी गोणपटाचे आवरण लावून त्यावर पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी. सर्वसाधारण २५० सें. या तापमानास या अळिंबीची उत्तम वाढ होते. उत्तम उत्पादनाकरीता खेळती हवा असणे ही एक महत्त्वाची बाब आहे.
आवश्यक यंत्रसामुग्री
धिंगरी आळिंबीच्या उत्पादनाकरीता खूप खर्चिक किंवा अवजड यंत्रसामुग्री लागत नाही.
अ) प्लास्टिक ड्रम माध्यम भिजवण्यासाठी
ब) हिटर पाणी गरम करण्यासाठी
क) फॉगर्स/ह्युमिडीफायर-आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी
ड) थर्मोहयाग्रोमीटर तापमान-आर्द्रता मोजण्यासाठी
इ) ड्रायर अळींबी सुकविण्यासाठी
लागवडीची पध्दत
काडाचे २ ते ३ सें.मी./ 'भातापेंडयाचे ३-५ सें.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरुन थंड पाण्यात ८ ते १० तास बुडवून भिजत घालावे. काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा.
अधिक वाचा: फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी योजना, कुठे कराल अर्ज?
काड निर्जंतुकीकरण
भिजविलेल्या काडाचे पोते ८०० सें. तापमानाच्या गरम पाण्यात १ तास बुडवावे. काडाचे पोते गरम पाण्यातून काढून त्यातील जादा पाणी नितळण्यासाठी तसेच थंड होण्यासाठी तिवईवर ठेवावे. अथवा भिजविलेल्या काडाचे पोते ८०० सें. तापमानाच्या वाफेवर १ तास ठेवून निर्जंतुकीकरण करावे. थंड करण्यासाठी पोत्यासह सावलीत ठेवावे. अथवा निर्जंतुकीकरणासाठी ७.५ ग्रॅम बाविस्टिन (बुरशीनाशक) व १२५ मि.ली. फॉर्मेलीन (जंतूनाशक) १०० लीटर पाण्यात मिसळून त्यामध्ये वाळवलेले काड पोत्यात भरुन १६ ते १८ तास भिजत ठेवावे. द्रावणातील काड पोत्यासह बाहेर काढून पाण्याचा निचरा करावा.
काड ३५ सें.मी. x ५५ सें.मी. आकाराच्या ५ टक्के फॉर्मेलीन मध्ये निर्जंतुक केलेल्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये थर पद्धतीने भरावे. ५ टक्के फॉर्मेलीनचे द्रावण फवारुन निर्जंतुक केलेल्या बंदिस्त जागेत हे काम करावे. काड भरताना प्रथम ८-१० सें.मी. जाडीचा काडाचा थर द्यावा व त्यावर अळिंबीचे बियाणे (स्पॉन) पसरावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या २ टक्के असावे. काड व स्पॉन याचे ४ ते ५ थर भरावेत. भरताना तळहाताने काड थोडेसे दाबावे. पिशवी भरल्यानंतर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीच्या सहाय्याने ३५- ४० छिद्रे पाडावीत.
अळिंबीच्या बुरशीच्या वाढीसाठी भरलेल्या निवाऱ्याच्या जागेत मांडणीवर ठेवाव्या. त्यासाठी २५-२८० सें. तापमान अनुकूल असते. बुरशीची पांढरट वाढ सर्व पृष्ठभागावर दिसून आल्यावर प्लॅस्टीकची पिशवी काढून टाकावी. बुरशीची वाढ होण्यास साधारण १५ ते १८ दिवस लागतात. बुरशीच्या धाग्यांनी काड घट्ट चिकटून त्यास ढेपेचा आकार प्राप्त होतो. यासच 'बेड' असे म्हणतात.
पिक निगा
धिंगरीचे प्लॅस्टीक पिशवी काढलेले बेड मांडणीवर योग्य अंतरावर ठेवावे. बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याची हलकीसी फवारणी करावी. खोलीमध्ये जमिनीवर, भिंतीवर पाणी फवारून तापमान (२५ते३०० सें.) व हवेतील आर्द्रता (७० ते ९० टक्के) नियंत्रित करावी. ३ ते ४ दिवसात बेडच्या सभोवताली अळिंबीचे अंकूर (पीनहेड) दिसू लागतात व पुढील ३ ते ४ दिवसात त्याची झपाट्याने वाढ होऊन अळिंबी काढणीस तयार होते.
पाणी व्यवस्थापन
अळिंबी पिष्टमय व तंतूमय वाळलेल्या अवशेषांवर वाढते. प्लॅस्टीक पिशवीतून बेड काढल्यानंतर वाढीच्या काळात बेडवर दिवसातून दोन-तीन वेळा पाण्याची लहान नोझल असलेल्या स्प्रे पंपाने हलकी फवारणी करावी. अळिंबी बुरशीच्या वाढीच्या काळात पाणी फवारण्याची गरज नसते. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान २० ते ३०० सें. व आर्द्रता ७० ते ९० टक्के ठेवणे आवश्यक आहे.
अधिक वाचा: अस्तरीत शेततळे ठरत आहे शेतीसाठी वरदान
काढणी
पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसात करावी. काढणीपुर्वी १ दिवस अगोदर अळिंबीवर पाणी फवारु नये. यामुळे अळिंबी कोरडी व तजेलदार रहाते. अळिंबीच्या कडा आत वळण्यापुर्वी काढणी करावी. लहान मोठी सर्व अळिंबी एकाच वेळी काढून घ्यावी. अळिंबीच्या देठाला धरुन पिरगळून काढणी करावी. दुसरे पीक घेण्यापुर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवून कुजलेल्या व मोकळ्या झालेल्या काडाचा पातळसा थर अलगद काढावा. दिवसातून २ ते ३ वेळा नियमितपणे पाणी फवारावे. ८ ते १० दिवसांनी दुसरे पीक तयार होते. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी तिसरे पीक मिळते. साधारणपणे ३ किलो ओल्या काडाच्या (१ किलो वाळलेले काड) एका बेडपासून ४० ते ४५ दिवसात १ किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते.
अळिंबीची साठवणूक
ताजी अळिंबी पालक भाजीप्रमाणे अल्पकाळ टिकणारी व नाशवंत आहे. काढणीनंतर काडीकचरा बाजूला काढून स्वच्छ अळिंबी छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये दोन दिवस टिकू शकते. फ्रीजमध्ये ३ ते ४ दिवस टिकते. ताज्या अळिंबीस बाजारपेठ नसल्यास अळिंबी उन्हामध्ये वाळवावी. अळिंबी उन्हामध्ये दोन-तीन दिवसात पूर्णपणे वाळते. वाळलेली अळिंबी प्लॅस्टीक पिशवीत सील करुन (हवाबंद) ठेवल्यास सहा महिन्यापेक्षा अधिक काळ चांगल्या स्थितीत राहते. वाळलेल्या अळिंबीचे वजन ओल्या अळिंबीच्या वजनाच्या १:१० इतके कमी होते.
काही मुलभुत बाबीची माहिती
१. अळिंबीची भाजी ही वनस्पती कुळातील असून पुर्णतः शाकाहारी आहे.
२. अळिंबीच्या मुळाव्यतिरीक्त सर्व भाग खाण्यास योग्य आहेत.
३. काही जंगली अळिंबी विषारीसुध्दा असतात तेंव्हा त्याबाबतचे ज्ञान असल्याशिवाय अळिंबी खाऊ नये.
४. अळिंबीची भाजी करताना जास्त वेळ शिजवू नये. अळिंबी १० ते १५ मिनीटात शिजते.
५. अळिंबी पाण्यात जास्त वेळ धुवू नये, त्यामुळे त्यातील जीवनसत्वे नष्ट होतात किंवा जास्त वेळ पाण्यात ठेवल्यास अळिंबी सडण्याची प्रक्रिया सुरू होते.
महाराष्ट्रात धिंगरी अळिंबी उत्पादनास भरपूर वाव आहे. अळिंबी खाण्याबाबत असणारे गैरसमज दूर करणे, लोकांना अळिंबी खाण्यास प्रवृत्त करणे, विक्रीची साखळी निर्माण करणे या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात दररोज ताज्या पालेभाज्या खाण्याचा प्रघात असून उपलब्धताही आहे. अळिंबी खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल वाढत आहे. तथापी अळिंबीचे महत्त्व जनजागृती करुन पटवून दिल्यास या पिकास भविष्यात निश्चित मागणी वाढणार आहे.
बियाणे (स्पॉन)
स्पॉनचा पुरवठा कृषि महाविद्यालय, पुणे येथील केंद्रातून ५०० ग्रॅमच्या पोलीप्रोपिलीन पिशव्यामधून रु. ९०/- प्रती किलो प्रमाणे केला जातो. स्पॉन पार्सलने पाठविले जात नाही. स्पॉन जास्त प्रमाणात हवे असल्यास १० ते १५ दिवस अगोदर ५० % आगाऊ रक्कम भरून मागणी नोंदवावी.
प्रशिक्षण
धिंगरी अळिंबी लागवडीचे प्रशिक्षण कृषि महाविद्यालय, पुणे येथील अळिंबी संशोधन प्रकल्प येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दिले जाते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीस रु. १०००/- शुल्क आकारले जाते.
संपर्कासाठी पत्ता
अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन
प्रकल्प, कृषि महाविद्यालय, पुणे - ४११००५
दुरध्वनी क्रमांक: (०२०) २९५१८३१५, ई-मेल : mushroompune@rediffmail.com