Join us

ड्रॅगन फ्रूटची लागवड कशी केली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 1:26 PM

आपल्या देशात या पिकाची शेती मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इत्यादी तसेच काही पूर्वोत्तर राज्यामध्ये केली जाते. थोडक्यात, सर्वच राज्यांमध्ये अल्प प्रमाणात ड्रॅगन फ्रुट शेती बघायला मिळते.

ड्रॅगन फ्रूट हे एक निवडुंग कुळातील अत्यंत महत्वपूर्ण फळ पीक आहे. सुरवातीच्या काळात केवळ शोभेसाठी लावल्या जाणाऱ्या या झाडांचा अलीकडे फळ पीक म्हणून शेतकरी स्वीकार करत आहेत. हे फळ खुप आकर्षक व सुंदर असल्यामुळे याला 'नोबल वुमन' आणि 'रातराणी' या नावाने संबोधले जाते. प्रामुख्याने साल आणि गर यांच्या रंगांनुसार फळाचे विविध प्रकार पडतात. भारतामध्ये पांढरा गर व लाल साल असणाऱ्या प्रजातीची जास्त प्रमाणात लागवड केली गेली आहे, त्याचबरोबर लाल गर व लाल साल आणि पांढरा गर व पिवळी साल या प्रकारांकडे सुद्धा शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंटमुळे या पिकास 'सुपर फ्रूट' म्हणून सुद्धा प्रचिती मिळत आहे. या फळाचा उपयोग टेबल व प्रोसेसिंगसाठी केला जात आहे. या फळापासून जाम, ज्यूस, जेली, कँडी, सिरप, तसेच वाइन इत्यादि प्रक्रियायुक्त मूल्यवर्धित पदार्थ बनवले जाऊ शकतात. या फळाच्या सालीमध्ये उच्च प्रमाणात पेक्टिन असल्याने त्यांचा वापर फळ प्रक्रियेत जेलिंग एजेंट म्हणून केला जातो. तसेच सालीपासून खाद्य रंग सुद्धा बनवले जाऊ शकतात.या फळ पिकाचे विविध औषधी गुण सुद्धा आहेत.

फळांशिवाय याच्या पानांचा आणि फुलांचा उपयोग परंपरागत हाइपोग्लाइसेमिक, मूत्रवर्धक एजेंट, म्हणून लॅटिन अमेरिकेत केला जात आहे. 'क' आणि 'ब' जीवनसत्व तसेच फ्लावोनोइड्ससारखे विविध अँटीऑक्सिडंट या फळात उपस्थित असल्याने रक्तातील कॉलेस्ट्रॉल व उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते. या व्यतिरिक्त या फळामध्ये तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण असल्याने हे पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. या फळामध्ये खूप कमी प्रमाणात साखरेचे प्रमाण आहे. त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या व्यक्तीसाठी हे फळ उत्तम मानले जाते. या फळामध्ये फॉस्फोरस व कॅल्शियम सारखे खनिज पदार्थ सुद्धा अधिक प्रमाणात असतात, जे हाडांच्या आणि दातांच्या योग्य वाढीसाठी फायदेशीर आहेत. वजन कमी करणे तसेच स्मृति वाढवणे, दृष्टी सुधारणे इत्यादि विविध फायदे या फळासोबत जोडले गेले आहेत.

ही फळ प्रजाती मेक्सिको, मध्य अमेरिका आणि उत्तर दक्षिण अमेरिका येथील उष्णकटिबंधीय वन क्षेत्रातील आहे. आणि इथून हे फळ ऑस्ट्रेलिया, चीन, ग्वाटेमाला, हवाई, इंडोंनेशिया, इस्राइल, तैवान, थायलंड, स्पेन, श्रीलंका, आणि व्हिएतनाम, इत्यादी देशामध्ये पोहचले आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची वाढती मागणी आणि उच्चमूल्य यामुळे या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. आपल्या देशात या पिकाची शेती मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इत्यादी तसेच काही पूर्वोत्तर राज्यामध्ये केली जाते. थोडक्यात, सर्वच राज्यांमध्ये अल्प प्रमाणात ड्रॅगन फ्रुट शेती बघायला मिळते.

जमिनीची निवड व वातावरणया पिकाची लागवड विविध प्रकारच्या जमिनीमध्ये, जसे की काळी, मुरमाड, कमी खोलीची इत्यादी मध्ये करता येऊ शकते. पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून खोडाभोवती जास्त प्रमाणात पाणी साठून राहणार नाही. जास्त पाणी साठल्याने खोड सडण्याचे प्रमाण वाढते. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मातीचा सामु ५.५-६.५ योग्य मानला जातो. काही प्रमाणात आम्लयुक्त जमिनीसुद्धा या फळपिकासाठी योग्य असतात.

या फळ पिकाची शेती समुद्र सपाटीपासून १७०० मिटर उंचीपर्यंत करता येऊ शकते. जर जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी साठून राहिले तर फूल आणि फळांची गळ होते. या पिकासाठी २०-३०० सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते परंतु जास्तीत जास्त ४०० सेल्सिअस तापमानातही (थोड्या दिवसांकरिता) हे पीक तग धरू शकते. अती तापमान व सूर्यप्रकाश या पिकांस काही प्रमाणात हानिकारक ठरते, अशा परिस्थितीमध्ये सनबर्न व रोगाचे वाढते प्रमाण दिसून येते. यासाठी बागेमध्ये काही प्रमाणात सावली (२०-३०%) ठेवल्याने फळझाडांचे संरक्षण करता येऊ शकते.

जाती/प्रकारसद्यः स्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध प्रकार हे सर्व बाहेरील देशांमधून आलेले आहेत. भारतामध्ये, पांढरा गर व लाल साल, लाल गर व लाल साल व पांढरा गर व पिवळी साल इत्यादी प्रकार लागवडीस उपयुक्त आहेत.

रोपे तयार करण्याची पद्धती/नर्सरीड्रॅगन फ्रूटची झाडे बियांद्वारे किंवा कटींगद्वारे तयार केली जातात. कटींगद्वारे अतिशय जलद गतीने व सोप्या पद्धतीने रोपे तयार केली जातात व खाली दिलेल्या पद्धतीने रोपवाटिकेमध्ये तयार करावीत.- एक वर्ष जुनी फांदी निवडावी, जिचा रंग गडद हिरवा असतो. हलक्या हिरव्या रंगाच्या फांद्यांना फूटवे थोडेसे उशिरा लागतात.- सहसा २०-२५ सेमी लांबीची व ५-६ सेमी जाडीची फांदी रोपे तयार करण्यासाठी वापरावी.निवडलेल्या फांद्या ४-५ दिवसांकरिता सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवल्याने कॅलसिंग व्यवस्थित होऊन रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. फांदी लावण्यापूर्वी फांद्यांना बुरशीनाशक (कॉपर ऑक्सीक्लोराइड २.५%) द्रावणात बुडवून घ्यावे. नर्सरीमध्ये पॉलीथिनच्या पिशवीमध्ये (१०x२५ सेमी) तसेच गादी वाफा तयार करून रोपण करता येते. गादी वाफ्यावर रोपे बनवण्यासाठी अंदाजित ३ फुट रुंद आणि ०.५-१ फुट उंच असा गादी वाफा शेणखत मिसळून बनवून घ्यावा व त्यामध्ये एक ड्रिपची लाइन टाकावी. या गादी वाफ्यावर १५-२० सेमीच्या अंतरावर ड्रॅगन फ्रूटची कटिंग लावावीत व नियमित अंतराने पाणी देत रहावे.

अधिक वाचा: मॅग्नेट प्रकल्पांतर्गत रोपवाटीका व उती संवर्धन युनिट उभारणीसाठी अनुदान, कसा कराल अर्ज?

लागवडीची वेळ आणि पद्धतीमान्सूनपूर्वची वेळ ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी योग्य मानली जाते परंतु पाण्याची सोय असल्यास, अतिउष्ण महीने वगळता वर्षभरात कोणत्याही महिन्यात लागवड करता येऊ शकते. ड्रॅगन फ्रूट हे एक वेलवर्गीय फळपीक असून पिकाच्या वाढीसाठी लागवडीपूर्वी आधार प्रणाली उभारावी लागते. यामध्ये आरसीसी सिमेंट किंवा लाकडी खांबांचा उपयोग केला जातो. परंतु या पिकाची उत्पादन क्षमता जवळपास २० वर्षे व त्यापेक्षा अधिक असल्यामुळे आरसीसी सिमेंटचे खांब वापरणे योग्य ठरते. खालील प्रमाणे आरसीसी सिमेंटचे खांबांचे आकारमान असावे.

खांबाचे आकारमान- ५-६ फुट उंची- ३.५-४ x ३.५-४ इंच (रुंद/जाड)- खांबाचे वजन ४०-४५ किलो- खांबाच्या टोकावरती एक ८-१० एमएम चा रॉड/नट असावा जो प्लेट बसवण्यासाठी मदत करेल.

प्लेटचे आकारमान- ५०-६०४ ५०-६०४३-४ सेमी (लांबी, रुंदी व जाडी)- गोलाचा व्यास १२-१५ सेमीप्लेटचे वजन २०-२५ किलो

रोपांच्या लागवडीपूर्वी सिमेंटचे खांब उभे करून घ्यावेत (३-४ फुट जमिनीवर ठेवावेत) व नंतर शेणखत मिसळून (५०-१५ किलो प्रती खांब) वाफे बनवून घ्यावेत. नंतर एखादा किंवा दुसरा पाऊस पडल्यावर रोपांची लागवड करावी. रोपांची लागवड करताना, रोपे खांबाच्या जेवढ्या जवळ लावता येतील तेवढी जवळ लावावीत जेणेकरून नवीन फुटवा खांबाला योग्य रीतीने बांधता येईल. खांबाच्या चारही बाजूंना एक एक रोप लावावे, म्हणजे ४ रोपे खांबालागत लावली जातील.

लागवडीचे अंतररोपांची लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता व वातावरण इत्यादी घटकाचा योग्य अभ्यास करून अंतर निश्चित करावे. सामान्यता ३४२.५ मीटर व ३४३ मीटर अंतराची शिफारस केली गेली आहे. योग्य अंतर निश्चित केल्याने झाडांची छाटणी, फळ तोडणी व अंतर मशागतीची कामे करणे सुलभ होते. ३४ २.५ मीटर हे अंतर घेतले तर साधारणपणे ५२०० (१३०० X ४) एवढी प्रती हेक्टर रोपे लागतात.

श्री. विजयसिंह काकडे, श्री. संग्राम चव्हाण, श्रीमती वनिता साळुंखेभाकृअनूप-राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्था, बारामती, पुणे

टॅग्स :फलोत्पादनफळेशेतीशेतकरीलागवड, मशागत