राजाराम लोंढे
कोल्हापूर : बाजार समितीने गुळासाठी 'जीआय' मानांकन घेतले खरे; पण एकाही शेतकऱ्याने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. मानांकनानुसार गूळ प्रतवारीची किचकट पद्धती, एवढे करूनही अपेक्षित दराची हमी नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे गेली दहा वर्षे मानांकनाच्या चर्चेचे नुसते गुन्हाळच सुरू आहे.
कोल्हापुरात नैसर्गिक पद्धतीने गूळनिर्मिती मागे पडत रासायनिक पावडर, केमिकल व साखरमिश्रित गुळाची निर्मिती वाढली आहे. त्यात कोल्हापुरी गुळाच्या नावाखाली इतर राज्यातील गूळ राजरोसपणे विक्री होऊ लागला. यासाठी कोल्हापूर बाजार समितीने २०१३ ला 'जीआय' मानांकन आणले. मात्र, गेली दहा वर्षे त्याचा वापर करण्यात समितीला अपयश आले.
समितीने अनेकवेळा प्रबोधन करूनही गुळाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतची यंत्रणेबाबत शेतकरी अजूनही अनभिज्ञ आहे. त्यात लोकांना साखर व कलरमिश्रित पांढरा गूळ खाण्याची सवय झाल्याने जीआय मानांकनानुसार तयार केलेला गूळ कोण घेणार? याबाबत काहीच धोरण समितीच्या पातळीवर दिसत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी जीआय वापराकडे पाठ फिरविली आहे.
जीआय मानांकनासाठी गूळ करण्याची प्रक्रिया
- उसाची लागण करताना समितीला कल्पना देणे.
- उसाची ७/१२ पत्रकावर नोंद.
- आवश्यक गाळप करण्याअगोदर समितीला कळवणे.
- समितीच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली गूळ उत्पादन.
- उत्पादित गुळाची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी होणार.
- गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर गूळ समितीत आणायचा.
जीआय मानांकनानुसार अशी राहते गूळ प्रतवारी पद्धत
गुळाचे गुणधर्म | विशेष दर्जा | 'अ' दर्जा | 'ब' दर्जा |
रंग | तांबूस-पिवळसर | तांबूस-पिवळसर | तांबूस |
रवाळपणा | रवेदार | मध्यम रवाळ | बारीक कणी |
चव | गोड | गोड | साधारण गोड |
कठीणपणा | कठीण | कठीण | साधारण कठीण |
साखर (सुक्रोज) | ८० टक्क्यांपेक्षा अधिक | ७५ ते ८० टक्के | ७० ते ७५ टक्के |
ग्लुकोज, फ्रुक्टोज | १० टक्क्यांपेक्षा कमी | १० ते १५ टक्के | १५ ते २० टक्के |
गुळातील आर्द्रता | ६ टक्क्यांपर्यंत | ६ ते ८ टक्के | ८ ते १० टक्के |
अविद्राव्य घटक | १ टक्क्यापर्यंत | १ ते २ टक्के | १ ते २ टक्के |
मानांकनासाठी समिती प्रयत्नशील आहे; पण शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. शेतकरी पुढे आले तर सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. - जयवंत पाटील, सचिव, बाजार समिती