महाराष्ट्रात कृषी विभागातर्फे गावनिहाय बहुतांशी शेतकऱ्यांचे जमिनीतील माती परीक्षण करून जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे किंवा शेतकरीही स्वतः आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून घेत आहेत, या पत्रिकेमध्ये किंवा अहवालामध्ये प्रथम पायाभूत गुणधर्मांचा उल्लेख केलेला आहे. हे गुणधर्म म्हणजे जमिनीच्या सामू, विद्युत वाहता (क्षारता) आणि मुक्त चुनखडीचे प्रमाण या पायाभूत गुणधर्मावरून जमिनीच्या समस्या कळतात व त्यानुसार जमीन सुधारणेचे व्यवस्थापनही करता येते. यापैकी सामू म्हणजे काय? यालाच आपण आम्ल विम्ल निर्देशांक सुद्धा म्हणतो.
सोरेसन्स डॉनिस (१९६९) या शास्त्रज्ञाने सामुचे प्रमाण हायड्रोजन आयनाच्या प्रमाणाच्या घातांकावर ठरविले आहे. हायड्रोजन (H+) किंवा हायड्रोक्झिल (OH-) आयन यांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणाऱ्या त्यांच्या द्रव रूपातील ठराविक प्रमाणावर या द्रावणाचा सामू अवलंबून असतो. सामुचे प्रमाण सामूमापक (पीएच मीटर) या इलेक्ट्रोमेट्रिक पद्धतीने मोजले जाते त्याचे वाचन ० ते १४ पर्यंत दर्शविले जाते.
उदासीन द्रवामध्ये हायड्रोजन (H+) व हायड्रोक्झिल (OH-) हे दोन्ही आयन प्रबल असतो म्हणजेच असे व आम्लयुक्त असते अशा सामुच्या जमिनी कोकणात (लॅटराईट माती) आढळून येतात याउलट कॅल्शियम अथवा सोडियम सारख्या विम्लधर्मी अणूंचे प्रमाण वाढल्यास सामू वाढतो व तो ७ पेक्षा जास्त दर्शवितो असा विम्लयुक्त सामू पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जमिनीमध्ये आढळून येतो. सामुच्या निरनिराळ्या मूल्यात माती द्रावणामध्ये असणारे वर्गीकरण खालील तक्त्यात दर्शविले आहे.
अ. क्र. | वर्गवारी | सामू मूल्य |
१ | अति जास्त विम्लधर्मीय | ९.१ |
२ | जास्त विम्लधर्मीय | ८.५ ते ९.० |
३ | मध्यम विम्लधर्मीय | ७.९ ते ८.४ |
४ | कमी विम्लधर्मीय | ७.४ ते ७.८ |
५ | तटस्थ (उदासीन) | ६.६ ते ७.३ |
६ | कमी आम्लधर्मीय | ६.१ ते ६.५ |
७ | मध्यम आम्लधर्मीय | ५.६ ते ६.० |
८ | जास्त आम्लधर्मीय | ५.१ ते ५.५ |
९ | अति जास्त आम्लधर्मीय | ४.५ ते ५.० |
१० | अत्यंत आम्लधर्मीय | ४.५ |
सामुच्या मूल्याचा जमिनीतील अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होते, बहुतांशी पिकांना लागणारे अन्नद्रव्ये (प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये) हि सामू ६.६ ते ७.३ या तटस्थ (उदासीन) या वर्गवारीत उपलब्ध होतात तरीपण बदलत्या हवामान परिस्थितीत सामू ६ ते ८ पर्यंतच असावा तसेच सामू वरून जमिनी आम्लयुक्त आहेत का विम्लयुक्त आहे हे कळते. परंतु अति आम्ल किंवा अति विम्ल प्रमाण असल्यास रासायनिक भूसुधारके (उदा. आम्ल जमिनीत लाईम तसेच अति विम्ल जमिनीत जिप्सम/गंधक) सुधारणा करण्यासाठी किती टाकावे हे कळते व त्याद्वारे या जमिनीची भूसुधारणा करता येते.
अधिक वाचा: एकरी जास्त टन ऊस घ्यायचाय? मग क्षारपड जमिनीवर तातडीने हा उपाय कराच
सामू मोजण्याच्या पध्दती
सामू मोजण्याच्या पध्दतीपैकी दोन पध्दती महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे इलेक्ट्रोमेट्रीक पध्दत आणि आम्ल विम्ल दर्शनिक कागद पध्दत.
१) इलेक्ट्रोमेट्रीक पध्दत
सामू मापक (पी.एच. मीटर) या विदयुत यंत्राच्या साहाय्याने शेतजमिनीतील मातीचे पी.एच. मुल्य मोजले जाते ही एक अचूक पध्दत असून तिचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
२) आम्ल-विम्ल दर्शनिक/लिटमस कागद पध्दत
लिटमस कागद ओल्या मातीत ठेवल्यास आम्ल विम्लतेचे प्रमाण त्याच्या रंग छटा बदलतात व त्या रंगावरून जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ढोबळ स्वरूपात काढता येतो.
मृद विज्ञानशास्त्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी