कोकण विभागाच्या सर्वेक्षण अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की सामूहिक पध्दतीने जीवन जगणाऱ्या डंखी मधमाशांच्या तीन प्रजाती अनुक्रमे सातेरी मधमाशी (एपीस सेरेना इंडिका), आग्या मधमाशा (एपीस डॉरसाटा) आणि फुलोरी मधमाशा (एपीस फ्लोरिया) यांचा निसर्गतः मोठ्या प्रमाणावर वावर आढळतो.
तर उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने मधसंकलनासाठी वापरण्यात येणारी युरोपियन मधमाशी (एपीस मेलीफेरा) ही डंखी मधमाशांची प्रजात कोकणातील काही मधुमक्षिकापालकांनी प्रायोगिक तत्वावर संगोपनास सुरूवात केली आहे.
समुहाने राहणाऱ्या डंखहीन मधमाशांमध्ये पोयाच्या मधमाशा (ट्रायगोना इरिडिपेनिस) या प्रजातीचा निसर्गतः वावर आढळतो. वर उल्लेख केलेल्या डंखी मधमाशांपैकी आग्या व फुलोरी मधमाशा जंगली या वर्गवारीत मोडतात व त्यांचे पेट्यांमध्ये संगोपन करणे अशक्य आहे.
मधमाशांच्या विविध प्रजाती आणि वार्षिक उत्पादन
१) आग्या मधमाशी (एपिस डॉरसाटा)- भारतात समुद्र सपाटीपासून ३५०० फूट उंचीच्या प्रदेशात या माशांची मोहोळ आढळतात.- या माशा ५ ते ७ फुट लांब व २ ते ४ फुट उंच आकाराचे पोळे डोंगराच्या कड्यावर, उंच इमारतीवर, झाडावर किंवा पाण्याच्या टाक्याखाली अशा अवघड ठिकाणी उघड्यावर बांधतात.- सर्व मधमाशांपेक्षा आकाराने मोठ्या असतात स्वभाव रागीट असतो.- खाद्याच्या उपलब्धतेनुसार स्थलांतर करतात.- पराग व मकरंद गोळा करण्यासाठी २ ते ३ किलोमीटर जातात.- परागीभवनासाठी चांगला उपयोग होतो.- मधाचे उत्पादन ३०-४० किलो प्रति वर्ष प्रति पोळे मिळते.
२) फुलोरी मधमाशी (एपिस फ्लोरिया)- या माशा भारतात सर्वत्र आढळतात. समुद्र सपाटीपासून १००० फूट उंचीपर्यंतच्या प्रदेशात आढळून येतात.- लहान पोळे झुडुपात, कुंपणात, सुरक्षित सावलीच्या ठिकाणी किंवा उघड्यावर बांधतात.- या माशांचे पोळे ६ ते ९ इंच लांब व ४ ते ८ इंच उंच असते. माशा आकाराने सातेरी मधमाशांपेक्षा लहान असतात.- कामकरी माशांच्या नारंगी रंगाच्या अंगावर पाठीमागच्या निम्म्या भागावर काळे पांढरे पट्टे असतात.- परागीभवनासाठी उपयोग होतो.- खाद्य गोळा करण्यासाठी १/२ ते १ कि.मी. पर्यंत जातात.- मधाचे उत्पादन ५०० ग्रॅम प्रति वर्ष प्रति पोळे मिळते.
३) सातेरी मधमाशी (एपिस सेरेना इंडिका)- या माशांना सातपुडी मधमाशा असेही म्हणतात.- झाडाच्या ढोलीमध्ये, कड्या कपारीच्या छोट्या गुहांमध्ये, मुंग्याचे वारुळ अशा अंधाऱ्या जागेत राहतात.- ठराविक अंतरावर एकाला एक समांतर अशी १ ते ८ पोळी बांधतात. पोळ्याचा आकार २०x१५ से.मी.- या माशा स्वभावाने शांत असून क्वचित स्थलांतर करतात.- एका पूर्ण वाढलेल्या वसाहतीमध्ये २० ते ३० हजार कामकरी माशा असतात.- कामकरी माशांच्या पोटाच्या भागावर पिवळसर पट्टे असतात.- वसाहतीपासून १ ते १.५ किमी. खाद्य गोळा करण्यासाठी जातात.- कृत्रिम पेटीत पालन करता येते.- मधाचे उत्पादन ६-८ किलो प्रति वर्ष प्रति पोळे मिळते.
४) युरोपियन मधमाशी (एपिस मेलीफेरा)- भारतामध्ये या माशांच्या वसाहती युरोपमधून आयात करुन आणलेल्या आहेत.- आकाराने आग्या मधमाशांपेक्षा लहान व सातेरी मधमाशांपेक्षा मोठ्या असतात.- या मधमाशा झाडांच्या ढोलीत, दगडाच्या कपारीत, जमीनीत सात ते १० पोळ्या समांतर रेषेत बांधतात. पोळ्याचा आकार ४५ x २५ से.मी. असतो.- गृहत्याग करुन जात नाहीत.- अंधारात एकाच ठिकाणी जास्त दिवस राहण्याची सवय असल्याने त्यांचे कृत्रिम पालन करता येते.- मधपेटीत पालन करता येते. १० फ्रेमी लॅगस्ट्राथ मधपेट्या वापरल्या जातात.- मधाचे उत्पादन २५-४० किलो प्रति वर्ष प्रति पोळे मिळते.
५) पोयाची मधमाशी (ट्रायगोना इरिडिपेनिस)- आकाराने सर्वात लहान व डंख विरहीत माशा आहेत.- या माशा झाडाच्या ढोलीत मेण, डिंक यांच्यापासून द्राक्षाच्या घडासारखे गोल लांबट पोळे बांधतात.- त्या काळसर रंगाच्या असतात.- त्या चावा घेत नाहीत, मात्र संरक्षणासाठी नाक, कान व केस यांमध्ये शिरतात.- परागीभवनासाठी यांचा चांगला उपयोग होतो. या माशा अत्यल्प प्रमाणात मध गोळा करतात.- मधाचे उत्पादन १००-२०० ग्रॅम प्रति वर्ष प्रति पोळे मिळते.
अधिक वाचा: Honeybee किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण कसे कराल?