Join us

शेतकऱ्यांनो गुणवत्तापूर्ण सोयाबीनसाठी काढणी व मळणी करताना कशी घ्याल काळजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 9:09 AM

Soybean Harvesting लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे सोयाबीन पीक आता पक्वतेकडे हळू-हळू जात आहे, तर मध्यम किंवा उशिरा पक्व होणार्‍या वाणांचे पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी काढणी व मळणी करताना काय काळजी घ्यावी ते पाहूया.

लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे सोयाबीनपीक आता पक्वतेकडे हळू-हळू जात आहे, तर मध्यम किंवा उशिरा पक्व होणार्‍या वाणांचे पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी काढणी व मळणी करताना काय काळजी घ्यावी ते पाहूया.

  • सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींमध्ये ९०% शेंगा पिवळ्या झाल्यावर पीक काढता येते. याचा बियाण्याच्या उगवणीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
  • सोयाबीन दाणे भरण्याच्या किंवा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना सतत पाऊस पडत असेल तर सोयाबीनच्या दाण्यांची (बियांची) गुणवत्ता कमी होऊ शकते किंवा सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता असते.
  • म्हणून, योग्य वेळी पिकाची कापणी करणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे जास्त उशिरा काढणी केल्यास शेंगा फुटल्यामुळे होणारे नुकसान किंवा बियाण्याची गुणवत्ता कमी होणे टाळता येते.
  • पिकाची कापणी करताना शेतात तण असल्यास त्याची पिकाबरोबर कापणी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कापणी करण्याअगोदर शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
  • पीक तयार होण्याच्या दहा दिवस अगोदर हेक्टरी चार किलो डायथेन-एम ४५ या बुरशीनाशकाची ८०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होऊन गुणवत्ता व उगवणशक्ती चांगली राखली जाते.
  • लवकर काढणीस तयार झालेल्या पिकाची कापणी धारदार विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी, जेणेकरून शेतात शेंगा राहणार नाहीत.
  • कापणी करताना झाडे उपटून येणार नाहीत, याची काळजी घ्यावी अन्यथा बियाण्यात मातीचे खडे मिसळू शकतात. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढिग लावू नयेत व कापलेले पीक शेतातच उन्हामध्ये वाळू द्यावे.
  • कापलेल्या पिकाचे ढिग लावल्यास बियाण्याच्या प्रतीवर व उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
  • काढणी केलेले सोयाबीन पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करणे. ताबडतोब मळणी करणे शक्य नसल्यास, पावसापासून संरक्षण करण्यासाठी पिक सुरक्षित ठिकाणी गोळा करावे.
  • मळणी यंत्राद्वारे मळणी करवायची असल्यास बियाण्यातील आर्द्रता १४ टक्क्यांपेक्षा कमी नसावी, तसेच मळणी यंत्राचे फेरे (आरपीएम) मिनिटाला ३५० ते ४०० पर्यंत मर्यादित ठेवावेत. 
  • मळणी यंत्र चालू असताना अधूनमधून पोत्यामध्ये पडणार्‍या बियाण्याकडे लक्ष ठेऊन बियांची डाळ होण्याचे प्रमाण जास्त होत असल्याचे निदर्शनास आल्यास आरपीएम कमी करावेत.
  • वरील सर्व पद्धतींद्वारे मळणी करत असताना जर एका पेक्षा जास्त सोयाबीनचे वाण असतील तर अशा वेळी त्यांची स्वतंत्रपणे मळणी करणे हे बियाण्याची शुद्धता राखण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
  • मळणी झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे सिमेंटच्या खळ्यावर किंवा ताडपत्रीवर एकसारखे पसरवून बियाण्यातील आर्द्रता १०-१२ टक्के होईपर्यंत उन्हात वाळवावे. वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडी-कचरा, माती, खडे इ. वेचून काढून ते स्वच्छ करावे.

- आघारकर संशोधन संस्था, पुणे

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीपीककाढणीपाऊस