Join us

शेतकरी बांधवांनो, विषबाधा टाळायची ना?; मग काळजी घेऊनच फवारणी करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:28 PM

शेतातील खरीप पिकांना फवारणी करायची असल्यास योग्य ती खबरदारी घेतल्यास विषबाधा टाळता येईल.

खरीप हंगामात वेळेवर पेरणी झालेल्या पिकांवर आगामी काही दिवसांत तणनाशक, कीटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. फवारणी करण्यापूर्वी व फवारणी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी आणि विषबाधा टाळावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला.

वाशीम जिल्ह्यासह राज्यात सध्या पेरणीची धावपळ सुरू आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या शेतातील पिकांची उगवण चांगल्याप्रकारे झाल्याचे दिसून येते. येत्या काही दिवसांत या पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी करण्याची धामधूम सुरू होईल. कीटकनाशक फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्यास विषबाधा झाल्याच्या घटना यापूर्वी वाशिम जिल्ह्यासह राज्याच्या काही भागात घडलेल्या होत्या. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करताना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

फवारणी करताना काय दक्षता घ्यावी?

  • - कीटकनाशकांचे मिश्रण काडी किंवा लाकडी दांड्याने नीट मिसळवून घ्यावे. अपघाताने औषधी अंगावर उडाल्यास त्वरित स्वच्छ धुवावे.
  • - नोझल साफ करण्यासाठी तार, काडी किंवा टाचणीचा वापर करावा, कीटकनाशके मूळ पॅकिंगमध्येच खरेदी करावी.
  • - संरक्षक कपडे, बूट, हात मोजे, नाकावरील मास्क, चष्मा इत्यादीचा वापर करावा, फवारणीनंतर आंघोळ करावी व फवारणीचे कपडे स्वच्छ धुवावे.

फवारणी करताना काय करू नये!

  • - कीटकनाशकाची वाहतूक अन्नपदार्थांसोबत करू नये, कीटकनाशके लहान मुलांच्या हाती लागू देऊ नये, उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी.
  • - कीटकनाशकाचा डबा हा अन्न अथवा पाण्याकरिता वापरू नये, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, फवारणी करताना धूम्रपान, तंबाखू, काहीही खाणे-पिणे टाळावे.
  • - फवारणीचे द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेवू नये, नोझल साफ करण्यासाठी तोंडांनी फुंकर मारू नये.

विषबाधा झाल्यास...विषबाधा झाल्यास शक्य तितक्या लवकर जवळच्या सरकारी आरोग्य केंद्र किंवा खासगी दवाखान्यात घेऊन जावे. याकरिता १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

फवारणी करताना योग्य ती खबरदारी घेतली नाही तर विषबाधा होण्याची शक्यता बळावते. विषबाधा झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पुढील उपचारासाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत उपचार सुरू झाले तर प्रभावी उपचारातून लवकर आराम मिळू शकतो. - डाॅ. सचिन पवार,विषबाधा तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणखरीपशेतकरीशेती