पीक लागवडीपासून ते वाढीस असताना त्याच्या विविध अवस्थेमध्ये पिकास वेगवेगळ्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. त्यानुसार खताचे व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते. स्फुरद पालाश युक्त खते पिकास उपलब्ध होण्यास वेळ लागतो.
संपुर्ण मात्रा पिक पेरणीच्या वेळेस द्यावी, तसेच आवश्यकता असल्यास त्यांच्या विद्राव्य स्वरुपातील खतांची वेळ फुलोऱ्याची वेळ, दाणे भरणे वेळेस विद्राव्य खतांच्या फवारणीचे अधिक फायदे होतात. नत्रयुक्त खतांचा ऱ्हास लवकर होत असल्यामुळे त्यांची आवश्यकतेनुसार दोन ते तीन भागात विभागणी करुन त्याची मात्रा पिकात द्यावी.
खतांची निवडखरीप पिकांसाठी मातीचा प्रकार व पीक यानुसार खताची निवड करावी. माती तपासणीमुळे जमिनीची सुपीकता व गुणदोष याबाबतची माहिती मिळते. जमीनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण, जमिनीचा सामु, सेंद्रिय कर्ब, विद्राव्य क्षारांचे प्रमाण इ. नुसार कोणत्या अन्नद्रव्यांची किती गरज आहे. यांचे प्रमाण ठरवता येते म्हणजेच जमिनीचे आरोग्य समजते. बाजारामध्ये अनेक प्रकारची खते उपलब्ध आहेत. परंतु कोणत्या खतांमध्ये कोणत्या अन्नद्रव्याचे किती प्रमाण व ते कोणत्या स्वरुपात आहे हे पाहून आपल्या पिकासाठी व जमिनीसाठी योग्य आहे का हे पडताळुन पाहणे आवश्यक आहे. अशा प्रकारे केलेला खतांचा वापर मुलभुत शिफारशीपेक्षा जास्त परिणामकारक ठरतो व अनावश्यक खतांचा वापर टाळता येऊ शकतो. उदा.• नायट्रेटयुक्त खते पाणी साचलेल्या जमिनीत वापरू नये कारण अशा जमिनीत नत्राचे विलगीकरणामुळे नायट्रेटचे रुपांतर वायुरुप नत्रात होते व ते पिकास उपलब्ध होत नाही.• ज्या जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे अशा जमिनीत अमोनीयम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट या सारखी गंधक पुरवणाऱ्या खतांचा वापर करावा• डाळ वर्गीय व गळीत पिकांमध्ये गंधकाची आवश्यकता जास्त असते अशा पिकास गंधक पुरवणाऱ्या खतांचा वापर जास्त करावा.• क्षारयुक्त जमीनीत युरीया वापरल्यास त्याचे नायट्रेटमध्ये रुपांतर होण्यास विलंब लागतो, परंतु नायट्रेट जमीनीत राहिल्यास पिकास अपायकारक ठरतो. म्हणून अशा जमिनीत अमोनीयम नायट्रेट वापरावे.• आम्लयुक्त जमिनी सोडून इतर जमिनीत पाण्यात विद्राव्य असलेल्या स्फुरदयुक्त खते वापरावीत. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट.• माती तपासणी अहवालात सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळुण आल्यास शिफारशी सुक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा सुध्दा द्यावी कारण ही अन्नद्रव्येसुध्दा मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याइतकीच महत्वाची असतात.