महाराष्ट्रात दरवर्षी फळझाडाची लागवड वाढत आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे येथील हवामान व जमीन फळझाडाच्या वाढीकरिता उपयुक्त आहे. महाराष्ट्रात इतर फळझाच्या लागवडीच्या क्षेत्राच्या जवळ जवळ ४० टक्के क्षेत्र लिंबुवर्गीय फळझाडाखाली येते.
यापैकी मराठवाड्यात औरंगाबाद, पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुणे आणि विदर्भात नागपुर, वर्धा, अमरावती व यवतमाळ या जिल्हात मुख्यतः लागवड केली जाते.
महाराष्ट्राच्या कॅलिफोर्निया म्हणजेच विदर्भात सिट्रस डायबॅक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे लिंबुवर्गीय फळबागा शेंड्यांकडून सुकत जाऊन त्याचे उत्पन्न हळूहळू प्रत्येक वर्षी कमी कमी होत आहे. या रोगास आरोह असे संबोधतात.
हा रोग निरनिराळ्या कारणामुळे होतो. पैकी लिंबूवर्गिय फळझाडांवरील सुत्रकृमी (टायलेनकुलस समीपेनेट्रन्स) विषाणु (व्हायरस) वाहून नेणारे किटक, बुरशी, अनुजीव, मायकोप्लाझमा आणि विषाणू हे या रोगास कारणीभूत आहे असे आढळून येते.
लिंबूवर्गीय फळझाडावरील सुत्रकृमीमुळे फळाच्या उत्पादनात जवळजवळ १५ टक्के घड येते. सुत्रकृमी हा जमिनीत राहणारा अतिसूक्ष्म दोऱ्यासारखा प्राणी आहे. त्याची लांबी ०.२ ते ०.५ सें. मी. असतो. तो जमिनीत अगर झाडाच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करीत असल्याने त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानीकडे आतापर्यंत फारसे लक्ष देण्यात आले नाही.
जीवनक्रम
- या सुत्रकृमीमध्ये नर आणि मादी असे दोन्ही प्रकार दिसून येत असले तरी नराच्या मिलनाशिवाय प्रजोत्पत्ती होऊ शकते.
- मादी सरासरी ९० ते १०० अंडी चिकट पदार्थाच्या वेष्टनात पुंजक्या पुंजक्याने घालते. अंडी लंबाकृत असून त्यास पातळ कवच असते.
- अंडी ८ दिवसात उबतात परंतू २४ अंश से. तापमानात अंडी उबवण्याकरिती १२ ते १४ दिवसाच्या कालावधी लागतो.
- अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या दान प्रकारच्या असतात. आखुड आणि जाड अळ्या पूर्ण वाढीनंतर नर बनतात तर लांबट पातळ अळ्या माद्या बनतात.
- नर आणि मादी अळ्याची वाढ चार अवस्थामध्ये पूर्ण होते. मादीचा जिवनक्रम दीड ते दोन महिन्याचा असतो.
- मादी ५ वेळा कात टाकते. नराचा आयुष्यकाळ १४ ते १६ दिवसात पूर्ण होतो. प्रथम अवस्थेतील अळ्यांमध्ये तोंडतील सुईसारखा सुक्ष्म आणि तिक्ष्ण अवयव येत नाही.
- दुसऱ्या अवस्थेत हा अवयव आढळतो. पुर्णावस्थेतील नरांची लांबी ०.३०६ ते ०.४०१ मि. मी. असते. जनन इंद्रियांची पुर्ण वाढ झालेली मादी काजुच्या बियासारखी असते.
अधिक वाचा: Urea Fertilizer युरिया वापरताय जरा जपूनच; अवाजवी वापर ठरू शकतो घातक
व्यवस्थापनाचे उपाय
१) शक्यतो निर्जंतुक रोपवाटिकेत वाढलेली रोपे लागवडीकरिता वापरावी.
२) रोपे लावतांना ती सुत्रकृमीला प्रतिकारक असलेल्या झाडापासून केलेली आहेत याची खात्री करूनच घ्यावी.
३) लागवडी अगोदर रोपांची मुळे गरम पाण्यात (४५० से.) सुमारे २५ मिनिटे किंवा फेनसल्फोथिऑनच्या ०.०७ टक्के द्रावणात बुडवावी.
४) सुत्रकृमीचा प्रादुर्भाव जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याच्या जास्त प्रमाणात असते. अशावेळी कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार हेक्टरी ३० ते ३५ किलो या प्रमाणात झाडाच्या भोवती बांगडी पध्दतीने १५ सें. मी. खोलीवर टाकून मातीने झाकून नंतर पिकास पाणी द्यावे.
५) झेंडू, सदाफूली आणि शेवंती यासारखी फूलझाडे वाफ्यात लावली तर सुत्रकृमीस प्रतिबंध होतो.
६) सूत्रकृमीच्या व्यवस्थापणाकरिता निंबोळी अथवा करंजीच्या पेंडीचा प्रति हेक्टरी १५०० किलो या प्रमाणात वापर करावा त्यामुळे नियंत्रणाबरोबर जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते.
७) पाच वर्षावरील संत्रावर्गीय झाडाकरीता ७५० ग्रॅम ते १ किलो निंबोळी चुरा झाडाच्या भोवती बांगडी पध्दतीने १५ सें. मी. खोलीवर टाकून मातीने झाकून नंतर पिकास पाणी द्यावे.
डॉ. पी. एन. दवणे, स. प्राध्यापक (किटकशास्त्रज्ञ)
डॉ. हितेंद्र गोरमनगर, स. प्राध्यापक
डॉ. ई. डी. बागडे, स. प्राध्यापक (रोगशास्त्रज्ञ)
डॉ. मेघा डहाळे (उद्यानविद्यावेत्ता)
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल, जि. नागपुर