सद्य परिस्थितीत आंबा बागेत मोहोर बाहेर पडलेला आहे. परंतु हवामान बदलामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. आंब्याच्या पालवी व मोहोरावर येणाऱ्या महत्वाच्या किड व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करायचे? ते पाहूया.
आंब्यावरील किडी१) तुडतुडेपिल्ले व प्रोड आंब्याच्या मोहोरावरील व नविन येणाऱ्या पोपटी रंगाच्या पालवी मधुन रस शोषून घेतात परिणामी मोहोराची गळ होते. तसेच तुडतुडे शरीरावाटे मधा सारखा चिकट पदार्थ बाहेत टाकतात त्यावर काळ्या रंगाच्या (कॅपनोडीयम) बुरशीची वाढ होते व झाड काळे पडते यालाच खार पडणे असे म्हणतात.नियंत्रण: तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास त्यापासुन संरक्षण करण्यासाठी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ९ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
२) शेंडा पोखरणारी अळीअळी पालवीच्या तसेच मोहोराच्या दांड्याला छिद्र पाडुन आत शिरते व आतील भाग खाते.नियंत्रण: या किडीच्या नियंत्रणासाठी डायक्लोरव्हॉस ७६ टक्के प्रवाही १० मि. ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
३) पाने खाऊन जाळे तयार करणारी अळी (लिफ वेबर)अळी आंब्याचे पाने खाऊन तिच्या लाळेतुन जाळे तयार करते. त्यामुळे झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.नियंत्रण: अळी च्या नियंत्रणासाठी अगोदर काठीच्या सहाय्याने जाळे काढावे व नंतर क्लोरपायरीफॉस २५ टक्के २० मि.ली. + सायपरमेथ्रीन १० टक्के ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी.
आंब्यावरील रोग१) बुरशीजन्य करपाकोवळ्या पानावर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले डाग पडुन वाढ खुंटते. पानांवरील डाग एकत्र येवून पानांवर चट्टे पडतात व पाने करपल्यासारखी वाटतात. मोहोरावर ही बुरशी पडल्यास तांबुस डाग पडुन मोहोर वाळतो.नियंत्रण: बागांची स्वच्छता करावी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास १२ टक्के कार्बेन्डॅझिम + मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.
२) भुरी रोगबुरशी पांढरट असुन प्रादुर्भावग्रस्त भागावर पांढरी भुकटी फवारल्या सारखी दिसते. डिसेंबर जानेवारी दरम्यान मोहोरावर तसेच क्वचित पालवीवर देखील या बुरशीची वाढ होते. मोहोर येताच रोगाची लागन झाल्यास फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. लहान फळांच्या देठावर देखील बुरशी वाढते त्यामुळे फळे गळतात.नियंत्रण: या रोगाच्या नियंत्रनासाठी थायोमेथॉक्झाम २५ टक्के ५ ग्रॉम अधिक हेक्झाकोनॅझोल ४ टक्के २० ग्रॉम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यामुळे भुरी रोगांपासुन आंबा मोहोराचे संरक्षण होते.
डॉ. जी. एम. वाघमारे (प्रभारी अधिकारी तथा प्राध्यापक)डॉ. व्ही. वाय. सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक)डॉ. आर. व्ही. नाईनवाड (सहाय्यक प्राध्यापक, उद्यानवेत्ता) श्री. पी. जी. सुरडकर (कृषि सहाय्यक)फळ संशोधन केंद्र, छ. संभाजीनगर