Join us

काजू पिकातील कीड नियंत्रण कसे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 11:21 AM

हवामानातील बदलाचा परिणाम काजू पिकावरही होऊ लागला आहे, कीडरोगापासून संरक्षण करण्यासाठी आंब्याप्रमाणे काजू पिकामध्येही कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. उत्पादनासाठी खर्च वाढला आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम काजू पिकावरही होऊ लागला आहे, कीडरोगापासून संरक्षण करण्यासाठी आंब्याप्रमाणे काजू पिकामध्येही कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. उत्पादनासाठी खर्च वाढला आहे. 

काजूवरील फुलकिडी- फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर फुलकीडींच्या (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून कीड व पिल्ले कोवळी पालवी, मोहोराचा देठ, कोवळ्या बिया व बोंडूवरील साल खरवडतात.त्यामुळे प्रादुर्भावीत ठिकाणी भुरकत रंगाचे चट्टे पडतात, बियांचा आकार वेडा-वाकडा होतो व बियांची गळ होते.

नियंत्रण- किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. किंवा असिटामिप्रीड २० टक्के एसपी ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.- प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास दुसरी फवारणी लगेचच ८ ते ९ दिवसांनी कीटकनाशक आलटून पालटून करावी.(टीप: किडीचा संपूर्ण जिवनक्रम १५ दिवसांमध्ये पूर्ण होत असल्याने किडीच्या नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते.)(टीप: किटकनाशकास लेबल क्लेम नाहीत).

काजूवरील ढेकण्या (टी मोस्कीटो बग)- फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर मावा आणि ढेकण्या (टी मोस्कीटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.हि कीड मोहोरातील/फळातील रस शोषून घेते तसेच पिल्ले आणि प्रौढ यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहोर सुकून जातो, मोहोराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात.फळांची गळ दिसून येते.मावा किटक अंगातून मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकतात आणि त्यावर मुंग्या आर्कषित होताना दिसून येतात.

नियंत्रण- किडीच्या नियंत्रणासाठी मोहोर फुटण्याच्यावेळी प्रोफेनोफोस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. आणि फळधारणेच्या वेळी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. किंवा असिटामिप्रीड २० टक्के एसपी ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी करावी.फवारणी शक्यतो सकाळी १०.०० पूर्वी किंवा संध्याकाळी ४.०० नंतर करावी.(टीप: किटकनाशकास लेबल क्लेम नाहीत).- एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेणे टाळावे.

काजूवरील बोंड आणि बी पोखरणारी अळी- फळधारणा अवस्थेतील काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून किडीची अळी बी व बोंडावरील भाग खरवडून त्याच्यावर आपली उपजीविका करते.त्यानंतर अळी बी व बोंडामध्ये प्रवेश करून आपला प्रवेश मार्ग विष्टेच्या सहाय्याने बंद करते.

नियंत्रणअळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस १५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

पाणी आणि आच्छादन फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाडास या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने पाणी संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस देण्याची व्यवस्था करावी. तसेच नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणशेतीपीककोकण