Join us

Soybean Pest Management: खोडमाशी व चक्रभुंगा यांपासून सोयाबीनला वाचविण्याचे सोपे उपाय

By बिभिषण बागल | Published: July 22, 2023 10:00 AM

Soybean Khodmashi Chakribhunga सोयाबीनचे कमी उत्पादन येण्यामागील विविध कारणापैकी पिकावर होणारा विविध किडींचा प्रादुर्भाव हे एक महत्वाचे कारण आहे.

सोयाबीनचे कमी उत्पादन येण्यामागील विविध कारणापैकी पिकावर होणारा विविध किडींचा प्रादुर्भाव हे एक महत्वाचे कारण आहे. सोयाबीन पिकाचे खोड पोखरणाऱ्या, पाने खाणाऱ्या आणि शेंगातील दाणे खाणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होते.

खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये खोड माशी आणि चक्रभूंग्याच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या किडींचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

१) खोडमाशी: वातावरणातील जास्त आर्द्रता, उबदार तापमान, रिमझिम पाउस आणि त्यानंतर पडणारा पावसातील खंड खोडमाशीच्या प्रादुर्भावासाठी पोषक असतो. खोडमाशीचा प्रादुर्भाव बी उगवणीपासून १०-१५ दिवसांनी रोपावस्थेत सुरू होतो व तो पुढे पीक कापणीपर्यंत राहतो. वातावरण पोषक असल्यास कधीकधी तर ९० ते १०० टक्के झाडे कीडग्रस्त दिसून येतात.  त्यामुळे उत्पादनात जवळपास ३० ते ६० टक्क्यांपर्यंत घट येते.

  • प्रौढ खोडमाशी घरातील माशीपेक्षा लहान आकाराची आणि चमकदार काळया रंगाची असते.
  • मादी माशी पानांच्या पेशीत फिक्कट पिवळसर अंडी घालते. अंड्यातून ४ दिवसात बिनपायाची पिवळसर रंगाची अळी बाहेर पडते. अळी तोंडाकडून टोकदार तर मागील बाजूस गोलाकार असते.
  • अळी पान पोखरुन पानाच्या शिरेमधून देठात शिरते. देठातून खोडात शिरुन आतील भाग खाते. खोड पोखरत जमिनीपर्यंत पोहोचते. पोखराल्यामुळे खोडात नागमोडी पोकळ्या तयार होतात आणि असे खोड आतून लालसर तपकिरी रंगाचे दिसते
  • पूर्ण वाढ झालेली अळी खोडामध्येच कोषावस्थेत जाते. प्रौढ माशीला बाहेर येण्याकरीता जमिनीलगत किंवा मोठ्या झाडावर वरच्या बाजूस अळीने गोलाकार छिद्र केलेले आढळते. कोषावस्था ७ ते १० दिवसांची असते.
  • वर्षभरात खोडमाशीच्या ८ ते ९ पिढ्या पूर्ण होतात.

खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे लहान रोपे, पाने आणि फांद्यादेखील सुकतात. रोपावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास तीन पाने कोमेजून सुकलेली दिसतात.एकरी रोपांची संख्या कमी होते. खोडमाशीग्रस्त झाडाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो त्यामुळे झाडावरील फुलांची गळ होते आणि शेंगा कमी प्रमाणात लागतात. शेंगामधील दाण्याचे वजन देखील कमी होते त्यामुळे उत्पादनात घट येते.

२) चक्रभुंगाचक्रभूंग्याचा प्रादुर्भाव पेरणीपासून एक महिन्याच्या पुढे सुरु होतो व तो पुढे कापणी पर्यंत सुरूच राहतो.

  • प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा व ७ ते १० मिमी लांब असतो. समोरच्या पंखांचा अर्धा भाग काळा असतो
  • प्रौढ मादी देठ, फांदी किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करते व त्याच्या मधल्या भागात अंडी घालते. चक्रकापाच्या वरचा भाग त्यामुळे वाळतो.  एका ठिकाणी एक अशी जवळपास ७८ अंडी एक मादी घालते.
  • चक्रभुंग्याची अंडी फिकट पिवळसर आणि लांबट आकाराची असतात. तीन ते चार दिवसात अंडयामधून अळी बाहेर येते.
  • लहान अळी पांढऱ्या रंगाची तर मोठी अळी पिवळसर रंगाची व गुळगुळीत असून शरीरावर लहान लहान उभट भाग दिसतात. अंडयातून निघालेली अळी चक्रकापाच्या खालील देठ, फांदी पोखरत खोडाच्या बुडापर्यंत पोहोचते 
  • किडीची अळी तसेच प्रौढ या दोन्ही अवस्था पिकाचे नुकसान करतात. पीक १५ ते २० दिवसांचे असतांना प्रादुर्भाव झाल्यास जास्त नुकसान होते.
  • चक्रभुंग्याच्या  जास्त प्रादुर्भावामुळे शेंगा धरण्याचे प्रमाणात, दाण्याचे संख्येत तसेच वजनात घट येते. पीक काढणीच्या वेळी चक्रकापाच्या ठिकाणी खोड तुटून पडते आणि नुकसान होते.

सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, मिरची, कारली इत्यादी पिकांवर देखील चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव होतो. जुलै ते ऑक्टोबर पर्यंत कीड कार्यरत असते. पूर्ण वाढ झालेली चक्रभुंग्याची अळी पुढच्या पावसाळयापर्यत (ऑक्टोबर ते जून) झाडाच्या खोडात सुप्तावस्थेत जाते. पहिला पाऊस झाल्यानंतर अनुकूल वातावरणात अळीची सुप्तावस्था संपते आणि ती कोशात जाते. कोषातून प्रौढ भुंगा बाहेर येतो व पिकावर अंडी घालतो. अनुकूल वातावरणात एका वर्षात चक्रभुंग्याचे दोन जीवनक्रम होतात.

खोडमाशी आणि चक्रभुंग्याची आर्थिक नुकसान पातळी

खोड माशी

सरासरी १० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त रोपे

चक्रभुंगा

सरासरी १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा ३ ते ५ प्रादुर्भावग्रस्त झाडे प्रति मिटर ओळीत

निरिक्षणा अंती किडींच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे दिसून आल्यासच रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीचे उपाय योजावेत.

सोयाबीनवरील खोडमाशी आणि चक्रभुंग्याचे एकात्मिक व्यवस्थापन१) पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे.२) पिकाला नत्र खताची मात्रा शिफारशीप्रमाणेच द्यावी. जास्त नत्र दिल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढतो.३) चक्रभुंगाग्रस्त झाडाची पाने, फांद्या यांचा तोडून आतील किडीसह नाश करावा४) ज्या शेतात खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होतो अशा ठिकाणी पेरणीपूर्वी थायमेथोक्झाम ३० एफ.एस. १० मिली प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी या बीजप्रक्रियेमुळे खोडमाशीसोबतच रस शोषक किडींच्याही व्यवस्थापनास मदत होते.५) पेरणीनंतर १५ दिवसांनी एकरी ४० ते ५० पिवळे चिकट सापळे लावून नियमीतपणे किडींच्या प्रादुर्भावाकडे लक्ष ठेवावे.६) पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्काची करावी. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.७) खोडमाशीने किंवा चक्रभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच- इथिऑन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा- क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ मिली किंवा- थायमेथोक्झाम १२.६० + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५० झेड सी २.५ मिली किंवा- क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल ९.३० + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ४.६० झेड सी ४ मिली यापैकी कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शिफारस केलेले फवारणीच्या कीडनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पॉवर स्प्रेयरचा वापर करावयाचा झाल्यास पाण्याचे प्रमाण तेच ठेवून किटकनाशकाचे प्रमाण तीनपट करावे. कीटक नाशकाची फवारणी करतांना विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.

डॉ. चारुदत्त द. ठिपसेविषय विषेषज्ञ (पीक संरक्षण) कृषि विज्ञान केंद्र, अकोला८२७५४२०६२

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणपीकपीक व्यवस्थापनखरीप