गेले काही दिवस पाऊस गायब आहे. त्यामुळे भाताची खाचरे वाळली आहेत. नदीकाठच्या खाचरात पाणी असले तरी त्याचा निचरा होत नसल्याने पाणी तापत आहे. निचरा होत नसलेल्या क्षेत्रात तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे.
निचरा योग्य न होणे, घट्ट लागवड, नत्र खतांच्या मात्रा वाजवीपेक्षा जास्त असल्यास तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव अधिक होतो. तुडतुडे व त्याची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी भाताची पाने पिवळी पडतात व नंतर वाळतात.
विशेषतः शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले गोलाकार भाताचे पीक दिसते. याला 'हॉपर बर्न' असे म्हणतात. अशा रोपांपासून लोंब्या बाहेर पडत नाहीत. जर पडल्याच तर दाणे पोचट असतात.
कसे कराल कीड नियंत्रण
- या किडीच्या नियंत्रणासाठी रोपे अत्यंत दाट लावू नयेत.
- दोन ओळीतील अंतर २० सेंटीमीटर व दोन चुडातील अंतर १५ सेंटीमीटर पुरेसे आहे.
- शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रासाठी नत्र खताच्या मात्रा वाजवी प्रमाणात द्याव्यात.
- लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. कीड नियंत्रणासाठी कीड प्रादुर्भावावर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
- जर एका बुंध्यावर पाच ते दहा तुडतुडे असतील तर कीटकनाशकांचा वापर करावा.
- कीटकनाशकांची फवारणी करावी. कीटकनाशक बुंध्यावर पडेल अशी दक्षता घ्यावी.
एकात्मिक व्यवस्थापन
१) तपकिरी तुडतुड्यांना कमी बळी पडणाऱ्या जातींची लागवड करावी.
२) लावणी दाट करू नये. दोन ओळीतील अंतर २० सें.मी. आणि दोन चुडातील अंतर १५ सें.मी. ठेवावे रोपांची पट्टा पध्दतीने लागण करावी.
३) प्रत्येक चुडात ५ ते १० तुडतुडे या आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे कीटकनाशकाची फवारणी करावी. यासाठी हेक्टरी ५०० लिटर पाण्यात इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही १२५ मि.ली. किंवा थायामेथॉक्झाम २५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार किटकनाशक १०० ग्रॅम किंवा क्लोथियानिडीन ५० टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार कीटकनाशक २५ ग्रॅम किंवा अॅसीफेट ७५ टक्के पाण्यात विरघळणारी ६२५ ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के प्रवाही ११०० मिली किवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १५०० मिली/हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
अधिक वाचा: शाश्वत उत्पन्नासाठी बारमाही उत्पादन देणारं हे भाजीपाल्याचं पिक घ्या