Join us

भात पिकात आल्यात ह्या किडी कसे कराल नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:26 PM

Pest of Rice सततचा पाऊस आणि ढगाळ हवामान असल्यामुळे कीडरोग बळावण्याचा धोका आहे. सध्या पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.

सततचा पाऊस आणि ढगाळ हवामान असल्यामुळे कीडरोग बळावण्याचा धोका आहे. सध्या पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.

या वर्षी मृग नक्षत्रापासून पाऊस सुरू झाल्याने पेरणी वेळेवर झाली, शिवाय पावसावर अवलंबून शेती असल्याने लागवडही वेळेवर पूर्ण झाली. मात्र लागवडीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत.

अनेक भात लागवड केलेल्या क्षेत्रात रोपांच्या वरून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. वरकस, निचरा होणान्या क्षेत्रातील भात रोपांची वाढ चांगली झाली आहे. नदीकिनाऱ्यालगतच्या क्षेत्रात पुराच्या पाण्यामुळे माती, दगड लागवड केलेल्या खाचरात जमा झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ज्या क्षेत्रात निचरा करणे शक्य आहे, तेथे शेतकरी तो करत आहेत. पाणी भरलेल्या क्षेत्रात निळेभुंगेरे, पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी, करपा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पिकाची वाढ खुंटली असून, फुटवे येण्याची प्रक्रिया थांबली आहे. पाऊस न थांबल्यास नुकसान अटळ आहे.

ढगाळ वातावरणाने भातपिकाची वाढ खुंटली● पेरणी, लागवड वेळेवर झाली, तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकाची वाढ खुंटली आहे.● सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे व पाणी साचून राहिल्याने नवीन फुटवे झालेले नाहीत.● कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, उत्पादनावर परिणाम होण्याचा धोका आहे.

गादमाशी आढळल्यास काय कराल?गादमाशी आकाराने डासासारखी असून गुलाबी असते. ही अळी रोपाच्या आत शिरून अंकुर कुरतडते. अळीच्या भोवतालचा अंकुराचा भाग फुगतो व त्याची कांद्याच्या पातीसारखी नळी तयार होते. या किडीच्या नियंत्रणासाठी दाणेदार कीटकनाशकांची मात्रा द्यावी. कीडग्रस्त (नळ) रोपे उपटून जाळावीत. लावणीनंतर १० दिवसांनी ०.३ टक्के दाणेदार फिप्रोनिल २५ किलो प्रमाणे जमिनीवर टाकावे.

हिरवे तुडतुडेहे तुडतुडे आकाराने लहान, पूर्णावस्थेत हिरवे व पंखावर काळे ठिपके किंवा चट्टे दिसतात. पानातील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात, रोपांची वाढ खुंटते, ही कीड टुंग्रो रोगाचा प्रसार कडते. त्यामुळे वेळेवर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना अवलंबणे गरजेचे आहे.

निळे भुंगेरेभात खाचरात जास्त दिवस पाणी साचून राहिल्यास या किडीचा प्रादूर्भाव होतो. त्यामुळे खाचरातील पाण्याचा निचरा करून बांधावरील किडीसाठी उपयुक्त वनस्पती नष्ट कराव्यात. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.

पान गुंडाळणारी अळीपाने गुंडाळणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी अळ्यांसहित पानाच्या गुंडाळ्या जमा करून नष्ट करतात. पिकांवर किंवा काबर्बारिल भुकटी धुरळावी.

तपकिरी तुडतुडेपाण्याचा निचरा न झाल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. भाताची पाने पिवळसर पडतात. अॅसिफेट ७५ टक्के ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. फवारा बुंध्यावर पडेल, याची दक्षता घ्यावी.

कीड व्यवस्थापन■ भात खाचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्ती करावी. जमीन समपातळीत आणावी.■ कीड प्रतिकारक वाणांची लागवड करावी.■ भात शेतात निसर्गत: विविध परभक्षी किटक असतात त्यांचे संवर्धन करावे.

निंबोळी अर्काचा परिणाम काय?किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी केली जाते. काही किडी अर्काच्या वासामुळेच दूर जातात, तर कीडवाढ रोखते, पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडा नियंत्रणासाठी निंबोळी अर्क फायदेशीर आहे. घरीच हा अर्क तयार करता येतो.

टॅग्स :भातपीककीड व रोग नियंत्रणशेतकरीशेतीपाऊस