कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्ट्या महत्वाचे फुलपिक आहे. हे पिक मूळचे दक्षिण अफ्रिकेतील परंतू जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये याची लागवड केली जाते. भारतात दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, बेंगलुरु आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात याची लागवड केली जाते. ग्लॅडिओलसच्या लांब दांड्यावर असणारी आकर्षक रंगीत फुले फुलदाणीत ठेवल्यास सात ते आठ दिवस क्रमाने उमलतात.
हवामानकडक उन्हाळा आणि सतत व जोरदार पावसाचा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलस पिकाची लागवड करता येते. तरीही खरीप आणि रब्बी हेच दोन हंगाम प्रमुख समजले जातात. सरासरी २० ते ३० अंश सेंटीग्रेड तापमानात या पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचे रंगही चांगले येतात. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उन्हाळा सौम्य असल्यामुळे हे पिक चांगले येते. या कालावधीत फुलांचा तुटवडा असल्याने बाजारभाव देखील चांगले मिळतात. वर्षभरातील बाजारभाव व फुलांची मागणी यांचा विचार करुन संपूर्ण पिकाची एकाच वेळी लागवड न करता १५ ते २० दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्याने केल्यास फुलांना बाजारभाव चांगला मिळू शकतो.
जमीनमध्यम ते भारी प्रतीची परंतू पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. चोपण, खारवट तसेच चुनखडीयुक्त जमीन या पिकास मानवत नाही. सर्वसाधारण जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
लागवडीसाठी बेणे१) किफायतशीर उत्पादनासाठी योग्य जातींचे निरोगी आणि विश्रांती पूर्ण झालेल्या कंदांची निवड करुन कॅप्टन बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात बुडवावेत. लागवडीसाठी ४ सेंमी अथवा त्याहून अधिक व्यास असलेले कंद निवडावेत.२) सरी वरंबा, सपाट वाफे किंवा गादीवाफे पद्धतीने लागवड करता येते. सपाट अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास दोन ओळीत अंतर ३० सेंमी व दोन कंदांतील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे.३) पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने लागवडीनंतर पिकांमध्ये कामाच्या सुलभतेच्यादृष्टीने फुलदांडे सरळ येण्यासाठी आणि फुले येऊन गेल्यावर कंदांचे योग्य पोषण होण्यासाठी सरी-वरंबे पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते. अशा पद्धतीने लागवड करताना दोन सरीतील अंतर ४० ते ४५ सेंमी व दोन कंदातील अंतर १० ते १५ सेंमी आंतर ठेवून लागवड केली असता हेक्टरी सव्वा ते दिड लाख कंद पुरेसे होतात.
अधिक वाचा: हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह, प्लास्टिक कव्हर व मल्चिंगसाठी अनुदान; कसा कराल अर्ज?
जातींची निवड• व्यापारीदृष्ट्या लागवडीसाठी योग्य जातींची निवड करणे फार महत्वाचे आहे. उत्तम प्रतिच्या जातीच्या निकषामध्ये फुलांचा आकर्षक रंग, फुलदांड्यावरील एकूण फुलांची संख्या, कमीत कमी चौदा असावी. त्या जातीची किड व रोग प्रतिकारक आणि उत्पादनक्षमता चांगली असावी आणि महत्वाचे म्हणजे ती जात आपण ज्या हवामानात लावणार आहोत त्याठिकाणी चांगली येणारी असावी.• परदेशात आणि भारतात विविध ठिकाणी संकरीत जातींचीनिर्मिती केली जाते, परंतू सर्वच जाती सर्व ठिकाणी चांगल्या येऊ शकतील असे नाही. याकरीता कोणत्याही जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याअगोदर त्याबद्दलची तांत्रिक माहिती घेणे आणि शक्यतो थोड्या क्षेत्रावर लागवड करुन खात्री करुन घेणे हितावह ठरते. महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वित पुष्पसंशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे परदेशातील व भारतातील ग्लॅडिओलसच्या विविध जातींचा तुलनात्मक अभ्यास करुन व काही संकरीत जातींची निर्मिती करुन निवड करण्यात आली आहे.
ग्लॅडिओलसच्या विविध जाती
अ.क्र | जातीचे नाव | फुले येण्यास लागणारे दिवस | फुल दांड्यावरील फुलांची संख्या | फुलांचा रंग |
१ | संसरे | ७७ | १७-१८ | पांढरा |
२ | यलोस्टोन | ८० | १५-१६ | पिवळा |
३ | ट्रॉपीकसी | ७७ | १३-१४ | निळा |
४ | फुले गणेश | ६५ | १६-१७ | फिकट पिवळा |
५ | फुले प्रेरणा | ८० | १४-१५ | फिक्कट गुलाबी |
६ | सुचित्रा | ७६ | १६-१७ | फिक्कट गुलाबी |
७ | नजराना | ८१ | १३-१४ | गर्द गुलाबी |
८ | पुसा सुहागन | ८४ | १३-१४ | लाल |
९ | हंटींग साँग | ८० | १४-१५ | केशरी |
१० | सपना | ५९ | १३-१४ | पिवळसर सफेद |
११ | व्हाईट प्रॉस्परिटी | ८१ | १५-१६ | पांढरा |
ग्लॅडिओलस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनग्लॅडिओलस पिकामध्ये हेक्टरी ८० टन चांगले कुजलेले शेणखत, माती परीक्षणानुसार ३०० किलो नत्र, २०० किलो स्फूरद आणि २०० किलो पालाश खते द्यावी. शेणखत लागवडीपूर्वी जमिनीत चांगले मिसळून द्यावे.• पालाश व स्फूरदची मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची मात्रा तीन समान हप्त्यातून पिकाला २, ४ व ६ पाने आल्यावर म्हणजेच लागवडीनंतर ३, ५ व ७ आठवडयांनी द्यावी.• लागवडीनंतर पिकाला नियमितपणे परंतू योग्य पाण्याचा आवश्यक तेवढा पाणीपुरवठा करावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे दोन पाळ्यातील अंतर ७ ते ८ दिवसांचे असावे.• फुले काढून घेतल्यावरही कंदाच्या वाढीसाठी पुढे एक ते दीड महिना नियमित पाणी देण्याची आवश्यकता असते. लागवडीनंतर एक ते दोन खुरपण्या व महिन्यातून एकदा हलकीशी खांदणी करुन पिकाला मातीची भर दयावी. अशा पद्धतीने पिकास भर दिली असता फुलदांडे सरळ येण्यास, जमिनीतील कंदांचे चांगले पोषण होण्यास मदत होते.
अधिक वाचा: रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे?
फुलांची काढणी व उत्पादन• लागवडीनंतर निवडलेल्या जातीनुसार आणि कंदांना दिलेल्या विश्रांतीच्या काळानुसार ६० ते ९० दिवसात फुले फुलू लागतात.• पुढे महिनाभर काढणी चालू राहते. फुलांच्या दांड्यावरील पहिले फूल कळीच्या अवस्थेत असताना रंग दाखवून उमलू लागते. अशा अवस्थेत झाडाची खालची पाने शाबूत ठेवून फुलांचे दांडे छाटून घ्यावेत.• फुलदांड्यांच्या लांबीनुसार प्रतवारी करुन बारा फुलांच्या दाड्यांची एक याप्रमाणे जुड्या बांधून त्याभोवती वर्तमानपत्राचा कागद बांधून कागदाच्या खोक्यात १५ ते २० जुड्या भरुन विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेत पाठवावे.• एक हेक्टर क्षेत्रातून दिड ते दोन लाख फुलदांडे मिळतात. फुलांच्या चांगल्या उत्पादनासाठी कंदाची काढणी आणि साठवण या दोन गोष्ठी अत्यंत महत्वाच्या आहेत.• फुलदांडे काढताना झाडावर चार पाने ठेवलेली असतात. या चार पानांच्या अन्नांशावर जमिनीत कंदांचे पोषण होत असते. सुमारे दिड ते दोन महिन्यात झाडांची ही हिरवी पाने पिवळी पडून सुकु लागतात. अशा वेळी पिकास पाणी देणे बंद करावे.• पाणी देणे बंद केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी जमिनीतील कंद काळजीपूर्वक त्यांना इजा न होता काढावेत.• काढलेले मोठे कंद व लहान कंद २.५ ग्रॅम कॅप्टन हे बुरशीनाशक १ लि. पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात १५ ते २० मिनीटे भिजत ठेवून मग ३ ते ४ आठवडे सावलीत सुकवून पोत्यात भरुन शितगृहामध्ये ठेवावेत. शीतगृहात साठवण केली असताना पुढील पिकाची वाढ एकसारखी होऊन फुले येण्याचे प्रमाण देखील वाढते आणि साठवणूकीत कंदाचे कंदकूज या रोगापासून बचाव होतो. हेक्टरी सुमारे दीड ते दोन लाख कंद देखील मिळतात.
विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे