वरईपासून ‘भगर’ बनविली जाते. आपल्या राज्यात उपवासासाठी मोठ्या प्रमाणात भगरचा आहार घेतला जातो. पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ मध्ये ऑक्टोबर महिना हा नवरात्री महोत्सवाला वरईसाठी समर्पित केला आहे.
वरई पिकाचे महत्त्ववरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते. वरईत स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळतात म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. वरईत असलेल्या व्हिटॅमिन बी-३, सी, ए व इ जास्त प्रमाणात असतात. वरईत पोटॅशियम, लोह, जस्त व कॅल्शियम हि खनिजे उपलब्ध असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वरई धान्याचा आहारात वापर केल्याने हृदयाशी निगडित व्याधी नियंत्रणात ठेवण्यासाठी लाभ होतो. शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. वरई मध्ये अॅण्टीऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्वचा, केस यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. वरईतील सर्व पौष्टिक घटकांचा विचार केल्यास रक्तातील कोलेस्टेरोल, शर्करा प्रमाण, पोटाचे व पचनाचे विकार कमी करण्यास मदत होते.
वरी/वरई/कुटकी(Little millet)हे गवतवर्गीय कुळातील पीक असून या पिकाचे शास्त्रीय नाव (Panicum sumatrense) असे आहे. या पिकाची लागवड प्रमुख्याने जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण विभाग या कृषी हवामान विभागातील डोंगराळ भागात केली जाते. वरी हे महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांपैकी महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी हे प्रमुख पौष्टिक तृणधान्य पीक आहे.
पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्त्वकमी पक्वता कालावधी असणारी पिके, हलक्या जमिनीत उत्तम वाढ होते. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात. सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत. बदलत्या हवामानात तग धरणारी पिके व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर व भविष्यात मागणी वाढणारी पिके आहेत. या पिकांपासून उत्तम प्रतीचे धान्य व जनावरांसाठी सकस चारा मिळतो.
वरी/वरई/कुटकी पौष्टिक गुणधर्मअ) प्रथिने व खनिज पदार्थ: या पिकांमध्ये खालील प्रमाणे पौष्टिक तत्वे असतात. दैनंदिन मानवी आहाराच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पौष्टिक तृणधान्य आहे. यामध्ये पौष्टिक घटकांबरोबरच चांगल्या प्रतीचे पोषक तंतूमय पदार्थ असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. या पिकाच्या धान्यामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण भात आणि गहू धान्यापेक्षा जास्त असते. तसेच कॅल्शियम , मॅग्नेशियम व लोह या खनिजाचे प्रमाण अधिक आहे.ब) जीवनसत्वे: भरडधान्य पिकांचा आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. वरी/वरई धान्यामध्ये थायमिन बी-१ व फॉलिक अॅसिड याचे प्रमाण सर्वाधिक आहे. नित्य सेवन करणाऱ्या लोकांमध्ये पचनाचे विकार, हृदयरोग आणि मधुमेहाचे प्रमाण कमी करता येऊ शकते. या धान्यापासून भगर, डोसा, भाकरी, माल्ट, नूडल्स, पापड, आंबिल, इडली, बिस्किटे यासारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात.
सुधारित लागवड तंत्रज्ञानजमीन व हवामान: या पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील अतिपावसाच्या उप-पर्वतीय विभाग, पश्चिम घाट विभाग आणि कोकण विभागातील डोंगर उताराच्या जमिनीवर केली जाते.
पूर्वमशागत: जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.
सुधारित वाणफुले एकादशी हे वाण १२० ते १३० दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी ११ ते १२ क्विंटल असते. हे उशीरा पक्व होणारे व उंच वाढणारे वाण आहे.कोकण सात्विक हे वाण ११५ ते १२० दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी १८ ते २० क्विंटल असते. हे मध्यम पक्वता व अधिक उत्पादकता देणारे पिक आहे.
बियाणे व पेरणीची पद्धत पेरणीची/लावणीची वेळया पिकाचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. पिकाची लागवड मुख्यत्वे रोप लागण पद्धतीने केली जाते. रोप लागण पद्धतीने लागवड करायची असल्यास ४ ते ५ किलो बियाणे/हेक्टरी वापरावे. रोपवाटिका करताना गादीवाफे तयार करून त्यावर बियाणे ओळीमध्ये पेरून घ्यावे. बियाणे १.०० ते १.५ से. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उगवण चांगली होते.
बीज प्रक्रियाबियाणे पेरणीपूर्वी ‘अझोस्पिरिलम ब्रासिलेंस’ आणि ‘अस्पर्जीलस अवामोरी’ या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास २५ गॅम प्रमाणे करावी.
रोप लावणी पद्धतगादी वाफ्यावर रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुनर्लागण करावी. रोपलागण करताना दोन ओळीमधील अंतर ३०.० से.मी. (एक फूट) व दोन रोपामंधील अंतर १०.० से.मी. ठेवावे.
खत व्यवस्थापनपेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेणखत अथवा कंपोष्ट खत ५ ते १० टन प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे. या पिकासाठी रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र, २० किलो स्फूरद आणि २० किलो पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे. अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व संपूर्ण स्फुरद मात्रा पेरणी करताना द्यावी व उरलेले अर्धे नत्र पेरणी नंतर एक महिन्याने द्यावे.
आंतरमशागतपीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात त्यामुळे तण नियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.
आंतरपिके शिफारसपिकाचे अधिक धान्य उत्पादन आणि निव्वळ नफा मिळविण्यासाठी उप-पर्वतीय विभागात वरी/वरई पिकामध्ये कारळा ४:१ या प्रमाणात आंतरपीक घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पीक संरक्षणखोडमाशी: पेरणीनंतर पीक ६ आठवड्याचे असताना खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरु होतो. या किडीच्या अळीद्वारे मुख्य खोडाचे नुकसान होऊन मर होते. त्यामुळे फुटव्यावर परिणाम होतो. सर्वाधिक नुकसान जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाणवते.उपाययोजना: पावसाळा सुरु होताच ७ ते १० दिवसांच्या आत पेरणी करावी तसेच पेरणीकरिता जास्त बियाणे वापरावे.
काढणी व मळणीपिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. साधारणपणे १०० ते १२० दिवसांत पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करावी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करुन ठेवावे.
उत्पादनवरी/कुटकी पीक हे लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या सुधारित निविष्ठा व तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे C4 वर्गातील पीक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी १३ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.
संदर्भअखिल भारतीय समन्वीत नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर