महाराष्ट्रात भुईमूगाखाली जवळपास ३.१५ लाख हे. क्षेत्र असून सरासरी उत्पादकता मात्र १,२४६ कि./हे. एवढीच आहे. यापैकी २.४४ लाख हे. क्षेत्र खरीप तर ७१ हजार हे. क्षेत्र रबी व उन्हाळी लागवडी खाली आहे. खरीप भुईमुगापेक्षा (१,२११ कि./हे.) उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता (१,३६४ कि./हे.) जास्त आहे.
भुईमुगाच्या दाण्यामध्ये ५०% तेल, २५% प्रथिने, १८% कर्बोदके, ५% पाणी व अल्प प्रमाणत जीवनसत्वे आहेत. सतत १० तास उकळलेल्या तेलाच्या गुणधर्मात बदल होत नाही. शेंगदाणे खाण्यास रुचकर व पचण्यास सुलभ असतात. शेंगदाणे खाल्ल्यास शारीरिक पेशी देखील सुदृढ होतात, म्हणूनच त्याला 'गरिबांचे काजू' देखील म्हणतात.
जमीन
भुईमूग हे पीक मध्यम, चांगला निचरा असलेल्या, मऊ, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत चांगले येते. खूप भारी, चिकट व कडक होणाऱ्या जमिनीत शेंगाची वाढ चांगली होत नाही. तसेच शेंगा खुडण्याचे प्रमाण वाढते. रबी व उन्हाळयात पाणी द्यावे लागत असल्याने जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे.
पूर्वमशागत
जमिनीचा कमीत कमी २० से.मी. थर भुसभुशीत करणे आवश्यक आहे. यासाठी ६-१२ इंच खोल नांगरटी नंतर उभी आडवी वखरणी करावी. शेवटच्या वखराच्या पाळी पूर्वी हेक्टरी ७.५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास वरंबा चार ओळीचा असावा. फवारा पद्धतीने पाणी देण्याची सोय नसल्यास सरी वरंबा दोन ओळीचा असावा.
हवामान
तापमान व भुईमूग वाढीचा घनिष्ट संबंध आहे. तापमान २०- ३० अंश से. असल्यास भुईमूगाच्या झाडाची वाढ चांगली होते. झाडाच्या कायीक वाढीसाठी २७-३० अंश से. तापमान योग्य असते. उन्हाळी हंगामात तापमान १९ अंश से. पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, अन्यथा उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तापमान सतत ३३ अंश से. पेक्षा जास्त असल्यास परागकणांच्या जीवनक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून पेरणीची वेळ अतिशय महत्वाची आहे.
पेरणीचे हंगाम
खरीप : १५ जून ते ७ जुलै
रब्बी : १५ ते ३० सप्टेंबर
उन्हाळी : १५ जानेवारी ते ८ फेब्रुवारी
वाण
उन्हाळी लागवडीचे महत्व उन्हाळी हंगामात दिवसा १० ते १२ तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो. पाण्याची मुबलक उपलब्धता, किडी - रोगांचा कमी प्रादुर्भाव व स्वच्छ सूर्यप्रकाश इ. मुळे खरीपापेक्षा उन्हाळी भुईमुगाचे जास्त उत्पादन मिळते. शिवाय उन्हाळ्यात भुईमूगाच्या पाल्याचा जनावरांना पौष्टिक व पुरवणीचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो तसेच पिकांची फेरपालट साध्य करता येते. तसेच उन्हाळी भुईमुगात तेलाचे प्रमाण खरीपापेक्षा जास्त असल्यामुळे अधिक तेलासाठी उन्हाळी पिक फायद्याचे ठरते.
अ.क्र | वाण | पक्वतेचा कालावधी (दिवस) | प्रकार | हंगाम | सरासरी उत्पादन (क्वि./हे.) |
१ | एस.बी. ११ | ११०-११५ | उपट्या | खरीप/उन्हाळी | १२-१४ / २०-२५ |
२ | टीएजी २४ | १००-१०५ | उपट्या | खरीप/उन्हाळी | १४-१६ / ३०-३५ |
३ | एलजीएन -१ | १०५-११० | उपट्या | खरीप/उन्हाळी | १४-१६ / १८-२० |
४ | टीएलजी-४५ | ११५-१२० | उपट्या | खरीप/उन्हाळी | १५-१८ / २०-२५ |
५ | टीजी २६ | ९५-१०० | उपट्या | खरीप/उन्हाळी | १४-१६ / २५-३० |
६ | जेएल २४ | ९०-११० | उपट्या | खरीप | १८-२० |
७ | जेएल २२० | ९०-९५ | उपट्या | खरीप | २०-२४ |
बियाण्यांचे प्रमाण
पेरणीसाठी सर्वसाधारणपणे १०० ते १२५ कि./हे. बियाणे लागते; परंतु बियाण्यांचे प्रमाण ठरविताना निवडलेले वाण, हेक्टरी रोपांची संख्या, १०० दाण्याचे वजन, उगवणक्षमता व पेरणीचे अंतर इत्यादीचा विचार करावा. एस. बी. ११, टीएजी २४ या उपट्या वाणांसाठी हेक्टरी १०० कि. बियाणे वापरावे. तर जेएल २४ साठी हेक्टरी १२५ कि. बियाणे वापरावे, निमपसाऱ्या व पसाऱ्या वाणांसाठी ८०-८५ कि./हे. बियाणे वापरावे.
बीज प्रक्रिया
१. ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम बाविस्टीन किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो बियाणे.
२. प्रती १० किलो बियाण्यास रायझोबीयम व पी. एस. बी. प्रत्येकी २५० ग्रॅम किंवा द्रव स्वरुपात असेल तर प्रत्येकी ६० मिली.
अधिक वाचा: उन्हाळी हंगामात सूर्यफुल लागवड करून खाद्यतेलाचा खर्च वाचवा
पेरणीचे अंतर
पेरणी ३० x १० से.मी. अंतरावर करावी जेणे करून हेक्टरी ३.३३ लाख रोपांची संख्या राखता येईल. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास २५ टक्के बियाण्यांची बचत होते.
पेरणीची पद्धत
१) सपाट वाफा पद्धत : पेरणी यंत्राच्या सहाय्याने वाफ्यावर ३० x १० से.मी. अंतरावर पेरणी करावी व लगेच पाणी द्यावे. ७-८ दिवसांनी नांग्या भरून घ्याव्यात.
२) रुंद वाफा पद्धत : अतिशय फायदेशीर आहे. तीन किंवा चार ओळीचे रुंद वाफा करून पेरणी करावी. तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाने पाणी देण्याची सोय नसल्यास वाफा दोन ओळीचा करावा.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
१) सेंद्रिय खते : ७.५ टन / हे. शेणखत किंवा कंपोस्ट
२) जैविक खते : प्रती १० किलो बियाण्यास रायझोबीयम व पी. एस.बी. प्रत्येकी २५० ग्रॅम किंवा द्रव स्वरुपात असेल तर प्रत्येकी ६० मिली.
३) मुख्य रासायनिक खते : २५:५०:०० कि. नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टर द्यावे.
४) दुय्यम रासायनिक खते : सल्फर व कॅल्शीयम हि दुय्यम अन्नद्रव्य महत्वाची आहेत यासाठी २०० कि. जिप्सम / हे. पेरताना जमिनीतून द्यावे तर २०० कि. जिप्सम / हे. आर्या सुटताना द्यावे.
५) सूक्ष्म अन्नद्रव्ये : सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे लोह, जस्त व बोरॉन ची कमतरता असल्यास पेरताना हेक्टरी २० कि. फेरस सल्फेट, २० कि. झिंक सल्फेट व ५ किलो बोरॉन पेरताना द्यावे. मल्टी मायक्रोन्युट्रीएंट ग्रेड दोन ची ०.५ % फवारणी करावी.
आंतरमशागत
तणे प्रामुख्याने पाणी, अन्नघटक, सूर्यप्रकाश व हवा यासाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात. किडी व रोगांना आश्रय देतात यामुळे उत्पन्नात २५-५० टक्के घट येवू शकते. तणांचे नियंत्रण न केल्यास तणे हेक्टरी ३८-५८ कि.नत्र, ६-९ कि. स्फुरद आणि २३-४५ कि. पालाश इ. अन्नघटकाचे शोषण करतात. तणाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास पिक काढणीस अडथळा निर्माण होऊन शेंगाच्या दाण्याची प्रत खालावते.
१) भुईमुगात सर्व प्रकारच्या आंतरमशागतीची कामे आऱ्या सुटण्याच्या आत पेरणीनंतर ४५ दिवसापर्यंत करावीत.
२) पहिल्या दीड महिन्यात दोन खुरपण्या आणि दोन कोळपण्या करून पीक तणविरहीत ठेवावे.
३) शेवटची कोळपणी खोल आणि फासेला दोरी बांधून करावी व यासोबत जिप्सम खत २०० कि./हेक्टर याप्रमाणे पेरावे.
४) तसेच ४० दिवसांनी आणि ५० दिवसांनी २०० लिटर पाण्याचा पत्र्याचा रिकामा ड्रम दोनदा फिरवावा म्हणजे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होते आणि त्यांना शेंगा लागतात.
५) बरेच शेतकरी भुईमूग पिकाच्या फांद्यावरील सर्व आऱ्या जमिनीत जाण्यासाठी झाडाला अधिक मातीची भर लावतात. परंतु यामुळे फांद्यास रोगग्रस्त बुरशीची लागण होते व सुरुवातीस तयार झालेल्या शेंगा खराब होण्याची शक्यता असते यास्तव मातीची भर फांद्यास अपायकारक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.