ऊस तोडणी करण्याच्या अगोदर दहा ते पंधरा दिवस उसास पाणी देऊ नये. शेतकरीऊस तोडणी अगोदर उसाचे वजन वाढण्यासाठी भरपूर पाणी देतात. त्यामुळे शेतात चिखल तर होतोच शिवाय तोडणी करणारे कामगार ऊसाची तोडणी जमिनीलगत करत नाहीत.
त्यामुळे जास्त साखर असणारा भाग जमिनीलगत राहतो आणि ऊस उत्पादनात घट होऊन साखर उताराही कमी मिळतो. सध्याच्या तोडणी पद्धतीने जवळ जवळ प्रत्येक उसामागे बुडक्याकडील १०० ग्रॅम भाग तसाच शेतामध्ये शिल्लक राहतो.
म्हणजेच प्रत्येक दहा टनामागे एक टन ऊस तसाच शिल्लक राहतो. या उसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे साखर उताऱ्यात आणि उसाच्या उत्पादनात आठ ते दहा टक्के पर्यंत घट होते. त्यासाठी जमिनीलगत ऊस तोडणी करणे गरजेचे असते. जमिनीलगत ऊस तोडणी केल्यास खोडवा ऊस चांगला फुटतो.
साखर उतारा कमी येण्याची कारणे व उस तोडणी करताना घ्यावयाची काळजी
- ऊस तोडणीनंतर जसजसा वेळ वाढत जातो त्याप्रमाणात उसाच्या कांडीतील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि साखरेतील विद्राव्य पदार्थाचे प्रमाण (ब्रीक्स) वाढते. त्याबरोबरच साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोज मध्ये रुपांतर होते आणि ऊसाचा साखर उतारा कमी मिळतो.
- तोडलेला ऊस एक ते दोन दिवस तसाच राहिला तर उसाच्या रसातील ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे कार्बनी आम्लात रुपांतर होते व ऊस आंबतो. अशा ऊसाचा रस निवण्यास अडचणी येतात आणि पर्यायाने साखर उतारा कमी मिळतो.
- ऊस तोडणीनंतर २४ तासापर्यंत उसाच्या वजनात व साखर उताऱ्यात विशेष घट येत नाही. परंतु २४ तासानंतर मात्र उसाच्या वजनात व साखर उताऱ्यात घट येण्यास सुरवात होते. चोवीस तासानंतर प्रतीदिनी साधारणता ३ ते ४ टक्के ऊस वजनात आणि ०.५ ते ०.७५ टक्क्याने साखर उताऱ्यात घट दिसून आली आहे.
- तोडणी झालेला ऊस गळीतास जाण्यास उशिर होणार आहे अशा वेळी तुटलेल्या ऊसावर पाचट पसरुन दिवसातून २-३ वेळा पाणी फवारावे म्हणजे ५ ते १२ टक्के वजनातील घट कमी करता येते. तसेच साखरेतील होणारी घट अर्धा-एक टक्क्यापर्यंत कमी करता येते.
- ऊस तोडणी जमीनीलगत न करणे हे एक महत्वाचे साखर उतारा कमी येण्याचे कारण आहे.
- ऊस तोडल्यानंतर जास्त काळ तसाच राहणे. उसाबरोबर जास्त पाचट जाणे, रोगट ऊस यामुळे मळीचे प्रमाण वाढते. यासाठी उस तुटल्यापासून कमीत कमी वेळात (२४ तासांचे आत) गाळप झाले पाहिजे.
- फुलोरा आलेला उस जर शेतामध्ये दोन महिन्याच्या पुढे न तोड होता तसाच राहीला तर ऊस उत्पनात व साखर उताऱ्यात घट येते. उसामध्ये दशी पडून ऊस पोकळ पडू लागतो, ऊसातील सुक्रोजचे विघटन होवून ग्लुकोज व फ्रुक्टोज तयार होते व सुक्रोजचे प्रमाण घटते. त्यामुळे ऊसाचा साखर उतारा कमी होतो, उसातील तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होते व रसाची टक्केवारी घटते. त्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होवून ऊस उत्पादनात साधारण २० ते २५% व साखर उताऱ्यामध्येही घट येते.
अधिक वाचा: उसाच्या जातीनुसार ऊस तोडणीचे नियोजन कसे करावे वाचा सविस्तर