फलोद्यान पिकांची प्रामुख्याने फळबाग, फूलशेती, कंदपिके, मसाल्याची पिके, चहा, कॉफी व इतर दुय्यम पिके, आदी शाखांमध्ये विभागणी केली जाते. याशिवाय पाण्याच्या आवश्यकतेनुसार विविध फळझाडांची मुख्यत्वे तीन प्रकारांत विभागणी होते.
एक म्हणजे कोरडवाहू अथवा वर्षावलंबी फळझाडे (सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर घेतली जाणारी फळझाडे) प्रामुख्याने आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, आवळा, करवंद, चिच, सीताफळ, कवठ, इत्यादी झाडांचा समावेश होतो.
कमी अथवा मर्यादित सिंचनावर घेतल्या जाणाऱ्या फळझाडांमध्ये डाळिंब, बोर, अंजीर, लिंबू, अननस, पपनस ही झाडे आहेत. भरपूर व नियमित पाण्यावर घेतल्या जाणाऱ्या फळझाडांमध्ये केळी, नारळ, सुपारी, चिकू, द्राक्षे, पेरू, पपई, लिची, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी व मसाल्याच्या पिकांचा समावेश होतो.
आंबा, काजू, फणस, कोकम ही कोकण विभागातील वर्षावलंबी फळझाडे असली तरी लागवडीच्या सुरुवातीच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्यांना जगवण्यासाठी पाणी आवश्यक असते.
नारळ, सुपारी ही महत्त्वाची नगदी पिके आहेत. या पिकांच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची तसेच मुबलक पाण्याची आवश्यकता असते.
शिवाय चिकू, केळी, पानवेल, अननस व मसाल्यांची पिके (काळी मिरी, कोको, लवंग, दालचिनी) हीदेखील येथील महत्त्वाची बागायती पिके आहेत; परंतु बहुतांश शेतकरी नारळ, सुपारी, केळी, पानवेल, मसाल्यांच्या पिकांची मिश्रपीक पद्धतीने लागवड करतात.
अन्नधान्य व इतर नगदी पिकांप्रमाणेच बागायती फळपिकांना पाणी देण्यासाठी विविध सिंचन पद्धतींचा अवलंब करण्यात येतो.
योग्य अशा सिंचन पद्धतींची निवड करताना मुख्यत्वेकरून, जमिनीचा प्रकार, खोली, उतार, पोत व इतर भौगोलिक गुणधर्म, हवामान व हंगाम, पिकांविषयक माहिती, झाडाचे वय, मुळांची खोली, प्रकार, रचना, दोन ओळींतील व झाडांतील अंतर, फलधारणेचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, पाणी साठविण्याचे व पुरवठा करण्याचे साधन या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
फलोत्पादन पिकांच्या वाढीच्या निरनिराळ्या अवस्थांनुसार पाणी देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. काही बागायतींमध्ये प्रवाही, तुषार पद्धतीने पाणी देता येते. पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करणे महत्त्वाचे आहे.
दीर्घ मुदतीच्या बागाआंबा, चिकू, नारळ, सुपारी व पानवेलीच्या पिकांना पाणी देण्यासाठी प्रवाही व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. आंबा कलमे जगविण्यासाठी व त्यांची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर पहिली तीन वर्षे हिवाळ्यात आठवड्यातून एकवेळ पाणी देणे आवश्यक असते. प्रतिझाडाला त्याच्या वयानुसार, जमिनीनुसार २० ते २५ लिटर पाणी द्यावे. आंबा कलमे मोहरल्यावर पाणी दिल्यास गळ होत नाही.
अधिक वाचा: खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?